मिश्र भाज्यांचं लोणचं

जानेवारी महिना आला की, संक्रांतीची चाहूल लागते आणि संक्रांत म्हटली की तिळाच्या लाडूंबरोबरच, भोगीचं किंवा धुंदुरमासाचं जेवण हमखास आठवतं. मी या महिन्यात, या मोसमात केल्या जाणा-या पदार्थांच्या रेसिपीज शेअर करणार आहेच. धुंदुरमासाचं जेवण, उंधियो, तिळाचे कुटून केले जाणारे लाडू, बाजरीचा खिचडा, कवठाचं पंचामृत आणि चटणी हे सगळे पदार्थ मी या महिन्यात करणार आहे आणि अर्थातच त्यांच्या सचित्र रेसिपीजही शेअर करणार आहे.
हिवाळ्यात मंडईत गेलं की ताज्या ताज्या भाज्यांचे वेगवेगळ्या रंगांचे ढीग बघितले की मन हरखून जातं. किती भाजी घेऊ आणि किती नको असं होतं. या दिवसांत मिळणा-या भाज्यांना चवही फार मस्त असते. मग त्या पालेभाज्या असोत, किंवा फळभाज्या. हिवाळ्यात भाज्या मिळतातही अगदी ताज्या आणि करकरीत. या करकरीत भाज्या कच्च्या खायलाही अप्रतिम लागतात. फ्लॉवरचंच बघा ना, कच्च्या प्लॉवरची पचडी हिवाळ्यात जशी चवदार लागते तशी इतरवेळी लागत नाही. मटार आता जरी वर्षभर मिळत असला तरी या दिवसांतल्या मटारची चव निराळीच. आणि या दिवसांतल्या गाजरांचा केशरी-गुलाबी रंग आणि चवही निराळीच. हिवाळा आला की आमच्या घरात भाज्यांच्या लोणच्याची आठवण काढली जाते. माझ्या नव-याला हे लोणचं फार आवडतं म्हणून ते मी दोन-तीनदा तरी करतेच करते. ताज्या, करकरीत भाज्यांचं हे लोणचं जरी जास्त टिकत नसलं तरी ते लागतं अफलातून. म्हणूनच आजची रेसिपी आहे मिश्र भाज्यांच्या लोणच्याची.

मिश्र भाज्यांचं लोणचं

मिश्र भाज्यांचं तयार लोणचं
मिश्र भाज्यांचं तयार लोणचं


साहित्य – १ वाटी फ्लॉवरचे लहान लहान काढलेले तुरे, १ वाटी गाजराचे बारीक चौकोनी तुकडे, १ वाटी हिरवी मिरची बारीक चिरलेली, १ वाटी आंबेहळद आणि ओल्या हळदीचे बारीक चौकोनी तुकडे, ४ लिंबांचा रस, १०० ग्रॅम तयार कैरी लोणचे मसाला (केप्र, बेडेकर किंवा तत्सम कुठलाही), (मसाला नसेल तर अर्धी वाटी तिखट, पाव वाटी मोहरीची डाळ, २ टीस्पून हळद, १ टेबलस्पून मेथी दाणे तळून केलेली पूड मिसळा आणि वापरा), पाव वाटी लाल तिखट (ऐच्छिक), मीठ चवीनुसार


कृती –
१) एका टोपल्यात चिरलेल्या भाज्या घ्या. त्यात मसाला, तिखट आणि मीठ घाला, लिंबाचा रस घाला.
२) हलक्या हातानं मिसळून घ्या. काचेच्या बाटलीत भरा. भाज्यांचं लोणचं तयार आहे.

लोणच्यासाठी एकत्र केलेल्या भाज्या
लोणच्यासाठी एकत्र केलेल्या भाज्या


हे लोणचं फ्रीजमधे ठेवावं लागतं. फ्रीजमधे २-३ आठवडे सहज टिकतं. मी यात तेल घालत नाही, पण तुम्हाला आवडत असेल तर २ टेबलस्पून तेल कडकडीत गरम करून त्यात मोहरी आणि मेथीदाणे घालून खमंग फोडणी करा. ती अगदी गार होऊ द्या आणि मग ती लोणच्यावर घालून हलक्या हातानं मिसळा. तिखटाचं आणि लिंबाच्या रसाचं प्रमाण आवडीनुसार कमी जास्त करा. मला काल कैरीच्या लोणच्याचा मसाला मिळाला नाही म्हणून मी मिरचीच्या लोणच्याचा मसाला घातला आहे. या मसाल्यात मोहरीचं प्रमाण जास्त असतं. पण तरीही लोणचं मस्त झालं आहे.
या लोणच्यात मटार, गवार, कारलं या भाज्याही छान लागतात. शिवाय काहीजण आलंही घालतात. आपल्या आवडीनुसार आणि कल्पनाशक्ती वापरून वेगळ्या पध्दतीनं लोणचं करून बघा. आणि मला नक्की कळवा लोणचं कसं झालं ते. केलंत तर फोटो काढा आणि मला पाठवा.

4 thoughts on “मिश्र भाज्यांचं लोणचं

  1. नक्की सांगेन विद्या. जूनमध्ये मी घालेन तेव्हा रेसिपी शेअर करेन नक्की.

   Like

 1. भाज्यांचं प्रमाण वा प्रकार वाढवले जसं की मी करताना त्यात ह्या सर्व भाज्या तर घालणारच आहे पण मी मटरही घालणार आहे तर मसाला वा हळदीचं प्रमाण वाढणार आहे का?

  Like

  1. सॉरी, उशीरा उत्तर देतेय. हो, भाज्यांचं प्रमाण वाढलं तर मसाल्याचं प्रमाणही वाढवायचं.

   Like

Leave a Reply

Fill in your details below or click an icon to log in:

WordPress.com Logo

You are commenting using your WordPress.com account. Log Out /  Change )

Google photo

You are commenting using your Google account. Log Out /  Change )

Twitter picture

You are commenting using your Twitter account. Log Out /  Change )

Facebook photo

You are commenting using your Facebook account. Log Out /  Change )

Connecting to %s

%d bloggers like this: