१९८२ मधे मुंबई उच्च न्यायालयाचं खंडपीठ औरंगाबादला झालं आणि बाबा मुंबईहून औरंगाबादला आले. आम्ही बीडहून आलो कारण एक वर्ष मुंबईत राहिल्यानंतर, मुंबईत घर मिळालं नाही म्हणून आम्ही बीडला परतलो होतो. उस्मानपु-यातल्या उत्सव मंगल कार्यालयाच्या मागे असलेल्या घरात आम्ही भाड्यानं राहायला लागलो. अर्थात तेव्हा उत्सव तिथे नव्हतं, तो प्लॉट रिकामा होता. हळूहळू ओळखी व्हायला लागल्या. घरासमोरच्या घरात निलंगेकरांचं कुटुंब राहात होतं. त्यांच्या घरात बर्वेंचं कुटुंब भाड्यानं राहायला आलं आणि सोनालीची आणि माझी ओळख झाली. खरं तर आमच्या शाळा वेगवेगळ्या होत्या. नंतर कॉलेजातही ती कॉमर्सला आणि मी आर्टसला. पण सतत एकमेकींबरोबर असायचो. सोनालीची आजीही आमच्यात सामील व्हायची. सोनाली शाळेतून यायच्या वेळेला, संध्याकाळी पाच-साडेपाचला मी त्यांच्या घरी पोचायचे. मग आजी एका मोठया स्टीलच्या ताटात पातळ पोहे घ्यायच्या, त्याला तेल, तिखट, मीठ लावायच्या. दाण्याचं कूट घालायच्या, बारीक चिरलेला कांदा आणि कोथिंबीर घालायच्या आणि आम्ही तिघी जणी घराच्या पायरीवर बसून ते लावलेले पोहे मनसोक्त खायचो. हा आमचा जवळपास रोजचा कार्यक्रम होता. सोनालीची आजी म्हणजे आम्हाला आमची मैत्रीणच वाटायची. त्या तपकीर ओढायच्या. सोनाली आणि मी सुपारी हनुमान मंदिराच्या मागे असलेल्या तपकीरवाल्याकडे जाऊन त्यांची तपकीर घेऊन यायचो. निलंगेकर काकू कर्नाटकी पध्दतीचे पोहे लावायच्या. म्हणजे पातळ पोहे भाजून घेऊन, त्यात पूड चटणी, तळणीची मिरची घालून लावलेले पोहे. काय अफलातून लागायचे ते पोहे! माझी आई जे पोहे लावायची त्यात घरात असतील त्या सगळ्या चटण्या आणि लोणच्याचा खारही घालायची, अहाहा! स्वर्गसुखच होतं ते पोहे खाणं म्हणजे.
आज मी अशीच एक रेसिपी शेअर करणार आहे, ती म्हणजे दडप्या पोह्यांची.
दडपे पोहे

साहित्य – पाव किलो पातळ पोहे, २ कांदे बारीक चिरून, २ काकड्या बारीक चिरून, ४-५ हिरव्या मिरच्या बारीक चिरून, मूठभर कोथिंबीर बारीक चिरून, अर्धी वाटी दाण्याचं कूट, अर्धी वाटी खोवलेलं ओलं खोबरं, १-२ टीस्पून साखर, अर्ध्या लिंबाचा रस, मीठ चवीनुसार, १-२ टेबलस्पून तेल, थोडी मोहरी, पाव टीस्पून हिंग
कृती –
१) पोहे कढईत घालून सतत न हलवता मंद आचेवर कुरकुरीत होईपर्यंत भाजून घ्या. बाजुला काढून ठेवा.
२) पोहे थंड झाले की त्यावर कांदा, काकडी, कोथिंबीर, साखर, मीठ, दाण्याचं कूट. ओलं खोबरं घाला.
३) एका लहान कढईत तेल गरम करा. तेल चांगलं तापलं की त्यात मोहरी घालून तडतडू द्या. नंतर त्यात बारीक चिरलेली हिरवी मिरची घालून ती चांगली परतून घ्या.
४) आता त्यात हिंग घाला आणि गॅस बंद करा. ही फोडणी पोह्यांवर ओता.
५) हलक्या हातानं सगळं नीट एकत्र करा. दडपे पोहे तयार आहेत.

कांदा आणि काकडीमुळे पोह्यांना ओलसरपणा येतो. तेलाचं आणि मिरच्यांचं प्रमाण आवडीनुसार कमी-जास्त करा. यात आपल्या आवडीनुसार आपण बदलही करू शकतो, म्हणजे आवडत असल्यास तळलेला पोह्याचा पापड कुस्करून घाला किंवा भाजलेला उडदाचा पापड कुस्करून घाला. लिंबाच्या लोणच्याचा किंवा कैरीचा लोणच्याचा खार घाला. किंवा बेडेकरांचं रसलिंबू मिळतं ते घाला. पूड चटणी असल्यास ती घाला किंवा तिळाची, दाण्याची चटणी घाला. वेगवेगळ्या चवीचे दडपे पोहे अफलातून लागतात. मग करून बघा आणि तुम्ही काय काय घालून पोहे केले आणि ते कसे झाले हेही कळवा.
सायली, आत्ताच करून खाल्ले.. काल तुझ्या पोस्टने आठवण करून दिल्यापासून अधीर झाले होते.. मी काकडी टाकत नव्हते.. कदाचित सासूने शिकवलेला पदार्थ आणि तिथे इंदौरमधे काकडीचं फारसं प्रस्थ नाही म्हणून असेल.. पण काकडीने लज्जत वाढवली. अजिबात कष्ट नाही, त्यामुळे तर फारच आवडला हा पदार्थ.. छान ग..
LikeLiked by 1 person
धन्यवाद मिथिलाताई! मला परवा असेच दुपारच्या झोपेत दिसले दडपे पोहे. आणि उठून लगोलग करून खाल्ले! 🙂
LikeLiked by 1 person
कालच दडपे पोहे करुन खाल्ले,अफलातुन या शब्दाची प्रचिती आली…खरच खुप छान
LikeLike
धन्यवाद! 🙂
LikeLike
नमस्कार सायली ताई,
मी असे ऐकले होते की, दडपे पोहे म्हणजे पातळ पोहे दुधात भिजवून काही तास ठेवावे . नंतर त्यात कांदा आणि ओलं खोबरं घालून परत काही काळ ठेवावे (दडपून म्हणजे झाकून). मग त्यात बाकीचे साहित्य घालून पोहे करावे..
तुमचा काय मत आहे ह्यावर? तुमचा काही अनुभव?
LikeLiked by 1 person
अबोली, दडपे पोहे म्हणजे दडपून ठेवलेले पोहे हे खरंच. काही लोक नारळाच्या पाण्यात भिजवून ठेवतात, सगळं घालून त्यात. पण दुधात भिजवण्याचं मी तरी काही ऐकलेलं नाहीये.
LikeLike
I make them without the cucumber but with pood chutney, metkut, lal tikhat, bhajlele shengdane, thoda dala,salt, sugar,limbu,kanda, hirwa mirchi and kothimbir and loncyacha tel or kaccha tel.
Pohe me microwave madhe mast kurkurit bhajun ghete.
Can add shev or poha or urad papad or little farsan for that extra crunch.
LikeLike
मस्त दडपे पोहे…. माझी आई पातळ पोह्यात कांदा, टॉमेटॉ, लसणीचं तिखट घालून फोडणी घालते आणि ताक घालून दडपून ठेवते… अप्रतिम लागतात…
LikeLike
Hi, mazi aaji dudhacha habka marun ase pohe karaychi. Tyat kaccha Kanda, oli mirchi, aale kisun lavaychi. Ola khobare n kothimbir warun takun churun pohe karaychi.
LikeLike