तिखट आप्पे

दाक्षिणात्य पदार्थांचा मनापासून आस्वाद घेण्यात, दाक्षिणात्यांच्या खालोखाल महाराष्ट्रीय लोकच सगळ्यात पुढे असतील असं मला नेहमी वाटतं. महाराष्ट्रात हल्ली घरोघरी इडली-सांबार, मसाला डोसा, उत्तप्पा आदी पदार्थ नियमितपणे होत असतात. हे पदार्थ तसे करायला सोपे तर असतातच शिवाय चवदारही लागतात. मुंबईत तर माटुंगा या भागाला माटुंगम म्हटलं जातं, इतक्या मोठ्या प्रमाणात तामिळ लोकांची वस्ती इथे आहे. माटुंग्यात शिरलात की सुंदर्स, आर्यभवन, म्हैसूर कॅफे, मद्रास कॅफे, अंबा भुवन, शारदा भुवन, मणिज, रामा नायक, रामाश्रय अशी एकाहून एक सरस दाक्षिणात्य पदार्थ मिळणारी रेस्टॉरंट्स दिसतात. प्रत्येकाची खासियत वेगळी. म्हैसूर कॅफे, मद्रास कॅफे, रामा नायक, रामाश्रय ही खास उडपी चवीचे पदार्थ देणारी रेस्टॉरंट्स आहेत. त्यांच्या सांबाराला काहीशी गोडसर चव असते. तर आर्यभवन हे खास तामिळ चवीचे पदार्थ देणारी रेस्टॉरंट आहे. इथल्या सांबारात गूळ तर नसतोच पण चिंचेचं प्रमाण जरासं जास्त आणि ओला नारळ वाटून घातलेला असतो. या सगळ्या उपहारगृहांमधे इडल्या सुरेख मिळतात. रामा नायकच्याच व्यवस्थापनाचं इडली हाऊस हे लहानसं रेस्टॉरंट याच भागात आहे. बसायला फारशी जागा नाही. जेमतेम चार टेबलं. भिंतीशी लागून एक लांब टेबल, तिथे तुम्ही उभे राहून खाऊ शकता. इथे फक्त इडल्यांचे वेगवेगळे प्रकार मिळतात. साधी इडली, मसाला इडली, कांचीपुरम इडली, पेप्पर इडली, फणसाच्या पानातली इडली हे प्रकार चाखूनच बघायला हवेत. चटणी आणि सांबार अनलिमिटेड. शारदा भुवनचं उप्पीट उत्तम असतं. मला इथे एकच गोष्ट खटकते, ती म्हणजे इडली सांबार उथळ प्लेटमधे देतात. त्या मागचं लॉजिक काय आहे ते खूप विचार करूनही मला अजून उमगलेलं नाही!

हे सगळं पुराण सांगण्याचं कारण म्हणजे मी आज एक दाक्षिणात्य रेसिपीच शेअर करणार आहे. ती आहे तिखट आप्प्यांची. आप्पे तिखट आणि गोड असे दोन्ही प्रकारांनी केले जातात. गोड आप्प्यांना गुंत्तपंगळू असं म्हणतात.

तिखट आप्पे

तयार आप्पे चटणीबरोबर द्या
तयार आप्पे चटणीबरोबर द्या

साहित्य – १ वाटी उडीद डाळ, १ वाटी चणा डाळ, २ वाट्या तांदूळ, १०-१२ लसूण पाकळ्या, २ इंच आलं, ६-७ हिरव्या मिरच्या, अर्धी वाटी चिरलेली कोथिंबीर, मीठ चवीनुसार, थोडं तेल

कृती –

१) दुपारी दोन्ही डाळी आणि तांदूळ वेगवेगळे भिजत घाला. साधारणपणे ५-६ तास भिजू द्या. २) संध्याकाळी सगळं एकत्र करून मिक्सरमधे वाटून घ्या. मिश्रण भज्यांच्या पिठाइतपत पातळ ठेवा.

३) झाकण घालून रात्रभर आंबू द्या. दुस-या दिवशी सकाळी मिश्रण छान फुगून येईल.

४) आलं-लसूण-मिरची मिक्सरमधे वाटून घ्या.

५) पिठात वाटण, मीठ आणि चिरलेली कोथिंबीर घाला.

६) गॅसवर आप्पेपात्र गरम करायला ठेवा. मध्यम आच असू द्या.

७) आप्पेपात्राच्या सगळ्या कप्प्यांमधे थोडंसं तेल घाला. शक्यतो नॉनस्टिक आप्पेपात्र वापरा म्हणजे तेल कमी लागेल.

८) पात्र चांगलं गरम झालं की त्यात बसेल इतपत पीठ घाला. पीठ फार जास्त घालू नका कारण आप्पे फुगतात.

९) आता मध्यम आचेवर झाकण घालून होऊ द्या. झाकण काढून बघा. कडा लाल दिसल्या की हलक्या हातानं आप्पे उलटा. दुस-या बाजुनंही चांगले लाल होऊ द्या. आप्पे तयार आहेत.

हे आप्पे डाळं-ओल्या खोब-याच्या चटणीबरोबर द्या.

चटणीचं साहित्य – अर्धी वाटी डाळं, अर्धी वाटी ओलं खोबरं, २-३ हिरव्या मिरच्या, अर्धी वाटी कोथिंबीर, मीठ हे सगळं मिक्सरवर वाटून घ्या. वाटताना पाण्याचा वापर करा. चटणी सरबरीत हवी. वाटून चटणी भांड्यात काढा. त्यात १ टेबलस्पून दही घाला. नीट मिसळा. चटणी तयार आहे.

हे तिखट आप्पे अतिशय चवदार लागतात. नाश्त्यासाठीचा उत्तम आणि पोटभरीचा पदार्थ आहे. हवं तर रात्रीच्या जेवणाला करा. बरोबर चित्रान्न किंवा पुळीवगरे हा भाताचा दाक्षिणात्य प्रकार करा. पूर्ण जेवण होईल.

4 thoughts on “तिखट आप्पे

  1. website chi mandani sundar aahe…photo baghun tar tondala pani sutat…tumhi ajun ek padartha add karu shakata appe sadara madhe…te mhanje ravyache appe

    Like

  2. सायली ताई .. एक विनंती, भाताच्या रेसिपीज शेअर करा ना..

    Like

    1. रोहिणी, ब्लॉगवर भाताचे प्रकार अशा नावाखाली ब-याच रेसिपी मिळतील तुम्हाला.

      Like

Leave a Reply

Fill in your details below or click an icon to log in:

WordPress.com Logo

You are commenting using your WordPress.com account. Log Out /  Change )

Facebook photo

You are commenting using your Facebook account. Log Out /  Change )

Connecting to %s

%d bloggers like this: