कॅरॅमल पुडिंग

मुली लहान असल्यापासून आम्ही आमच्या घरात ख्रिसमस नेमानं साजरा करतो. लहान असताना त्यांना सांताक्लॉज रात्री काही तरी भेटवस्तू आपल्याला नक्की देणार असा गाढ विश्वास होता. आता मोठ्या झाल्यावर हा सांताक्लॉज आपला बाबाच आहे हे माहीत असल्यानं त्या वर्षभर त्याच्याकडून गिफ्ट्स उकळत असतात! आमच्या घरातल्या छोट्याशा बागेत ख्रिसमस ट्री आहे. ते मात्र आम्ही अजूनही सजवतो, म्हणजे निदान त्यावर दिवे तरी लावतो. माझी मोठी मुलगी सावनी गेली दोन वर्षं ख्रिसमसचं पारंपरिक जेवण या दिवशी बनवते. यावर्षीही तिनं शेपर्ड्स पाय, मीट लोफ, स्टफ्ड चिकन, व्हेज लोफ, मश्रूम्स इन व्हाइट सॉस, एगनॉग, पारंपरिक प्लम केक, ट्रायफल पुडिंग आणि पंपकीन पाय असं सगळं बनवलं होतं. आणि अतिशय सुरेख बनवलं होतं. सावनीनं केक एका महिन्यापूर्वीच बनवला होता. आणि त्याला विशिष्ट स्वाद येण्यासाठी ती रोज त्यात थोडी थोडी रम घालत होती. आता मला तर हे सगळे पदार्थ काही करता येत नाहीत. पण आज ख्रिसमस आहे त्यामुळे आज एका गोड पदार्थाची रेसिपी शेअर करणार आहे. कॅरॅमल पुडिंग किंवा कॅरॅमल कस्टर्ड हा गोड पदार्थ आपण बरेचदा खालेल्ला असेलच. अतिशय सोपा असलेला हा पदार्थ होतोही झटपट आणि लागतोही मस्त. आजची रेसिपी आहे कॅरॅमल पुडिंगची.

कॅरॅमल पुडिंग

तयार कॅरॅमल पुडिंग
तयार कॅरॅमल पुडिंग

साहित्य – ४ कप दूध, ६ अंडी, ८ टीस्पून साखर, कॅरॅमलसाठी १-२ वाट्या साखर, १ टीस्पून व्हॅनिला इसेन्स

कृती –
१) दोन चपट्या डब्यांमधे (पोळ्या ठेवायला वापरतो तसे डबे) कॅरॅमलसाठीची साखर अर्धीअर्धी घ्या. दोन्ही डबे गॅसवर मध्यम आचेवर ठेवा. सतत हलवत रहा.
२) साखर हळूहळू विरघळायला लागेल. विरघळलेल्या साखरेला आधी सोनेरी रंग येईल. नंतर ही साखर गडद तपकिरी रंगाची व्हायला लागेल. आपल्याला साखर जाळायचीच आहे. साखर विरघळून झालेला पाक सतत हलवत रहा.
३) त्यातून धूर यायला लागला की गॅस बंद करा.
४) नंतर चिमट्यानं डबा उचलून त्याच्या आतल्या सगळ्या बाजुंना हा पाक लागेल असा फिरवा. पाक गरम असतानाच हे करायचं आहे. हा पाक लवकर थंड होतो आणि नंतर घट्ट होतो.
पाक घट्ट झाला की तो डब्याच्या तळाशी सेट होईल. हे झालं कॅरॅमल तयार.
५) एका भांड्यात अंडी फोडून घ्या. ती चांगली फेस येईपर्यंत फेटून घ्या. हँड मिक्सरने फेटलीत तर खूपच लवकर फेटली जातील. हँड मिक्सर नसेल तर साध्या मिक्सरमधेही फेटता येतील.
६) नंतर त्यात दूध, साखर आणि व्हॅनिला इसेन्स घाला आणि परत चांगलं घुसळून घ्या.
७) आता हे मिश्रण गार झालेल्या कॅरॅमलच्या डब्यांमधे समप्रमाणात ओता.
८) कुकरमधे पाणी गरम करायला ठेवा. पाण्याला उकळी आली की एक डबा त्यात ठेवा. शिटी न लावता कुकरचं झाकण लावा. साधारणपणे २०-२५ मिनिटं वाफवा. गॅस बंद करा.
९) हे पुडिंग बाहेर काढून ठेवा. दुस-या डब्यालाही हीच कृती करा.
१०) पुडिंग गार झाल्यावर फ्रीजमधे थंड करायला ठेवा.
११) पुडिंग देताना डब्याच्या कडेच्या आतून हलक्या हातानं सुरी फिरवा. डब्यावर एक मोठी प्लेट उलटी ठेवा आणि डबा उलटा करा. पुडिंग प्लेटमधे पूर्णपणे निघेल.
१२) आता आपल्याला हवे तसे त्याचे तुकडे करा आणि सर्व्ह करा.


कॅरॅमल पुडिंग तयार आहे. काहीजण यात मिश्रण घुसळताना ब्रेडही घालतात. एका कपाला एक ब्रेड स्लाइस असं प्रमाण असतं. साखर जाळताना पिवळट रंगावर ठेवली तर पुडिंग तितकसं चवदार होत नाही म्हणून साखर गडद तपकिरी रंगावर जाळा. कडवट चवीचं कॅरॅमल जास्त चविष्ट लागतं. इतकं पुडिंग ७-८ लोकांना पुरेसं होईल. मग करून बघा आणि नक्की कळवा पुडिंग कसं झालं होतं ते.

Advertisements

4 comments

Leave a Reply

Fill in your details below or click an icon to log in:

WordPress.com Logo

You are commenting using your WordPress.com account. Log Out /  Change )

Google photo

You are commenting using your Google account. Log Out /  Change )

Twitter picture

You are commenting using your Twitter account. Log Out /  Change )

Facebook photo

You are commenting using your Facebook account. Log Out /  Change )

Connecting to %s