माझ्या धाकट्या मुलीला शर्वरीला हिरव्या रंगाच्या भाज्या पाहिल्या की कसं तरी होतं म्हणे! फक्त भेंडी आणि तोंडली या दोनच हिरव्या भाज्या तिला आवडतात. आणि अर्थातच ताजे मटार. या मोसमात ती अक्षरशः किलोभर मटार रोज खाते. आता ती अकरावीत आहे. पण गेल्या वर्षीपर्यंत या मोसमात ती शाळेतून आल्याबरोबर डायनिंग टेबलवर ताजे मटार ठेवलेले आहेत की नाही ते बघायची. मला माझा भाजीवाला एकदा म्हणालाही, ताई, एक विचारू का? इतके मटार तुम्ही रोज नेता त्यांचं काय करता! तर शर्वरीला हिरव्या भाज्या आवडत नाहीत म्हणून माझा जीव तुटतो. एक बरं आहे की, तिला पनीर खूप आवडतं, मग हिरवी भाजी घालून केलेलं पनीर तरी खाईल म्हणून मी अधूनमधून पालक पनीर करते. पण त्यातही पनीरचे मोठे तुकडे घातले तर ती फक्त ते काढून खाते म्हणून मी पनीरही जितकं बारीक चिरता येईल तितकं चिरते. पण आपण काहीही केलं तरी आपली मुलं ही आपल्यापेक्षा अधिक शहाणी असतात हे खरंच. असो. तर आज मी तुमच्याबरोबर पालक पनीरची रेसिपी शेअर करणार आहे. ही रेसिपी अगदी अस्सल पंजाबी नसेलही. पण झटपट होणारी आहे आणि सौम्य चवीच्या भाज्या आवडणा-यांना नक्की आवडेल अशी आहे.
पालक-पनीर

साहित्य – ३ जुड्या पालक, २ वाट्या पनीरचे चौकोनी तुकडे, २ कांदे बारीक चिरलेले, १ टोमॅटो बारीक चिरलेला (ऐच्छिक), १ टेबलस्पून बारीक चिरलेला लसूण, २ टीस्पून किसलेलं आलं, २ हिरव्या मिरच्या बारीक चिरलेल्या, २ टीस्पून धणे पूड, १ टीस्पून जिरे पूड, २ टीस्पून लाल तिखट, अर्धा टीस्पून एव्हरेस्ट गरम मसाला, १ टीस्पून साखर, मीठ चवीनुसार, १ टेबलस्पून तेल, थोडं जिरं
कृती –
पनीरची कृती – या पेजवरच्या पनीरच्या भाज्यांच्या रेसिपीत मिळेल. किंवा रेडीमेड पनीर वापरा.
भाजीची कृती –
१) पालक स्वच्छ धुवून मोठा मोठा चिरा. एका मोठ्या पातेल्यात पालक आणि अर्धी वाटी पाणी घाला.
२) मोठ्या गॅसवर झाकण ठेवून मधूनमधून हलवत पालक शिजवा. पालक फार काळा होईपर्यंत शिजवू नका.
३) शिजल्यावर पालक त्यातल्या पाण्यासकट थंड करायला ठेवा. गार झाल्यावर मिक्सरमध्ये पालकाची मऊ पेस्ट करून घ्या.
४) आता एका कढईत तेल गरम करा. त्यात जिरं घालून तडतडू द्या. आता त्यात आलं-लसूण-मिरची घाला. चांगलं परतून घ्या.
५) नंतर त्यात बारीक चिरलेला कांदा घाला. कांदा चांगला परतायचा आहे पण फार लाल करायचा नाही.
६) कांदा शिजला की त्यात टोमॅटो घालून परता.
७) टोमॅटो शिजला की त्यात तिखट, मीठ, साखर, गरम मसाला, धणे पूड, जिरे पूड घाला.
८) सगळं नीट हलवून घ्या. दोन मिनिटं चांगलं परता. नंतर त्यात पालकाची पेस्ट घाला. चांगलं हलवून घ्या आणि झाकण ठेवा.
९) मंद आचेवर पाच मिनिटं पालक शिजू द्या. पालक आधी शिजलेलाच आहे, त्यामुळे फार जास्त शिजवू नका.
१०) नंतर झाकण काढून त्यात पनीरचे तुकडे घाला. नीट मिसळून घ्या आणि परत झाकण घालून मंद आचेवर ३-४ मिनिटं शिजवा. गॅस बंद करा.

पालक-पनीर तयार आहे.
पालक पनीर करताना आवडत असेल तर तेलाऐवजी तूप वापरू शकता. मसाल्याचं प्रमाण आवडत असल्यास वाढवा पण ही भाजी सौम्यच चांगली लागते. बरेच लोक पनीरचे तुकडे तळून मग घालतात. पण मला स्वतःला त्या चिवट तुकड्यांऐवजी मऊ तुकडेच आवडतात. शिवाय पोटात तेलही कमी जातं.
या भाजीबरोबर गरम साधे पराठे, किंवा फुलके किंवा पोळ्याही चांगल्या लागतात. बरोबर एखादं कचुंबर करा किंवा कांदा उभाउभा चिरून तो हातानं मोकळा करा. त्यात तिखट, मीठ, लिंबाचा रस घाला आणि हा मसाला कांदा बरोबर द्या. बरोबर एखादी पंजाबी डाळ करा. थंडीच्या दिवसांत मस्त गरमागरम जेवण होईल. मग करून बघा आणि नक्की कळवा कसं झालं होतं पालक-पनीर ते. केलंत तर फोटो काढा आणि पाठवा.
Aatach kela hota palak paneer… Supertasty.. Tnx for the recipe
LikeLike