गोळ्यांची येसर आमटी

मराठवाड्यात लग्नकार्य झाल्यावर जवळच्या लोकांच्या घरी जाऊन त्यांना भेटण्याची प्रथा आहे. या भेटीच्या वेळी येसर-मेतकूट देण्याचा रिवाज आहे. किंबहुना या भेटीला येसर-मेतकूट द्यायला जाणं असंच म्हणतात. आम्ही बीडला राहात असताना लग्नसराईच्या दिवसांनंतर आमच्या घरी आजीच्या-आईच्या मैत्रिणी, आमच्या नात्यातल्या बायका येसर-मेतकूट द्यायला आलेल्या मला आठवतात. मेतकूट तर सगळ्यांना माहीतच आहे. येसर हा जो पदार्थ आहे त्याची आमटी करतात. गहू, हरभरा डाळ आणि थोडेसे धणे-जिरे असं सगळं भाजून घ्यायचं आणि नंतर ते जाडसर दळायचं. ते दळून झाल्यावर त्यात काळा मसाला मिसळायचा की झालं येसर तयार. बहुजन समाजात येसर भाजताना थोडी बाजरीही घालतात. येसराचा फायदा असा की, आमटीला त्यामुळे दाटपणा येतो शिवाय दाण्याचं कूट कमी लागतं. आता शहरांमधे येसर मिळणं कठीण आहे. पण माझी आई इन्स्टंट येसर आमटी करते. आज मी तीच रेसिपी शेअर करणार आहे. शिवाय या आमटीत हरभरा डाळीच्या पिठाचे (बेसनाचे) गोळे करून ते सोडले तर अजूनच मजा. हे गोळे आमटीत मस्त शिजतात. नंतर हे गोळे ताटात कुस्करायचे आणि त्याच्यावर जिवंत फोडणी घालायची. (स्मृतीचित्रेमधे लक्ष्मीबाई टिळकांनी जिवंत फोडणीची गोष्ट सांगितलेली आहे. त्यांचे सासरे रागीट होते. त्यांना गरम भातावर वालाचं गोडं वरण आणि त्यावर जिवंत फोडणी घालून आवडायचं. लक्ष्मीबाई टिळकांना जिवंत फोडणी म्हणजे काय हे माहीत नव्हतं. मग त्यांना कुणीतरी सांगितलं की लहानशा कढलीत तेल कडकडीत तापवून त्यात मोहरी घालायची आणि ती तडतडली की ती गरम फोडणी भातावर घालायची. ही झाली जिवंत फोडणी!) ही आमटी हिवाळ्याच्या दिवसांत रात्रीच्या जेवणासाठी उत्तम लागते. थंडीत गरमागरम येसर आमटी सूपसारखी प्यायला मजा येते.

गोळ्यांची येसर आमटी

तयार गोळ्यांची येसर आमटी
तयार गोळ्यांची येसर आमटी


गोळ्यांसाठीचं साहित्य – दीड वाटी डाळीचा भरडा (जाडसर बेसन), १ टीस्पून लाल तिखट, पाव टीस्पून हळद, चिमूटभर हिंग, मीठ चवीनुसार, किंचितसं तेल

गोळ्यांसाठीचं साहित्य
गोळ्यांसाठीचं साहित्य


आमटीसाठीचं साहित्य – २ टीस्पून बेसन, २ टीस्पून कणीक, २ टीस्पून काळा मसाला, १ टेबलस्पून दाण्याचं कूट, १-२ टीस्पून तिखट, मीठ चवीनुसार, ७-८ लसूण पाकळ्या ठेचलेल्या, १ टेबलस्पून तेल, मोहरी, चिमूटभर हिंग, थोडीशी बारीक चिरलेली कोथिंबीर

आमटीसाठीचं साहित्य
आमटीसाठीचं साहित्य


गोळ्यांची कृती –
१) भरडा, तिखट, मीठ, हळद, हिंग सगळं एकत्र करावं. त्यात थोडंसं पाणी घालून घट्ट पीठ भिजवा.
२) किंचितसा तेलाचा हात लावा. पीठ नीट मळून घ्या आणि त्याचे लहान लिंबाएवढे गोळे करा. तयार गोळे बाजुला ठेवा.

तयार गोळे
तयार गोळे


आमटीची कृती –
१) कढईत तेल चांगलं गरम करा. त्यात मोहरी घालून तडतडू द्या.
२) मोहरी तडतडली की त्यात हिंग घाला. आता त्यात लसूण ठेचून घाला.
३) लसूण जरासा लाल झाला की त्यात कणीक आणि डाळीचं पीठ घाला आणि मंद आचेवर खमंग वास येईपर्यंत भाजा.
४) पीठ भाजलं गेल्याचा खमंग वास यायला लागला की त्यात दाण्याचं कूट आणि काळा मसाला घाला आणि थोडंसं परता.
५) नंतर त्यात साधारणपणे ४ फुलपात्रं पाणी घालावं. पाणी हळूहळू घालत जा म्हणजे त्यात गुठळ्या होणार नाहीत. पाणी घातल्यानंतर गॅस मोठा करा.

६) पाण्यात मीठ, तिखट, काळा मसाला घाला. पाण्याला चांगली उकळी येऊ द्या. त्यात कोथिंबीर घाला.
७) पाणी खळखळून उकळायला लागलं की त्यात तयार केलेले गोळे घाला. मध्यम आचेवर गोळे चांगले शिजेपर्यंत आमटी उकळू द्या.
८) आमटी आपल्याला हवी असेल तितपत घट्ट/पातळ ठेवा. त्यानुसार पाण्याचं प्रमाण कमी-जास्त करा. तिखटाचं प्रमाणही आवडीनुसार कमी-जास्त करा.
गोळ्यांची येसर आमटी तयार आहे. इतकी आमटी साधारणपणे ३-४ लोकांना पुरेशी होईल.

तिखट आवडणा-यांना ही गरमागरम आमटी नुसती सूपसारखी प्यायला मस्तच वाटेल. ही आमटी हिवाळ्याच्या दिवसांत बाजरीच्या भाकरीबरोबर उत्तम लागते. एरवी ज्वारीच्या भाकरीबरोबर किंवा पोळीबरोबर आणि गरम भाताबरोबरही अप्रतिम लागते. आमटीतले गोळे ताटात बाजूला काढून ते कुस्करायचे. त्यावर ताजी फोडणी घालायची. हे गोळेही भाकरीबरोबर मस्त लागतात. बरोबर एखादी साधी भाजी केली की संपूर्ण जेवण होईल. मला तर ही आमटी असली की भाजीही लागत नाही. तेव्हा करून बघा आणि नक्की कळवा आमटी कशी झाली ते.

3 thoughts on “गोळ्यांची येसर आमटी

  1. ताई काल मी हि आमटी केली होती. आमटी एकदम मस्त झाली होती म्हणजे येसर ची आमटी सारखीच चव होती. घरात सर्वाना आवडली. पण ह्या आमटी मधील गोळे काही शिजले नाहीत व्यवस्थित. मी जवळपास ४५ मिनिटे उकळलि आमटी. हे गोळे नीट शिजण्यासाठी काही टिप्स सांगा ना. मी वापरलेली भरड जरा जास्तच जाड होति. त्यामुळे काही फरक पडला असेल का?

    Like

  2. येसर करतांना गहू, हरभरा दाळ ह्यांचे प्रमाण किती असावे? मी पण जालन्याची अाहे. मधल्या वर्षांमध्ये येसर केले नाही. त्यामुळेप्रमाण विसरले. अाता पुण्याला असते.

    Like

Leave a Reply

Fill in your details below or click an icon to log in:

WordPress.com Logo

You are commenting using your WordPress.com account. Log Out /  Change )

Facebook photo

You are commenting using your Facebook account. Log Out /  Change )

Connecting to %s

%d bloggers like this: