सोलाण्यांच्या तिखट करंज्यांची आमटी

माझी बहिण मेघन आणि मी नेहमी एकमेकींबरोबर रेसिपीज शेअर करत असतो. विशेषतः काही वेगळं केलं किंवा कुठे वेगळा पदार्थ खाल्ला तर हमखास लगेचच एकमेकींना सांगतो. तो पदार्थ करूनही बघतो. परवाच मेघनचा फोन आला तो अशाच एका पदार्थाबद्दल सांगण्यासाठी. ती तिच्या एका मैत्रिणीकडे जेवायला गेली होती, तिथे तिनं सोलाण्यांच्या तिखट करंज्यांची आमटी खाल्ली. ही आमटी फारच चविष्ट होती असं तिनं मला सांगितलं आणि वर तुझ्या पेजसाठी हा एक नवीन पदार्थ होईल असंही म्हणाली. सध्या सोलाण्यांचा मोसम आहेच. म्हणून मीही ही आमटी लगेचच करून बघितली. ही रेसिपी आहे मेघमची मैत्रीण कांचन जयस्वाल हिची.
पूर्व-आशियाई देशांमध्ये (चीन, जपान, कोरिया, इंडोनेशिया इत्यादी) डिमसम किंवा वाँटन हा पदार्थ फार लोकप्रिय आहे. आपल्याकडच्या उकडीच्या मोदकांच्या धर्तीवरचा हा पदार्थ. मैद्याच्या किंवा तांदळाच्या पिठाच्या पातळ पारीमध्ये वेगवेगळ्या प्रकारचं शाकाहारी किंवा मांसाहारी सारण भरून हा पदार्थ केला जातो. आणि शक्यतो तो उकडला जातो. काही ठिकाणी तळतातही. तर ही जी आमटी आहे ती आपण डिमसमचीच आमटी म्हणून शकतो. कारण या सोलाण्यांच्या करंज्या तळायच्या नाहीत तर पाणी फोडणीला घालून त्यात त्या उकडायच्या आहेत. आमच्याकडे परवा जेवायला काही जण होते तेव्हा मी हा पदार्थ पहिल्यांदाच केला. तो चवीला उत्तम झाला होता. कृती पुढच्या वेळेला अजून परफेक्ट होईल अशी मला खात्री आहे. याचं कारण म्हणजे मी मेघनकडून रेसिपी फोनवर ऐकली होती. बघितली नव्हती.
सोलाण्यांची ही आमटी आमच्याकडे त्या दिवशी जेवायला आलेल्या सुनील-अपर्णा बर्वे, नीना कुलकर्णी आणि प्रतिमा कुलकर्णी यांना खूप आवडली. तेव्हा तुम्हीही करून बघा आणि नक्की कळवा कशी झाली होती ते!

सोलाण्यांच्या तिखट करंज्यांची आमटी

सोलाण्यांच्या तिखट करंज्यांची आमटी
सोलाण्यांच्या तिखट करंज्यांची आमटी

साहित्य – ३ वाट्या सोलाणे (ओले हरभरे), २ मोठे कांदे बारीक चिरून, १२-१५ लसूण पाकळ्या, १ ते दीड इंच आलं, (पेस्ट करा) वाटीभर बारीक चिरलेली कोथिंबीर, २ टेबलस्पून डाळीचं पीठ (बेसन), २ टीस्पून तिखट, मीठ चवीनुसार, फोडणीसाठी – २ टेबलस्पून तेल, मोहरी, हिंग, हळद. पोळ्यांना भिजवतो तशी पण अगदी घट्ट भिजवलेली कणीक

कृती –

१) सोलाणे मिक्सरमधून जाडसर फिरवून घ्या.
२) आता एका कढईत अर्धं तेल गरम करून नेहमीसारखी फोडणी करा. नंतर त्यात कांदा घाला आणि मधून मधून हलवत चांगला होऊ द्या.
३) कांदा शिजला की त्यात आलं-लसणाची पेस्ट घाला. परत चांगलं परता.
४) पेस्टचा कच्चा वास गेला आणि मिश्रण चांगलं परतलं गेलं की त्यात कोथिंबीर, हळद, तिखट, मीठ आणि कोथिंबीर घाला. नीट मिसळून घ्या.
५) आता त्यात सोलाण्यांची भरड घाला. नीट हलवून झाकण ठेवून, मधेमधे हलवत ५ मिनिटं शिजू द्या.
६) सोलाणे शिजत आले की त्यात डाळीचं पीठ घाला. हलवून घ्या आणि झाकण ठेवून २-३ मिनिटं शिजू द्या. गॅस बंद करा.


७) हे सारण एका ताटात काढून थंड होऊ द्या. सारणातलं पाऊण वाटी सारण बाजूला ठेवून द्या, आपल्याला ते आमटीत वापरायचं आहे.
८) करंज्या करण्यासाठी अगदी लहानशा लिंबाएवढ्या कणकेची पारी लाटा. त्यात सारण भरा आणि करंजीसारखं दुमडून कडा अगदी घट्ट बंद करा.
९) हवं असल्यास करंजीच्या कातण्यानं कापा. पण आवश्यक नाही. पारी लाटताना थोडी जाडसरच लाटा. अशा सगळ्या करंज्या करून घ्या. बाजूला ठेवा.


१०) आता एका मोठ्या पसरट कढईत किंवा पातेल्यात उरलेलं तेल घालून नेहमीसारखी फोडणी करा.
११) फोडणी झाली की त्यात थोडंसं तिखट घाला आणि साधारणपणे दीड लिटर पाणी घाला. पाण्याला अगदी खळखळून उकळी येऊ द्या.
१२) पाणी खळाखळा उकळायला लागलं की त्यात हलक्या हातानं करंज्या सोडा.
१३) करंज्या सोडल्यावर गॅस मध्यम आचेवर ठेवा. सतत हलवू नका. अगदी हलक्या हातानं, उलथन्यानं हलवा म्हणजे करंज्या मोडणार नाहीत. करंज्या अगदी २-३ मिनिटंच शिजवा.
१४) आता त्यात बाजूला ठेवलेलं सारण घाला. आमटी २-३ मिनिटं उकळा आणि गॅस बंद करा.

करंज्या सोडल्यावर हलक्या हातानं हलवा
करंज्या सोडल्यावर हलक्या हातानं हलवा


सोलाण्यांच्या तिखट करंज्यांची आमटी तयार आहे.
सध्याच्या थंडीत ही आमटी नुसतीच सूपसारखी प्यायला अफलातून लागते. पण हवं असल्यास भाकरीबरोबर किंवा भाताबरोबरही खाऊ शकता. करंज्या करायच्या नसतील तर मोदकही करू शकता. मोदक केलेत तर मोडण्याची भीती कमी. ही आमटी झणझणीतच मस्त लागते तेव्हा तिखटाचं प्रमाण आवडीनुसार वाढवा. सोलाण्यांऐवजी तुरीचे दाणे किंवा मटारही वापरून बघा. फक्त मटारच्या आमटीला थोडी गोडसर चव येईल.
या रेसिपीज शेअर करण्यासाठीच आहेत तेव्हा बिनधास्त शेअर करा. फक्त शेअर करताना या पेजचा आवर्जून उल्लेख करा.

Leave a Reply

Fill in your details below or click an icon to log in:

WordPress.com Logo

You are commenting using your WordPress.com account. Log Out /  Change )

Facebook photo

You are commenting using your Facebook account. Log Out /  Change )

Connecting to %s

%d bloggers like this: