कवठ किंवा Wood Apple हे फळ आपल्याकडे सर्रास मिळत नाही. मी आता गेली वीस वर्षं मुंबईत आहे पण मी कवठ फार कमीदा बाजारात बघितलं आहे. बीडला आणि औरंगाबादला मात्र मी कवठं खूप बघितली आहेत. कवठाची झाडंही बघितली आहेत. मी लहान असताना आई कवठाची चटणी, कवठाचं पंचामृत आणि कवठाचा जॅमही करायची. कवठाच्या जॅमचा रंग फार छान दिसायचा. शिवाय लहान असताना पिकलेल्या कवठाच्या गरात गूळ, तिखट-मीठ घालून हे गोळे काडीला लावून आम्ही लॉलीपॉपसारखे खायचो. मस्त लागायचे, आठवणीनं सुध्दा तोंडाला पाणी सुटलं आहे! मुंबईत सध्या बचत गटांचं महालक्ष्मी सरस हे प्रदर्शन लागलं आहे, तिथे मला परवा कवठं मिळाली. माझ्या घरात मी सोडून इतर कुणीही कवठं बघितलीही नव्हती. मग मी अर्थातच कवठं घेतली. घरी आल्यावर लगेचच कवठाची आंबटगोड चटणी आणि पंचामृत केलं.
अर्थात एक गोष्ट लक्षात घ्यायला हवी की कवठाला एक प्रकारचा उग्र असा आंबूस वास असतो. तो वास जर आवडला नाही तर मग मात्र कवठाचे प्रकार आवडणार नाहीत. पण आंबूस वासाचा त्रास झाला नाही तर मात्र कवठाचे हे पदार्थ तुम्हाला नक्की आवडतील. आज मी कवठाच्याच दोन रेसिपीज शेअर करणार आहे. पहिली आहे कवठाच्या पंचामृताची तर दुसरी आहे कवठाच्या चटणीची. मग जर कवठं मिळाली तर नक्की करून बघा आणि कळवा कसे झाले होते हे पदार्थ ते.
कवठाचं पंचामृत

साहित्य – मध्यम आकाराचं पिकलेलं एक कवठ किंवा कवठाचा वाटीभर गर, कवठाचा गर जर फार आंबट असेल तर अर्धी ते पाऊण वाटी गूळ अन्यथा पाव ते अर्धी वाटी गूळ, १ टेबलस्पून तिळाचा कूट, १-२ हिरव्या मिरच्या, २-३ कढीपत्त्याची पानं, १ टीस्पून मेथी दाणे, १ टीस्पून काळा मसाला, पाव टीस्पून लाल तिखट, मीठ चवीनुसार, २ टीस्पून तेल, थोडी मोहरी, चिमूटभर हिंग, चिमूटभर हळद
कृती –
१) कवठाचा गर मिक्सरमध्ये जाडसर फिरवून घ्या.
२) एका कढईत तेल गरम करून त्यात मोहरी घालून ती तडतडू द्या. आता त्यात हिंग, हळद, मेथी दाणे घाला.
३) मेथी दाणे लाल झाले की कढीपत्त्याची पानं आणि मिरचीचे तुकडे घाला.
४) जरासं हलवून त्यात कवठाचा गर घाला. तो फोडणीत नीट मिसळून त्यात पाव वाटी पाणी घाला आणि झाकण ठेवून गॅस मंद ठेवा. २-३ मिनिटं शिजू द्या.
५) नंतर झाकण काढून त्यात गूळ, तिखट, मीठ, काळा मसाला, तिळाचं कूट घाला. नीट हलवून घ्या.
६) पाण्याचं प्रमाण आपल्याला जितपत घट्ट पातळ हवं असेल तितकं ठेवा. परत झाकण ठेवा आणि मंद आचेवर ५ मिनिटं शिजू द्या.
७) गॅस बंद करा. कवठाचं पंचामृत तयार आहे.
कवठाची चटणी
साहित्य – १ वाटी कवठाचा गर, अर्धी वाटी गूळ, २-३ टीस्पून लाल तिखट, २ टीस्पून जिरं, मीठ चवीनुसार
कृती – सगळं साहित्य मिक्सरच्या भांड्यात घालून जाडसर चटणी वाटा.
हे दोन्ही पदार्थ जेवणात तोंडीलावण्याचे पदार्थ म्हणून मस्त लागतात.
मग करून बघा आणि नक्की कळवा कसे झाले होते ते.