नुकतीच संक्रांत झाली. अर्थातच घरोघरी गूळपोळ्या आणि तिळगुळाच्या लाडवांचा बेत झालाच असेल. मला गूळ-पोळी करता येत नाही. पण मला ती शिकायची आहे. तिळाचे लाडू मात्र मस्त जमतात, कारण हे तिळाचे लाडू करायला अतिशय सोपे आणि बिघडण्याची शक्यता शून्य असे आहेत. आपल्याकडे संक्रांतीपासून रथसप्तमीपर्यंत हळदी-कुंकू केलं जातं. हळदी-कुंकवाच्या कार्यक्रमांमध्ये लुटण्याच्या वस्तूंबरोबरच तिळाच्या लाडवांमध्येही वैविध्य असतं. काही घरांमध्ये गुळाचा पाक करून लाडू केले जातात तर काही जण साखरेच्या पाकात करतात. काहीजण त्यात डाळवं, खोबरं, दाणे घालतात. सामान्यपणे हे लाडू कडक, चिक्कीच्या गुळापासून बनवलेले असतात. पण आमच्याकडे मराठवाड्यात आणि विदर्भातही तिळकुटाचे लाडू केले जातात. हा मऊ पण खुसखुशीत लाडू अप्रतिम लागतो. आज मी याच लाडूंची रेसिपी शेअर करणार आहे. संक्रांत होऊन गेली असली तरी अजून लाडूंचे हप्ते करणं बाकी असेलच. कारण माझ्या घरी महिनाभरात किमान तीनदा हे लाडू होतात. तीन किलो तीळ आणि जवळपास अडीच ते पावणेतीन किलो गुळाचे मिळून! तुम्हीही एकदा या पध्दतीनं लाडू करून बघा, खा आणि नक्की कळवा कसे झाले होते ते.
तिळगुळाचे मऊ लाडू

साहित्य – १ किलो पॉलिश न केलेले तीळ, पाऊण किलो केमिकल विरहीत गूळ किसून, १-२ टीस्पून जायफळ
कृती –
१) तीळ कढईत घालून मध्यम आचेवर खमंग भाजून घ्या. तीळ चांगले तडतडायला लागले आणि खमंग वास यायला लागला की तीळ भाजले गेले असं समजा. तीळ लाल झाले पाहिजेत पण काळे होता कामा नयेत.
२) तीळ थंड करायला ताटात काढून ठेवून द्या.
३) तीळ कोमट झाले की मिक्सरमध्ये जाडसर कूट करून घ्या.
४) नंतर हे जाडसर कूट आणि किसलेला गूळ तसंच जायफळ पूड हातानं मस्त एकजीव करा.

५) हे मिश्रण परत थोडंथोडं मिक्सरमध्ये फिरवून घ्या. अगदी लगदा करू नका, थोडंसं जाडसरच (माझी आई ओबडधोबड म्हणते!) ठेवा.
६) नंतर परत हातानं चांगलं एकत्र करा आणि आपल्याला हवे तसे लहान-मोठ्या आकारात लाडू वळा.
इतक्या मिश्रणात मध्यम आकाराचे ६०-६५ लाडू होतात. किलोभर करायचे नसतील तर वाटीनं मोजून करा. साधारणपणे १ वाटी तीळ असतील तर पाऊण वाटी गूळ असं प्रमाण घ्या.
जायफळ ऐच्छिक आहे. नाही घातलंत तरी चालेल, मला आवडतं म्हणून मी घालते. तीळ कोमट असताना कूट केलंत तर तिळाला जास्त तेल सुटतं म्हणून कोमट असतानाच कूट करा. या लाडवांना वरून अजिबात तेल किंवा तूप लागत नाही कारण तिळामध्ये भरपूर तेल असतं. हे लाडू अप्रतिम लागतात कारण एकतर यात पॉलिस न केलेले तीळ वापरले आहेत शिवाय केमिकल विरहीत गूळ.
Thanks so much didi..tilache ladu banvayla ghetle hote..mhatla ekda tujha block vachunach karen..happy sankranti !
LikeLike
Thanks!
LikeLike
Kal kele mi he ladu… Apratim zalet chavila… Ardhe ladu kalach sampale… Khup simple recipe… Ektine manage kelet… Ya recipe sathi khup thanks
LikeLike