मटन मसाल्यातली वांग्याची भाजी

माझं माहेर देशस्थ. त्यामुळे घरी एक विशिष्ट प्रकारचा स्वयंपाक होतो. शिवाय माझी आजी मुंबई-नाशिकमधे राहिलेली.  त्यामुळे माझ्या माहेरी टिपीकल ब्राह्मणी, गोडसर स्वयंपाक होतो. माझी आई अंबेजोगाईची. तिला झणझणीत तिखट खाणं आवडतं. पण बाबांना तिखट चालत नाही आणि आजी-आजोबांनाही तिखट चालायचं नाही. त्यामुळे आई बिचारी ठेचा किंवा भुरक्याबरोबर जेवायची. मला स्वतःलाही तिखट पदार्थ विशेष प्रिय आहेत. माझ्या बहिणीचा मेघनचा नवरा मराठा आहे. त्यांच्याकडचे काही पदार्थ अफलातून असतात.  मेघन त्या प्रकारचाही स्वयंपाक उत्तम करते. मी शाकाहारी आहे, पण मला मटन मसाल्यात केलेल्या भाज्या मनापासून प्रिय आहेत.

मी मागे भरल्या वांग्यांच्या भाजीची रेसिपी शेअर केली होती. पण ती टिपीकल ब्राह्मणी, चिंच-गूळ घालून केलेली भाजी. आज मी वांग्याच्या भाजीचीच रेसिपी शेअर करणार आहे पण ती आहे मेघनच्या पध्दतीची. झणझणीत, मटन मसाल्यातली. ही भाजी तुम्ही एकदा खाल्लीत तर परत परत कराल इतकं नक्की. मेघन जेव्हा माझ्या घरी येते तेव्हा तिला ही भाजी करायची फर्माईश असतेच असते. फक्त ती मला म्हणते की मी भाजी करत असताना तू स्वयंपाकघरात येऊ नकोस! याचं कारण असं आहे की या भाजीला भरपूर तेल लागतं आणि मला जास्त तेल चालत नाही. म्हणजे डायटचं सोडा मला ताटाला तेल लागलेलं आवडत नाही. त्यामुळे माझ्या भाज्यांमधे तेलाचं प्रमाण ब-यापैकी कमी असतं. पण या भाजीला मुक्त हस्तानं तेल घातल्यामुळे ही भाजी खरोखर लज्जतदार होते. आज मी पहिल्यांदाच ही भाजी केली. ती मस्त झाली होती. तुम्हीही करून बघा आणि नक्की कळवा कशी झाली होती ते.

वांग्याची मटन मसाल्यातली भाजी

वांग्याची तयार भाजी
वांग्याची तयार भाजी

साहित्य – पाऊण किलो किंवा २० लहान गावरान काटेरी वांगी, १ वाटी तेल, २ टीस्पून लाल तिखट, २ टेबलस्पून काळा मसाला, मीठ चवीनुसार

वाटण मसाला १ –  ६ कांदे पातळ उभे चिरलेले, ४ टीस्पून धणे, ४ टीस्पून तीळ, १ टेबलस्पून खसखस, १ वाटी किसलेलं सुकं खोबरं, ४-५ लवंगा, ६-७ मिरी दाणे, १ टेबलस्पून तेल

वाटण मसाला २ – १५-१६ लसूण पाकळ्या, दीड इंच आलं, वाटीभर कोथिंबीर

काटेरी वांगी घ्या
काटेरी वांगी घ्या

कृती –

वाटण मसाला १ –

१) एका कढईत तेल घालून तेल चांगलं तापलं की त्यात कांदा घाला. मधून मधून हलवत कांदा काळपट रंगावर खरपूस भाजून घ्या.  कांदा बाजूला काढून ठेवा.

२) कढईत धणे कोरडेच लाल रंगावर भाजा. तीळही तसेच लाल रंगावर कोरडेच भाजा.

३) सुकं खोबरं आणि खसखस काळपट रंगावर खरपूस भाजून घ्या.

४) मिरी दाणे आणि लवंगाही भाजून घ्या.

५) सगळा मसाला थंड होऊ द्या. थंड झाल्यावर आधी कोरडा मसाला मिक्सरवर वाटा.

६) नंतर त्यातच परतलेला कांदा घाला आणि एकजीव पेस्ट वाटा. वाटताना पाणी वापरा.

वाटण मसाला २ – आलं-लसूण आणि कोथिंबीर एकत्र करून एकजीव पेस्ट करून घ्या.

भाजीची कृती –

१) वांग्यांच्या देठाचे काटे काढून थोडेसे देठ ठेऊन वांगी भरून करतो तशी चिरा.

२) कढईत तेल गरम करा. तेल अति गरम करू नका. तेल जरासं तापलं की त्यात लाल तिखट घाला. लगेचच हलवा. असं केल्यानं भाजीवर तेलाचा मस्त तवंग येतो.

३) तिखट परतलं गेलं की त्यात वाटण मसाला १ घाला. चांगलं हलवून घ्या आणि वाटण मसाला २ घाला.

४) आता हा मसाला मध्यम आचेवर मधून मधून हलवत खमंग परता. मसाल्याला चांगलं तेल सुटेपर्यंत परतत रहा.

मसाल्याला तेल सुटेपर्यंत परता
मसाल्याला तेल सुटेपर्यंत परता

५) मसाल्याला सगळ्या बाजुंनी तेल सुटायला लागलं की त्यात वांगी घाला.

६) नीट हलवून घ्या, काळा मसाला, मीठ घाला आणि झाकण ठेवा.

७) मध्यम आचेवर मधून मधून हलवत रहा. ही वांगी शिजायला वेळ लागतो.

वांगी शिजत आली की पाणी घाला
वांगी शिजत आली की पाणी घाला

८) वांगी शिजत आली की त्यात आपल्याला रस्सा हवा असेल तितपत पाणी घाला. साधारणपणे २ कप पाणी पुरे होईल.

९) परत झाकण घाला. मंद आचेवर वांगी मऊ शिजू द्या. वांगी शिजली की गॅस बंद करा.

वांग्याची भाजी तयार आहे
वांग्याची भाजी तयार आहे

मटन मसाल्यातली वांग्याची भाजी तयार आहे. या भाजीबरोबर बाजरीची तीळ लावून केलेली खमंग भाकरी, लोण्याचा गोळा, हिरव्या मिरचीचा लसूण, जिरं घालून केलेला ठेचा आणि उतारा म्हणून थंडगार ताक द्या. अफलातून जेवण होतं. तेलाचं प्रमाण जास्त असल्यानं ही भाजी कधीतरीच केली जाते. पण कुणी जेवायला येणार असेल तर ही भाजी नक्की करा. उत्तम मेन्यू होईल.

5 thoughts on “मटन मसाल्यातली वांग्याची भाजी

  1. वांग्याचीभाजी अगदी मटणाला मागे काढते आहे

    Like

  2. Can the recipe be used to make bharli tondali type rassa bhaji? I mean using same vatan masala & not stuffing in tondali, but just cook it all together?

    Like

  3. मस्तच…आजच करून पाहिली; वांग्याऐवजी उकडलेली अंडी घालून. छान झाली👌🏻 धन्यवाद.

    Like

  4. Hello sayali madam….Kharchh apratim zali hoti vangyachi bhaji mi brych receip try krun pahilyat tumcha….Thank you so much for dis tasty receipe

    Like

Leave a Reply

Fill in your details below or click an icon to log in:

WordPress.com Logo

You are commenting using your WordPress.com account. Log Out /  Change )

Facebook photo

You are commenting using your Facebook account. Log Out /  Change )

Connecting to %s

%d bloggers like this: