हमस

गेल्या काही दिवसांत मी ज्या पोस्ट लिहिल्या त्या पारंपरिक भारतीय पदार्थांबद्दल होत्या. आता आपण सगळेच वेगवेगळ्या देशांमधले पदार्थ करत असतो. पास्ता, पिझ्झा, श्वारमा, सँडविचेस, विविध प्रकारची सॅलड्स असे पदार्थ आता सर्रास आपल्या घरांमध्ये होत असतात, ते आपल्याला आवडतातही. शिवाय अधूनमधून सगळ्यांनाच असा बदल हवाही असतो. म्हणूनच या आपल्या पेजवरही मी अधूनमधून अशाच काही सोप्या पदार्थांच्या रेसिपीज शेअर करणार आहे.

आपल्याकडे छोले बरेचदा होतात. काबुली चणे या नावानं ओळखला जाणारा हा हरभ-याचाच एक प्रकार. आपल्या देशात उत्तरेकडे काबुली चणे मोठ्या प्रमाणावर वापरले जातात.  भारतात चण्याचा हा प्रकार अठराव्या शतकात अफगाणिस्तानातून आला म्हणून हे काबुली चणे झाले. पांढरट रंगाचे हे चणे जगभरातल्या कित्येक देशांमधे खाल्ले जातात. उकडलेले काबुली चणे सॅलड्समध्ये वापरले जातात, फलाफल या लेबनीज पदार्थात काबुली चण्यांच्या पिठापासून तयार केलेले आणि तळलेले गोळे वापरतात. पोर्तुगलमध्ये पास्ता, सॉसेजेस तसंच भातातही काबुली चणे वापरले जातात. ब्रह्मदेशात बर्मीज टोफू तयार करताना छोल्यांचा वापर केला जातो.  मध्य पूर्वेतल्या बहुतेक सर्व देशांमध्ये काबुली चणे मुबलक प्रमाणात वापरले जातात. मग ते सूप असो, सॅलड किंवा रॅप्स अथवा भाताचे प्रकार.  आज मी या काबुली चण्यांपासून बनवला जाणारा आणि आपल्याकडेही ब-यापैकी लोकप्रिय असलेल्या हमस किंवा हुमस या पदार्थाची रेसिपी शेअर करणार आहे.  या मुळच्या इजिप्शियन पण आता जगभर प्रचंड लोकप्रिय असलेल्या पदार्थाची रेसिपी अतिशय सोपी आहे. झटपट होणारी आहे, शिवाय अतिशय रूचकर आहे.

हमस

तयार हमस
तयार हमस

साहित्य – १ कप काबुली चणे (रात्रभर भिजवलेले), एका लिंबाचा रस, दीड टेबलस्पून दही, १ टेबलस्पून एक्स्ट्रॉ व्हर्जिन ऑलिव्ह ऑईल, २-३ लसूण पाकळ्या, मीठ चवीनुसार.

वरून घालण्यासाठी – भरपूर एक्स्ट्रॉ व्हर्जिन ऑलिव्ह ऑईल, लाल तिखट, आवडत असल्यास रेडीमेड हर्ब्ज किंवा फ्रेश पार्सले (ऐच्छिक)

कृती –

१)  भिजवलेले काबुली चणे उपसून घ्या. ते एका लहान कुकरमध्ये किंवा कुकरच्या भांड्यात घाला.

२) छोले जेमतेम बुडतील इतकंच पाणी घाला. पाव टीस्पून मीठ घाला. छोले कुकरला अगदी मऊ होईपर्यंत शिजवा. साधारणपणे दोन शिट्या आणि पंधरा मिनिटं मंद आचेवर ठेवलं तर छोले उत्तम शिजतात.

३) छोले शिजले की त्यात उरलेल्या पाण्यासकट थंड होऊ द्या. अगदी गार झाल्यावर थोडं पाणी बाजुला काढून ठेवा.

४) छोले मिक्सरमध्ये घाला. त्यातच लसूण, ऑलिव्ह ऑईल, लिंबाचा रस, दही आणि मीठ घाला. अगदी एकजीव पेस्ट करा. फार घट्ट वाटलं तर बाजुला ठेवलेलं पाणी वापरा. मेदुवड्याला जितपत घट्ट पीठ वाटतो तितकं घट्ट असायला हवं.

५)  ही पेस्ट एका सर्व्हिंग बोलमध्ये काढा. फ्रीजमध्ये अगदी थंडगार करा.

६) सर्व्ह करताना त्यावर तिखटाची पूड भुरभुरवा. वरून मुक्त हस्तानं ऑलिव्ह ऑईल घाला.

हमस तयार आहे. हे हमस रेडीमेड पिटा ब्रेडबरोबर, लवाश (कडक ब्रेडच्या पट्ट्या) बरोबर, काकडी, गाजर, मुळा, सेलरी स्टीक्सबरोबर उत्तम लागतं. किंवा सँडविचसाठी स्प्रेड म्हणूनही वापरू शकता. जरासं पातळ केलंत तर सॅलड ड्रेसिंग म्हणूनही वापरता येईल. किंवा नुसतं बोटांनी चाटून खायलाही अप्रतिम लागतं! हवं असल्यास हमस तयार झाल्यावर त्यावर तुम्ही रेडीमेड हर्ब्ज घालू शकता किंवा ताजी पार्सलेची पानं खुडून घालू शकता. पण मला हे काहीही न घालताच हमस आवडतं. तुम्ही करून बघा, कसं झालं ते कळवा, फोटो काढा आणि मला पाठवा.

ही पोस्ट सोशल नेटवर्किंगवर शेअर करताना या ब्लॉगचा आवर्जून उल्लेख करा.

2 thoughts on “हमस

  1. मी हमस ची रेसिपी अरबी शेफ कडून शिकले आहे. त्याने काही टिप्स् दिल्या. त्या इथे शेयर करते. हे मिक्सर मधून फिरवताना गरम होता कामा नये म्हणून मधेच पाण्याच्या ऐवजी थोडा बर्फाचा चुरा घालावा. खुप हलकं होई पर्यंत मिक्सर मधे फिरवावं. तसचं हा पदार्थ 3-4 दिवस टिकतो. लिम्बाच्या रसाने किंचित कडवट चव येते त्या ऐवजी लिम्बुसट (लेमन सॉल्ट) टाकावा. लसणाबरोबर पांढर्‍या मिरेचे 2-3 दाणे टाकावेत. एक वाटी हमस मधे एक चमचा ताहिना टाकतात.
    ताहिना‌ – एक वाटी हलके भाजलेले तीळ, मीठ, पांढर्‍या मिरीचे 2-3 दाणे मिक्सर मधे तेल सुटेपर्यंत वाटायचे. त्यानंतर त्यात ऑलिव्ह ऑईल टाकुन पुन्हा मिक्सर मधे फिरवुन अगदी पांढरी क्रीमी पेस्ट होई पर्यंत फिरवावे. या पेस्ट ला ताहिना म्हणतात. ही पेस्ट फेलाफेलच्या मिश्रणामधे सुद्धा टाकतात.

    Like

Leave a Reply

Fill in your details below or click an icon to log in:

WordPress.com Logo

You are commenting using your WordPress.com account. Log Out /  Change )

Facebook photo

You are commenting using your Facebook account. Log Out /  Change )

Connecting to %s

%d bloggers like this: