तुरीच्या दाण्यांची आमटी

प्रत्येक ऋतुचे ठरलेले पदार्थ असतातच. उन्हाळ्याची चाहूल लागली की आंबा डाळ आणि पन्हं, बरोबर वाळ्याच्या अत्तराचा वास यायला लागतो. कारण आजीबरोबर चैत्रगौरीच्या हळदीकुंकवाला जायचे ते आठवतं. सगळ्यांकडे मिळणारे ओले हरभरे आणि भिजवलेली डाळ आजी दस्तीत (रूमालाला आमच्याकडे मराठवाड्यात दस्ती म्हणतात) बांधून आणायची आणि नंतर घरी आल्यावर कांदा फोडणीला घालून मुक्त हस्तानं तिखट, काळा मसाला, मीठ, लिंबू आणि कोथिंबीर घालून ते खमंग परतायची. अजूनही या झटपट उसळीची चव जिभेवर आहे.  माझी आई पोहे आणि टोमॅटोचे वाळवणीचे वडे फार छान करते. मला उन्हाळा आला की त्यांचाही वास यायला लागतो. पावसाळ्यात गरम वडे-भजी, गरम टोमॅटो सार, अगदी गरमागरम आमटी-भातसुध्दा खावासा वाटतो. तर हिवाळ्यात भाज्यांची रेलचेल. आंबेहळदीचं लोणचं, मिसळीची भाजी, उंधियो हे तर करायलाच हवं. या काळात सोलाणे (हरभ-याचे ओले दाणे), तुरीचे कोवळे दाणेही बाजारात यायला लागतात. मिसळीच्या भाजीत तर हे घालतोच आपण पण या दोन्ही दाण्यांची आमटी फार खमंग लागते. त्यामुळे बाजारात हे दाणे दिसले की माझ्या तोंडाला पाणी सुटतं. या मोसमातले पहिले तुरीचे दाणे मला परवाच मंडईत मिळाले. म्हणून लगेचच त्यांची आमटी केली. आजची रेसिपी आहे तुरीच्या दाण्यांची आमटी.

तुरीच्या दाण्यांची आमटी

गरम आमटी तयार आहे
गरम आमटी तयार आहे

साहित्य – १ वाटी सोललेले तुरीचे दाणे, १ मोठा कांदा लांब पातळ चिरलेला, २ टीस्पून ओलं खोबरं, १ हिरवी मिरची, २ लसूण पाकळ्या, थोडी कोथिंबीर, पाव टीस्पून हळद, १ टीस्पून लाल तिखट, २ टीस्पून काळा मसाला, मीठ चवीनुसार, २ टीस्पून दाण्याचं कूट (ऐच्छिक), १ टेबलस्पून तेल, ७-८ कढीपत्त्याची पानं, थोडी मोहरी, पाव टीस्पून हिंग

कृती –

१) एका कढईत थोडंसं तेल गरम करा. तेल गरम झालं की त्यात कांदा, लसूण आणि मिरची घाला. मध्यम आचेवर चांगलं परता.

२) कांदा लालसर व्हायला लागला की त्यात तुरीचे दाणे घाला. नीट हलवा आणि झाकण घालून मंद आचेवर ठेवा. मधूनमधून हलवत रहा.

३) तुरीचे दाणे शिजत आले की ओलं खोबरं घाला आणि परता.

४) दोन मिनिटं परतून त्यात कोथिंबीर घाला. अजून दोन मिनिटं परता आणि गॅस बंद करा.

परतलेलं मिश्रण
परतलेलं मिश्रण

५) परतलेलं मिश्रण थंड होऊ द्या. मिश्रण थंड झाल्यावर मिक्सरच्या भांड्यात घालून वाटून घ्या.

६) मिश्रण थोडं जाडंभरडं (आमच्याकडे अर्धंबोबडं म्हणतात!) वाटा. आवडत नसेलच तर बारीक पेस्ट करा. वाटताना पाण्याचा वापर करा.

७) वाटलेलं मिश्रण एका पातेल्यात काढा. आपल्याला आमटी जितपत पातळ हवी असेल त्या प्रमाणात पाणी घाला.

८) पातेलं गॅसवर ठेवून आमटी उकळत ठेवा. त्यात मीठ, दाण्याचं कूट आणि काळा मसाला घाला.

९) एका लहान कढईत तेल गरम करा. त्यात मोहरी घालून तडतडू द्या. मोहरी तडतडली की त्यात कढीपत्ता घाला, लगेचच हळद, तिखट आणि हिंग घाला आणि गॅस बंद करा. फोडणी खमंग झाली पाहिजे पण जळता कामा नये.

१०) ही फोडणी वरून आमटीवर ओता. हलवून आमटी पाच मिनिटं उकळा. गॅस बंद करा. तुरीच्या दाण्यांची आमटी तयार आहे.

ही आमटी गरम भाकरी, लोणी, ठेचा, मेथीची परतलेली भाजी यांच्याबरोबर फर्मास लागते. किंवा गरम भाताबरोबर तूप घालूनही उत्तम लागते. तिखटाचं प्रमाण आवडीनुसार कमी-जास्त करा. लसणाचं प्रमाण आवडत असेल तर वाढवा. इतक्या साहित्यात मध्यम पातळ अशी ६ वाट्या आमटी होते. याच पध्दतीनं सोलाण्यांची किंवा भेंडीच्या दाण्यांचीही आमटी करता येते.

2 thoughts on “तुरीच्या दाण्यांची आमटी

  1. सुंदर रेसिपी! नक्की करून बघीन. तुमच्या कडील खजिन्याची ही जी माहिती मिळते त्याबद्दल धन्यवाद!

    Liked by 1 person

  2. Turiche kovle dane mirchi lasun koshimbir takun watun nantr fodnila takaychi…ashi aamtipn apratim hote….try at once….vidarbhat ashyaprakare krtat….

    Liked by 1 person

Leave a Reply

Fill in your details below or click an icon to log in:

WordPress.com Logo

You are commenting using your WordPress.com account. Log Out /  Change )

Facebook photo

You are commenting using your Facebook account. Log Out /  Change )

Connecting to %s

%d bloggers like this: