कोशिंबिरी, रायती, सॅलड्स

काही दिवसांपूर्वी मी एक नाश्त्याच्या पदार्थांची एकत्रित माहिती देणारी पोस्ट लिहिली होती. तशाच काही कोशिंबिरींची, भाज्यांची, आमटी, रस्से इत्यादींची आणि मेन्यूंची माहिती देणा-या पोस्ट्स लिहाव्यात असा विचार आहे. शिवाय रोजच्या स्वयंपाकाचं नियोजन कसं करावं अशीही एक पोस्ट लिहिणार आहे. अन्न हेच पूर्णब्रह्मची एक मैत्रीण मनीषा कुलकर्णी हिनं कोशिंबिरींबद्दल पोस्ट लिहशील का असं विचारलं होतं, तेव्हा आजची ही पोस्ट खास तिच्यासाठी आणि अर्थातच तुम्हा सर्वांसाठीही.

बिटाची कोशिंबीर
बिटाची कोशिंबीर

१) खमंग काकडी – काकडी अगदी बारीक चिरा किंवा चोचवून घ्या. त्यात कोथिंबीर, दाण्याचं कूट, साखर, मीठ, आवडत असल्यास ओलं खोबरं घाला. वरून हिरवी मिरची, मोहरी आणि हिंगाची खमंग फोडणी द्या.
२) काकडीची दह्यातली कोशिंबीर – काकडी बारीक चिरा. दही थोडा वेळ पंचावर टाकून जरासं पाणी निथळू द्या. करताना काकडीत कोथिंबीर, दही, साखर, मीठ, दाण्याचं कूट घाला. वरून मोहरी, हिंग, हिरवी मिरचीची फोडणी द्या.
३) काकडीची पचडी – काकडी बारीक चिरा. त्यात भिजवलेली मूग डाळ घाला.कोथिंबीर, साखर, मीठ घाला. वरून हिरवी मिरची, मोहरी हिंगाची फोडणी द्या.
४) कांद्याची कोशिंबीर – पांढरा किंवा लाल कांदा मध्यम आकारात चिरून घ्या. त्यात दाण्याचं कूट, मीठ, लाल तिखट, आवडत असल्यास चिमूटभर साखर घाला. दही घालून कालवा. वरून मोहरी, हिंगाची फोडणी द्या. ही कोशिंबीर साखर न घालता जास्त चांगली लागते.


५) कांदा-टोमॅटोची कोशिंबीर – कांदा, टोमॅटो, हिरवी मिरची आणि कोथिंबीर बारीक चिरा. त्यात पंचावर पाणी निथळलेलं दही घाला. साखर, मीठ, दाण्याचं कूट घाला. फोडणीची गरज नाही.
५) गाजर-कांदा कोशिंबीर – जाड किसणीनं गाजरं किसा. कांदा बारीक चिरा. साखर, मीठ, दाण्याचं कूट घाला. कोथिंबीर घाला. वरून हिंग, मोहरीची फोडणी द्या.
६) बिटाची कोशिंबीर – बीट कुकरला उकडून घ्या. सालं काढून बारीक चिरा किंवा जाडसर किसून घ्या. त्यात दही, जिरे पूड, थोडंसं तिखट, बारीक चिरलेली कोथिंबीर घाला.
७) मुळ्याची कोशिंबीर – मुळा जाड किसणीनं किसून घ्या. त्यात दही, तिखट, मीठ, दाण्याचं कूट आणि बारीक चिरलेली कोथिंबीर घाला. साखर घालू नका.
८) मुळ्याचा चटका – मुळा जाड किसणीनं किसून घ्या. भिजवलेली चणा डाळ जाडसर वाटून त्यात मुळा हलक्या हातानं कालवून घ्या. मीठ घाला. वरून हिंग, मोहरी, हिरव्या मिरचीची फोडणी घाला.
९) मुळ्याची पचडी – मुळा जाड किसणीनं किसा. त्यात भिजवलेली मूग डाळ घाला. कोथिंबीर, मीठ, साखर, घाला. वरून हिंग मोहरीची फोडणी द्या.
१०) मुळ्याच्या पानांची कोशिंबीर – मुळ्याची कोवळी पानं बारीक चिरून घ्या. त्यात साखर, मीठ, दाण्याचं कूट, लिंबाचा रस घाला. वरून हिंग, मोहरीची फोडणी घाला.
११) मिश्र पचडी – कोवळी मेथी, काकडी, बिया काढून टोमॅटो, कांदा बारीक चिरून घ्या. त्यात किसलेला मुळा आणि गाजर घाला. मीठ, साखर, दाण्याचं कूट, लिंबाचा रस, तिखट घाला. वरून जरा जास्त हिंग घालून खमंग फोडणी घाला.
१२) मेथीची कोशिंबीर – कोवळी मेथी बारीक चिरा. त्यात बारीक चिरलेला कांदा घाला. मीठ, साखर, दाण्याचं कूट घाला. हदी घालून कालवा. वरून हिंग-मोहरीची फोडणी घाला.
१३) मेथीचा घोळाणा – कोवळी मेथी बारीक चिरा किंवा फक्त कोवळी पानं खुडून घ्या. त्यात तिखट, मीठ, दाण्याचं कूट घाला. कच्चं तेल घाला.
१४) कांद्याच्या पातीचा घोळाणा – कांद्याची पात बारीक चिरा. त्यात तिखट, मीठ, दाण्याचं कूट, लिंबाचा रस घाला. वरून कच्चं तेल घाला.
१५) कांद्याची पात आणि टोमॅटो, गाजराची कोशिंबीर – कांद्याची पात आणि टोमॅटो बारीक चिरा. गाजर किसा. त्यात दाण्याचं कूट, साखर, मीठ, तिखट घाला. वरून हिंग-मोहरीची फोडणी घाला.
१६) मुळ्याच्या शेंगांचं किंवा शेंगड्यांचं कचुंबर – शेंगड्या बारीक चिरा. त्यात तिखट, मीठ, कच्चं तेल घाला.
१७) कांद्याचं रायतं – कांदा अगदी पातळ, उभा चिरा. हातानं मोकळा करा. त्यात भरपूर दही घाला. बारीक चिरलेली मिरची आणि कोथिंबीर घाला. जिरेपूड आणि मीठ घाला. आवडत असल्यास थोडी साखर घाला.
१८) बटाट्याचं रायतं – उकडलेला बटाटा बारीक चिरा. त्यात बारीक चिरलेला कांदा, कोथिंबीर, मिरची घाला. दही घालून कालवा. जिरेपूड, मीठ घाला.
१९) दुधी भोपळ्याचं रायतं – दुधीच्या चौकोनी फोडी करून कुकरला वाफवून घ्या. त्यात दही, दाण्याचं कूट, जिरेपूड, मीठ, मोहरीची पूड, कोथिंबीर घाला. वरून बारीक चिरलेली मिरची, कढीपत्ता, हिंग-मोहरीची खमंग फोडणी द्या.photo 3
२०) लाल भोपळ्याचं रायतं – लाल भोपळ्याच्या चौकोनी फोडी करून कुकरला वाफवून घ्या. त्यात तिखट, मीठ, मोहरीची पूड, साखर, जिरे पूड घाला. वरून बारीक चिरलेली मिरची, कढीपत्ता, हिंग-मोहरीची फोडणी घाला.
२१) फ्लॉवरचं रायतं – कोवळ्या फ्लॉवरचे लहान तुरे काढून वाफवून घ्या. त्यात दही, जिरेपूड, मीठ, कोथिंबीर घाला.
२२) पालकाचं रायतं – पालक पाण्यात घालून रंग बदलणार नाही इतपत उकडून घ्या. भरपूर दह्यात हा पालक बारीक चिरून घाला. त्यात बारीक चिरलेली हिरवी मिरची, जिरे पूड आणि मीठ घाला. वरून हिंग मोहरीची फोडणी घाला.
२३) वांग्याचं भरीत – वांगी गॅसवर भाजा. सालं काढून गर काढा. गर नीट कुस्करून त्यात बारीक चिरलेला कांदा आणि कोथिंबीर घाला. दही घालून कालवा. मीठ आणि आवडत असल्यास साखर घाला. वरून हिंग-मोहरीची फोडणी करा. गॅस बंद करून जरा जास्त तिखट फोडणीत घाला. ही फोडणी भरतावर घाला.
२५) वांग्याचं पंजाबी भरीत – वांगी भाजून गर काढा. कढईत फोडणी करून त्यात बारीक चिरलेला कांदा परता. नंतर त्यात टोमॅटो घालून परता. थोडीशी आलं-लसणाची पेस्ट घाला. लाल तिखट घाला. गर घालून हलवून घ्या. अर्धा चमचा पाव भाजी मसाला घाला. वरून कोथिंबीर घाला.
२६) मुळ्याची मुरवत ठेवण्याची कोशिंबीर – १ वाटी किसलेला मुळा असेल तर २ वाट्या सालं काढून बारीक चिरलेले टोमॅटो, जरा जास्त प्रमाणात बारीक चिरलेली हिरवी मिरची, कोथिंबीर असं एकत्र करा. यात मीठ, जिरेपूड आणि लिंबाचा रस घाला. ही कोशिंबीर जरा मुरू द्या. म्हणजे रात्री खायची असेल तर सकाळी करून फ्रीजमध्ये ठेवा.
२७) फ्रेश गार्डन सॅलड – काकडीचे मोठे तुकडे करा. बेबी टोमॅटो मिळाले तर अख्खे वापरा किंवा टोमॅटोच्या बिया काढून मोठे तुकडे करा. त्यात पनीरचे चौकोनी तुकडे घाला. ब्लॅक ऑलिव्हज घाला (चकत्या केलेले बाजारात मिळतात), फ्रेश आइसबर्ग लेट्यूसची पानं हातानं तोडून घाला. वरून ऑलिव्ह ऑईल, मीठ, मिरपूड आणि लिंबाचा रस घाला.
२८) कोबी-सिमला मिरची-मूग सॅलड – कोबी लांब पातळ चिरा, सिमला मिरची लांब पातळ चिरून, त्याचे दोन तुकडे करा. त्यात मोड आलेले मूग घाला. वरून लिंबाचा रस, चाट मसाला, मीठ घाला. थोडेसे डाळिंबाचे दाणे घाला.
२९) आयर्न सॅलड – कोबी लांब पातळ चिरा. त्यात जाड किसलेलं गाजर घाला. थोड्या काळ्या मनुका घाला. अक्रोडाचे तुकडे घाला. मीठ-साखर-लिंबाचा रस घाला.
३०) पास्ता सॅलड – थोडासा उकडलेला मॅकरोनी पास्ता घ्या. त्यात उकडेलेले कॉर्न दाणे, गाजराच्या लहान चकत्या, चौकोनी चिरलेली सिमला मिरची, बारीक चिरलेली कांदा पात आणि पातीचे कांदे घाला. थोडंसं ऑलिव्ह ऑईल, पिठी साखर, मीठ, मिरपूड घाला.
३१) चटपटे चणे – भिजवलेले चणे मऊ उकडा. गार झाल्यावर त्यात बारीक चिरलेला कांदा, टोमॅटो, हिरवी मिरची आणि कोथिंबीर घाला. जिरेपूड, मीठ, लिंबाचा रस, चाट मसाला घाला.
३२) छोले सॅलड – छोले उकडून गार करा. त्यात कांद्याची पात, काकडीचे चौकोनी तुकडे घाला. दही, जिरेपूड, मीठ घाला.
३३) मटकीची कोशिंबीर – मटकी कच्चीच असू द्या. त्यात बारीक चिरलेलं कांदा-टोमॅटो-कोथिंबीर घाला. तिखट-मीठ घाला. फोडणी नको.

photo 5
३४) फळं-भाज्यांचं मिश्र सॅलड – प्रत्येकी अर्धी वाटी घ्या. बारीक चिरलेलं स्ट्रॉबेरी, काळी द्राक्षं घ्या. त्यात डाळिंबाचे दाणे घाला. बारीक चिरलेला कांदा आणि टोमॅटो घाला. किसलेलं गाजर घाला. मीठ-साखर घाला. वरून मोहरी आणि हिरव्या मिरचीची फोडणी घाला.

अर्थात या सगळ्या कोशिंबीरी, सॅलड्स आणि रायती ही माझ्या घरी होतात ती आहेत. तुमच्या घरी अजून किती तरी वेगळ्या कोशिंबीरी, सॅलड्स होत असतील. तेव्हा तुम्ही काय वेगळं करता तेही नक्की कळवा.
सोशल नेटवर्किंगवर या पोस्ट शेअर करताना या पेजचा आवर्जून उल्लेख करा.

Advertisements

5 thoughts on “कोशिंबिरी, रायती, सॅलड्स

  1. फारच सुंदर पाककृती.awesome

    प्रत्येक पाककृती मध्ये थोडी जागा ठेवल्यास अधिक आकर्षक दिसेल

    Like

Leave a Reply

Fill in your details below or click an icon to log in:

WordPress.com Logo

You are commenting using your WordPress.com account. Log Out /  Change )

Google photo

You are commenting using your Google account. Log Out /  Change )

Twitter picture

You are commenting using your Twitter account. Log Out /  Change )

Facebook photo

You are commenting using your Facebook account. Log Out /  Change )

Connecting to %s