काही जुने, गंमतीचे पदार्थ

माझी आई मूळची अंबेजोगाईची पण तिचे वडील म्हणजे माझे आजोबा परळीला नोकरी करत असत. आजोबा त्याकाळी मोंढ्यात सट्टा लावून व्यवसाय करत असत. म्हणजे जुगार नव्हे तर, उदाहरणार्थ सुक्या मेव्याच्या पोत्यांवर किंवा धान्यांच्या पोत्यांवर बोली लावून तो माल खरेदी करून मग विक्री करणं असा काहीसा तो व्यवसाय होता. आर्थिक परिस्थिती श्रीमंतीची नसली तरी खाऊनपिऊन बरी होती. मात्र नंतरच्या काळात त्यांचा धंदा बुडाला आणि आर्थिक परिस्थिती फारच हलाखीची झाली. माझी आई हे त्यांना उतारवयात झालेलं अपत्य. आईच्या जन्माआधीच तिच्या मोठ्या बहिणीचं लग्न झालेलं होतं. तिचे दोघे भाऊही नोकरीच्या निमित्तानं घराबाहेर पडलेले होते. त्यामुळे आई, आजोबा-आजी असे तिघेच परळीला रहात. परिस्थिती इतकी बिकट होती की, कधीकधी जोंधळ्याच्या कण्या शिजवून खाण्याचीही वेळ येत असे. कित्येकदा जेवणात फक्त पातळ वरण आणि भाकरी असंही असे. असं असलं तरी आई सांगते की, जे काही उपलब्ध असायचं त्यातही माझी आजी फारच चवदार स्वयंपाक करायची. मी कळत्या वयाची होईपर्यंत माझी आजी गेलेली होती, त्यामुळे मला तिच्या आठवणी नाहीत. पण माझ्या चुलत मावश्या किंवा चुलत मामाही आजीच्या हातच्या साध्याच पण चवदार स्वयंपाकाची फार तारीफ करतात.
परवा असंच आईबरोबर गप्पा मारताना आईने त्या काळात त्यांच्या घरी केले जाणारे काही सोपेसे पदार्थ सांगितले. हे पदार्थ करायला अतिशय सोपे, घरात उपलब्ध असलेल्या सामग्रीतून सहज तयार होणारे असे आहेत. शिवाय या पदार्थांची नावंही अतिशय गंमतीशीर आहेत. खबं, माडगं, आंबेलोंढं आणि गर्डेल अशा या पदार्थांबद्दल मी आज लिहिते आहे. अर्थात या पदार्थांची नेहमी देते तशी रेसिपी देणार नाहीये. कारण ते करायला खरंच सोपे आहेत.

उरलेली शिळी भाकरी कुस्करायची, त्यात तिखट, मीठ, काळा मसाला, तेल घालायचं. त्यातच बारीक चिरलेला कांदा आणि कोथिंबीर घालायची. हे झालं खबं तयार. हा पदार्थ नाश्त्यासाठी किंवा दुपारच्या खाण्यासाठी उत्तम लागतो. मी कॉलेजमधे असताना आम्हीही अतिशय आवडीनं हे खात असू.

शिळी भाकरी उरली असेल तर ती जरा जाडसर कुस्करायची. त्यात तिखट, मीठ घालायचं. बारीक चिरलेली कोथिंबीर घालायची. त्यात दही (आवडत असल्यास सायीचं दही घालायचं! ), दूध घालून सरबरीत कालवायचं. आणि वरून त्याला तळणीच्या मिरचीची खमंग फोडणी घालायची. या पदार्थाला त्या भागात माडगं म्हणायचे.

आंबेलोंढं या मजेशीर नाव असलेल्या पदार्थाची रेसिपीही तशीच गंमतीची आहे. घरात जे चाळण उरलेलं असतं (चाळण म्हणजे, डाळी, पोहे वगैरे गोष्टी चाळल्यानंतर चाळणीत वर जो कोंडासदृश प्रकार राहतो तो) त्यात थोडंसं डाळीचं किंवा तांदळाचं पीठ घालायचं, त्यात तिखट, मीठ, हळद, आवडत असल्यास मेथी चिरून किंवा दुधी किसून घालायचा. ते पीठ नीट कालवून, मळून घ्यायचं. त्याचे मुटके करायचे आणि ते चांगले वाफवायचे. वाफवलेले मुटके थंड झाले की ते फोडणी करून त्यावर परतून खायचे. आता आपण फायबर खाल्लं पाहिजे असं जे सतत म्हणत असतो हा त्यासाठीचा एक उत्तम पर्याय होऊ शकेल!

गर्डेल असं भरभक्कम नाव असलेल्या पदार्थाला खरं तर रेसिपीच नाहीये. एका टोपल्यात कुरमुरे घ्यायचे. त्यात तिखट-मीठ- कच्चं तेल-काळा मसाला- मेतकूट असं सगळं घालायचं. हवं असल्यास बारीक चिरलेला कांदा आणि कोथिंबीर घालायचं आणि लगेचच फस्त करायचं. हे झालं गर्डेल.

तर आजच्या या रेसिपीज लौकिकार्थानं खास नसतीलही. पण या पदार्थांशी माझ्या आईच्या माहेरच्या आठवणी जोडलेल्या आहेत. म्हणून मी आज तुमच्याबरोबर त्या शेअर केल्या. तुम्हीही या करून बघा आणि नक्की कळवा कशा झाल्या ते.

2 thoughts on “काही जुने, गंमतीचे पदार्थ

  1. Hi Sayali,

    Ur WordPress blog is soooooo impressive !!
    It truly reflects ur passion towards cooking.
    I just realized that kitchen a mere room in a house can give you so much happiness and relaxation.
    Very well presented recipes and narration too.

    Regards,
    Sheetal

    Liked by 1 person

Leave a Reply

Fill in your details below or click an icon to log in:

WordPress.com Logo

You are commenting using your WordPress.com account. Log Out /  Change )

Twitter picture

You are commenting using your Twitter account. Log Out /  Change )

Facebook photo

You are commenting using your Facebook account. Log Out /  Change )

Connecting to %s

%d bloggers like this: