शेजारी शेजारी असलेल्या प्रांतांमध्ये खाण्यापिण्याच्या सवयी, पदार्थांच्या पाककृती थोड्या-फार प्रमाणात सारख्या असतात. थोड्या-फार यासाठी म्हणते आहे की, पुढच्या प्रांतात त्या काहीशा बदलतात. म्हणजे केरळमधून तामिळनाडूत गेलं की सांबार आहेच पण त्या सांबाराची पध्दत वेगळी. मल्याळी सांबार हे खूप घट्ट असतं. तामिळनाडूत हेच सांबार जरासं पातळ होतं पण या सांबारात गूळ नाही. पुढे कर्नाटकात सांबार आहेच पण तेही आणखीन निराळं, उडुपी सांबार काहीसं गोडसर. महाराष्ट्रात येताना या सांबाराचं रूपांतर चिंच-गूळ किंवा आमसूलं घालून केलेल्या वरणात होतं. पुढे गुजरातेत हीच गोडसर आमटी होते. तर सांगायचा मुद्दा असा की प्रांतागणिक रेसिपी बदलली तरी शेजारशेजारच्या प्रांतात काही पदार्थ जरासं निराळं रंगरूप घेऊन पण गाभा तोच ठेवून समोर येतात. कर्नाटकातली मुद्दा भाजी ही अशीच एक भाजी. ही भाजी प्रामुख्यानं कर्नाटकाच्या महाराष्ट्राला लागून असलेल्या उत्तरेकडच्या भागामध्ये केली जाते. म्हणजे बेळगाव, विजापूर आणि गुलबर्गा या जिल्ह्यांमध्ये. या भाजीला कानडीत मुद्दी पाल्या म्हणजे घट्ट पालेभाजी असं म्हणतात. त्याचंच मराठी रूप मुद्दा भाजी झालं असावं. ही भाजी वेगवेगळ्या प्रकारांनी केली जाते. म्हणजे चिंच-गूळ सगळीकडे घातलं जातं. पण काही लोक टोमॅटो घालतात तर काही लोक फोडणीला लसूण वापरत नाहीत. मी जी रेसिपी शेअर करणार आहे ती औरंगाबादला आमच्याकडे भाडेकरू राहात होते त्यांच्या पध्दतीची. ही गोळा भाजी अफलातून लागते. विशेषतः हातावर केल्या जाणा-या अतिशय पातळ, कडक अशा कर्नाटकी भाकरीबरोबर. माझी मैत्रीण चिन्मयी सुमीत हिनं या भाजीच्या रेसिपीची फर्माईश केली होती. तेव्हा आजची रेसिपी तिच्यासाठी.
कर्नाटकी मुद्दा भाजी

साहित्य – १ मोठी जुडी पालक, १ मोठी जुडी मेथी, मिळाल्यास आणि आवडत असल्यास १ जुडी चुका (ऐच्छिक), १ वाटी तूर डाळ, २ मोठे टोमॅटो मोठ्या फोडी करून, ३-४ कमी तिखट हिरव्या मिरच्या, अर्धा टीस्पून हळद, पाव टीस्पून हिंग, २ टेबलस्पून चिंचेचा कोळ (चुका घातला तर प्रमाण कमी करा), १ टेबलस्पून गूळ, २ टेबलस्पून बेसन, मीठ चवीनुसार
फोडणीचं साहित्य – २ टेबलस्पून तेल, १५-१६ लसूण पाकळ्या गोल चिरलेल्या, पाव वाटी शेंगदाणे, ८-१० सुक्या लाल मिरच्या, २ टीस्पून तिखट, चिमूटभर हळद
कृती –
१) तूर डाळ स्वच्छ धुवून घ्या. पालेभाज्या स्वच्छ धुवून जराशा कोरड्या करून जाडसर चिरून घ्या.
२) एका मध्यम आकाराच्या कुकरला धुतलेली डाळ, टोमॅटोचे तुकडे, हिरव्या मिरच्या, हिंग, हळद आणि चिरलेली पालेभाजी असं सगळं घाला.
३) त्यात १ वाटी पाणी घाला. कुकरच्या दोन शिट्या करा.
४) प्रेशर सुटलं की गरम असतानाच भाजी रवीनं चांगली घुसळून घ्या. मग त्यात बेसन घाला आणि परत एकजीव घोटून घ्या.

५) आता त्यात चिंच, गूळ, मीठ घाला. हे मिश्रण एका कढईत घाला आणि गॅसवर ठेवा. भाजी साधारणपणे घट्ट पिठलं असतं तितकी किंबहुना त्याहून थोडी घट्ट हवी. म्हणून वाटलं तरच पाणी घाला.
६) भाजी रटरटायला लागली की आच मंद करून झाकण ठेवा. मधूनमधून हलवत ७-८ मिनिटं भाजी शिजू द्या. गॅस बंद करा.
फोडणीची कृती –

१) लहान कढलीत तेल घालून ते कडकडीत गरम होऊ द्या. तेल गरम झालं की त्यात शेंगदाणे घालून ते लाल रंगावर तळून घ्या. तेल निथळून बाजूला काढून ठेवा.
२) आता तेलात मोहरी घाला. मोहरी तडतडली की लसणाचे तुकडे घाला. सतत हलवत सगळ्या बाजुंनी नीट लाल होऊ द्या.
३) लसूण लाल झाला की त्यात मिरच्या घाला.
४) मिरच्या तळल्या गेल्या की झटपट, हिंग, हळद आणि तिखट घाला आणि गॅस बंद करा. तिखट जळता कामा नये.
५) आता या फोडणीत तळलेले शेंगदाणे घाला.
भाजी एका सर्व्हिंग बोलमध्ये काढा. त्यावर ही फोडणी एकसारखी पसरा. वाढताना हलवू नका. वरच्या फोडणीसकट वाढा. या भाजीबरोबर ज्वारीची भाकरी अप्रतिम लागते. हवं असल्यास भाकरीवर लोणी किंवा तूप घाला. मुद्दा भाजी, भाकरी, वांग्याचे काप, साधं फोडणीचं वरण, भात आणि एखादी दह्यातली कोशिंबीर असा मेन्यू करून बघा. फर्मास लागतो.

मुद्दा भाजी, भाकरी, वांग्याचे काप, साधं फोडणीचं वरण, भात आणि एखादी दह्यातली कोशिंबीर असा मेन्यू करून बघा. फर्मास लागतो.
पालक-मेथी अगदी समान प्रमाणात हवी असंही नाही. घरी उरलेलं पालक-मेथी-चुका आपल्याला हव्या त्या प्रमाणात वापरलं तरी काही हरकत नाही.ही भाजी झणझणीतच चांगली लागते तेव्हा तिखट जास्त वापरा.
सोशल नेटवर्किंगवर रेसिपीज शेअर करताना या ब्लॉगचा जरूर उल्लेख करा.
This is more like lawangii mirrchi chi bhaaji ee ate in Khamgaon.toordaal ,chukaa,10/12lawangii mirrchya,yool daal cooked with ginger and then followed byyour’s no chinch goool at all..
LikeLike