
जिंदगी जब भी तेरी बज्म मे लाती है हमे हे उमराव जानमधलं गाणं ऐकायला जितकं तलम आहे तितकंच ते बघायलाही नेत्रसुखद आहे. पिवळ्याधमक फुलांनी फुललेल्या मोहरीच्या शेतांमध्ये देखण्या रेखाला आणि गोड फारूख शेखला बघणं किती आनंददायी आहे. हे गाणं असो किंवा तुझे देखा तो ये जाना सनमसारखी पंजाबातल्या सरसोंच्या शेतात चित्रीत झालेली इतर गाणी असोत ती पडद्यावर पाहात राहावीशी वाटतात.
१९९०-९१ मध्ये आम्ही राजस्थान, उत्तर प्रदेशचा काही भाग आणि मध्य प्रदेशचा काही भाग अशी रोड-ट्रिप केली होती. आग्र्याहून परतताना मध्य प्रदेशला ओलांडून आम्ही औरंगाबादला परतलो. या भागातल्या अगदी लक्षात राहिलेल्या अशा दोन गोष्टी. एक म्हणजे त्यावेळी कुविख्यात असलेलं चंबळचं खोरं आणि दुसरी म्हणजे मैलोनमैल पसरलेली, बहरलेली सरसोची शेती. ती पिवळीधमक शेती हॉलंडमधल्या ट्युलिपच्या शेतीइतकीच सुंदर दिसते असं माझं मत आहे.
अस्सल पंजाबी शाकाहारी जेवण हे अतिशय चविष्ट असतं. लोणी किंवा साजुक तूप वापरून केलेल्या भाज्या, रोट्या, पराठे, मंद आचेवर शिजवलेल्या चविष्ट डाळी, अहाहा! थंडीच्या मोसमात आपल्याकडेही सरसो किंवा मोहरीची भाजी मिळते. ही भाजी काहीशी मुळ्याच्या भाजीसारखी दिसते. या भाजीच्या चवीची सवय व्हायला लागते. पण जर का एकदा तुम्हाला ही भाजी आवडली तर मग तुम्ही ती परत परत खाल. करायला अतिशय सोपी आणि चवदार अशा सरसों का सागची रेसिपी मी आज शेअर करणार आहे.
सरसों का साग

साहित्य – १ मोठी जुडी सरसो किंवा मोहरीची भाजी, अर्धी जुडी पालक, अर्धी लहान जुडी मेथी, १ लहान जुडी चंदनबटवा किंवा बतुआ, ८-१० लसणाच्या पाकळ्या, १ ते दीड इंच आलं, अर्धा टीस्पून हळद, पाव टीस्पून हिंग, २ मोठे कांदे बारीक चिरून, २ टोमॅटो बिया काढून बारीक चिरून, २ टेबलस्पून मक्याचं पीठ, २ टीस्पून तिखट, मीठ चवीनुसार, थोडं घरगुती लोणी वरून घालण्यासाठी
वरून घालण्यासाठीचा गरम मसाला – मिरं, लवंग, दालचिनी आणि बडी वेलची समप्रमाणात घ्या. कोरडंच वाटून मिक्सरमध्ये पूड करून ठेवा.
फोडणीसाठी – १ टेबलस्पून तेल, १ टेबलस्पून तूप, १ टीस्पून जिरं, चिमूटभर हळद
कृती –
१) सरसो, पालक, मेथी आणि चंदनबटवा निवडून स्वच्छ धुवून घ्या. पाणी निथळलं की ही सगळी भाजी जाड जाड चिरा.
२) चिरलेली भाजी कुकरच्या भांड्यात घाला. मोठा कुकर नसेल तर डायरेक्ट लहान कुकरमध्ये घाला. त्यातच लसणाच्या पाकळ्यांचे तसंच आल्याचे तुकडे करून घाला. हळद आणि हिंग घाला. १ वाटी पाणी घाला.
३) कुकरचं झाकण लावून दोन शिट्या करा. प्रेशर सुटल्यावर शिजलेली भाजी थंड करायला ठेवा.
४) भाजी थंड झाली की मिक्सरच्या भांड्यात घालून बारीक वाटा. त्यातच मक्याचं पीठ घाला आणि परत एकजीव वाटा.
५) एका कढईत तेल आणि तूप एकत्र करून गरम करा. गरम झालं की त्यात जिरं घालून तडतडू द्या.
६) आता त्यात हळद आणि हिंग घाला. नंतर त्यात कांदा घालून गुलाबी होऊ द्या.
७) कांदा मऊ शिजला पाहिजे पण लाल होता कामा नये. कांदा शिजला की त्यात टोमॅटो घाला.
८) टोमॅटोला तेल सुटेपर्यंत चांगलं शिजवा. नंतर त्यात तिखट घाला. चांगलं हलवून घ्या आणि त्यात वाटलेली भाजी घाला.
९) मीठ घाला आणि नीट मिसळून घ्या. भाजी रटरटायला लागली की झाकण घाला आणि पाच मिनिटं शिजू द्या.

१०) झाकण काढून चिमूटभर गरम मसाला घाला. हलवून घ्या आणि गॅस बंद करा.
सरसों का साग तयार आहे. सरसों का साग बरोबर मक्याची रोटी देतात.
मक्याची रोटी – मक्याचं पीठ बाजारत तयार मिळतं. २ वाट्या पीठ असेल तर १ वाटी कणीक घाला. भाकरीचं पीठ भिजवतो तसं भिजवा. थापून रोट्या करा किंवा हलक्या हातानं लाटून करा. भाजताना तूप लावून भाजा. इतक्या पिठात मध्यम आकाराच्या ५-६ रोट्या होतात.

सरसों का साग देताना वर घरगुती लोणी घाला. बरोबर पांढ-या कांद्याच्या चकत्या आणि लोणचं द्या. अप्रतिम जेवण होतं. हिवाळ्यात माझ्या घरी निदान दोन-तीनदा तरी हा बेत असतो. करून बघा, फोटो काढा आणि मला पाठवा. शिवाय हा बेत कसा झाला तेही नक्की कळवा.
Hi Sayali, have brought all the vegetables. Might try it in a day or two.
LikeLike
Namaskar Mavashi, I have tried makai roti few times. But it keeps breaking and finally becomes very thick. and layers dont separate. Can you please post tips for making makki roti
LikeLike