मला स्वतःला भाताचे प्रकार खूप आवडतात. मग तो मसालेभात असो, पुलाव, बिर्याणी, चित्रान्न, सांबारभात, फोडणीचा भात अगदी आमटी-भात, वरण-भात असा कुठलाही प्रकार असो. खरं तर पोळी-भाकरीशिवाय माझं भागत नाही. पण शेवटी घासभर भात असला तर मग कसं जेवल्याचं समाधान वाटतं. आमच्याकडे रोज भात होत नाही. खरं सांगायचं तर सकाळी तर माझ्या घरी पोळी-भाजी-कोशिंबीर-ताक असंच जेवण असतं. त्याचं कारण असं आहे की सकाळी मी सोडले तर घरातले सगळेच बाहेर पडतात. त्यामुळे डब्याला अर्थातच पोळी-भाजी असते. मग मीही तेच जेवते. पण रात्रीच्या जेवणात बरेचदा मी भाताचा एखादा प्रकार करते. भाताबरोबर एखादं सूप, सॅलड केलं की पूर्ण जेवण होतं. आज मी अशीच एक रेसिपी शेअर करणार आहे जी आपल्या सगळ्यांच्या घरी होत असते. थोड्या-फार फरकाने सगळ्या घरी फोडणीचा दही-भात होत असतो. काही लोक भातात दूध घालून त्या भातालाच विरजण लावून ठेवतात. असा विरजण लावलेला भात प्रवासात न्यायला उत्तम. कारण तो फारसा आंबट होत नाही. दक्षिणेत तर या पदार्थाला अनन्यसाधारण महत्व आहे. दहीभाताशिवाय दाक्षिणात्य लोकांचं जेवणच पूर्ण होत नाही. खमंग फोडणी घातलेला दही-भात, जोडीला तळलेली मिरची आणि पापड शिवाय तोंडी लावायला बाळ कैरीचं लोणचं! वाहवा, तोंडाला पाणी सुटलं! मी लहान असताना माझी आई जो दही-भात करायची त्यात बारीक चिरलेला कांदा घालायची. मस्त लागायचा तो भात. खरं तर फोडणीच्या दहीभातात तसा कांदा घातला जात नाही. पण कधी तरी घालून बघा, आवडेल तुम्हालाही.
दही बुत्ती किंवा दही भात

साहित्य – १ वाटी तांदळाचा शिजवलेला भात, ३ वाट्या दही, १ वाटी किंवा आपल्या अंदाजाने दूध, २ लहान काकड्या किसून, १ टीस्पून आलं किसून, पाव वाटी बारीक चिरलेली कोथिंबीर, १-२ टीस्पून मेतकूट, मीठ चवीनुसार, २ हिरव्या मिरच्या बारीक चिरून (ऐच्छिक)
फोडणीचं साहित्य – १-२ टेबलस्पून तेल, मोहरी, पाव टीस्पून हिंग, १ टीस्पून उडदाची डाळ, १५-१६ कढीपत्त्याची पानं, ३-४ सुक्या लाल मिरच्या, ४-५ तळणीच्या मिरच्या

कृती –
१) दहीभात करण्याआधी निदान तासभर तरी भात मऊ शिजवून गार करत ठेवा. किंवा उरलेला शिळा भात असेल तर मग उत्तमच.
२) थंड झालेला भात एका टोपल्यात काढून तो हातानं नीट कुस्करून एकजीव करा. नंतर त्यात दही, दूध आणि मीठ घालून तो सरबरीत कालवा.
३) आता त्यात मेतकूट, काकडी, कोथिंबीर, आलं, हिरवी मिरची घालून नीट मिसळून घ्या.
४) दही भात कालवून ठेवला की तो आळतो म्हणून तो करताना जरा पातळसरच ठेवावा. म्हणून दिलेल्या प्रमाणाबरोबरच आपल्या अंदाजानं दही दूध घाला.

फोडणीची कृती –
१) लहान कढलीत तेल कडकडीत गरम करा. त्यात तळणीच्या मिरच्या घालून त्या तळून घेऊन बाजूला काढून ठेवा.
२) आता तेलात मोहरी घालून तडतडू द्या. त्यात उडदाची डाळ घालून ती चांगली लाल करा.
३) नंतर त्यात लाल मिरच्यांचे तुकडे घाला. ते तळले गेले की कढीपत्ता घाला.
४) सगळ्यात शेवटी हिंग घाला आणि तो फुलला की ताबडतोब गॅस बंद करा. हिंग जळता कामा नये पण कच्चाही राहता कामा नये.
ही फोडणी भातावर घाला. आवडत असल्यास तळणीच्या मिरच्या कुस्करून भातावर घाला. असं आवडत नसेल तर नुसत्याच बाजुला घेऊन खा.
फोडणीचा दही-भात तयार आहे. इतका भात वन डिश मील म्हणून केलात तर २-३ माणसांना पुरतो. या भाताबरोबर तळलेले पापडम्, बाळकैरीचं लोणचं, ते नसल्यास घरातलं कुठलंही लोणचं मस्त लागतं. माझ्या एका मैत्रिणीला दही भाताबरोबर बटाट्याच्या काच-या आवडतात. तेव्हा आपल्याला आवडत असेल ते तोंडीलावणं घेऊन दही-भाताचा आस्वाद घ्या. तुम्ही नेहमी करत असालच पण या पध्दतीनं करन बघा आणि कसा झाला होता ते कळवा नक्की.