स्वयंपाकाचं नियोजन भाग १

स्वयंपाक करणं मला स्वतःला खूप आवडतं. स्वयंपाक करणं हा एक उत्तम स्ट्रेस बस्टर आहे असं मला वाटतं. अर्थात स्वयंपाकाचं नीट नियोजन केलेलं असलं की मग स्वयंपाक करणं अजिबात त्रासाचं वाटत नाही. मी घरातून काम करते त्यामुळे माझे कामाचे निश्चित तास नाहीत. त्यामुळे मला अमुकच वेळेला कामाला बाहेर पडायचंय असं नसतं. तरीही मी घरी असताना रोज निश्चित वेळेला कामाला बसतेच. मग ज्या बायका नियमितपणे कामाला जाण्यासाठी घराबाहेर पडतात त्यांच्यासाठी तर ही तारेवरची कसरतच असते. म्हणूनच नुसतं स्वयंपाकाचंच नाही तर स्वयंपाकघराचं नियोजन मला खूप महत्वाचं वाटतं. माझ्या घरी मी ते करतेच करते. खूप सोप्या आणि साध्या पध्दतीनं तुम्ही स्वयंपाकघराचं नियोजन करू शकता. मी माझ्या घरी यासाठी काय करते ते मी आज तुमच्याबरोबर शेअर करणार आहे.

10978632_339273732946019_1993177985730648824_n

घरातला फ्रीज महिन्यातून एकदा बंद करा. तो पूर्ण रिकामा करा. नंतर तो साबणाच्या पाण्यानं स्वच्छ पुसा. मग साध्या पाण्यानं आणि मग अर्थातच कोरड्या फडक्यानं अगदी कोरडा करा. थोडा वेळ उघडा ठेवा. मग त्यात सामान व्यवस्थित भरा. म्हणजे फ्रीजरमध्ये फ्रोजन गोष्टी ( उदाहरणार्थ मासे, चिकन, मटन, मटार, कॉर्न दाणे, घरी केलेलं लोणी इत्यादी) तसंच कोरड्या मसाल्यांची पाकिटं (आपण जे एव्हरेस्ट किंवा तत्सम कोरडे मसाले वापरतो, त्याप्रकारचे मसाले, जायफळ पूड, वेलची पूड, कॉर्न फ्लोअर, बेकिंग पावडर इत्यादी) तुम्ही ठेवू शकता. खाली फ्रीजमध्ये चिल ट्रेमध्ये बटर, चीज, शिवाय जे मसाले थोडे थोडे लागतात ते म्हणजे बडिशेपेची पूड, मोहरीची पूड, मिर पूड असं ठेवा. फ्रीजच्या पहिल्या कप्प्यात सगळे दुधाचे पदार्थ म्हणजे रोजचं दूध, दही, ताक, विरजण लावलेली साय इत्यादी ठेवा. त्याच्या खालच्या कप्प्यात रोजचं उरलेलं जेवण, खाद्यपदार्थ ठेवा. शिवाय काही फळं असतील तर तीही ठेवा (उदाहरणार्थ डाळिंब सोलून त्याचे दाणे किंवा स्ट्रॉबेरीज इत्यादी. पपई, केळी, चिकू ही फळं फ्रीजमध्ये ठेवू नयेत त्यांचं टेक्श्चर बदलतं. ) त्या खालच्या कप्प्यात कोथिंबीर, आलं, मिरची, पुदिना, कढीपत्ता, लिंबं यांचे डबे, मोड आलेली कडधान्यं असतील तर ती, शिवाय निवडलेल्या पालेभाज्या, दुस-या दिवशी सकाळी करण्याच्या भाजीसाठी आवश्यक असेल तर चिरलेलं कांदा, टोमॅटो इत्यादी ठेवा. सगळ्यात खालच्या कप्प्यात दाण्याचं कूट, धणे-जिरे पूड, सुका मेवा असेल तर तो, अख्खा खडा मसाला जास्त आणलेला असेल तर तो, ऑलिव्हज, स्वयंपाकासाठी लागणारे रेडीमेड सॉस वापरत असाल तर त्यांच्या बाटल्या असं ठेवता येईल. सगळ्यात खाली भाजीचा ट्रे. मी स्वतः आठवड्यातून दोनदा भाजी घेऊन येते. पालेभाज्या, कांदे-बटाटे वगळता सगळ्या भाज्या भरपूर पाण्यात थोडंसं पोटॅशिअम परमँगनेट घालून धुते. त्या स्वच्छ पंचावर घालून अगदी कोरड्या करते आणि मग त्या फ्रीज बॅग्जमध्ये घालून फ्रीजमध्ये ठेवते. तसं करणं शक्य असेल तर तसं करा.


फ्रीज जर अशा पध्दतीनं लावलेला असेल तर मग तुम्हाला स्वयंपाक करताना त्रास होणार नाही.
माझ्या घरी फ्रीजमध्ये कायम दोन गड्डे लसूण सोललेला असतो. शिवाय महिन्यातून एकदा दाण्याचं कूट, तिळाचं कूट, धणे पूड, जिरे पूड, पिठी साखर, थोडासा ताजा गरम मसाला, सांबार मसाला हे करून ठेवलं जातं. गूळ किसून ठेवलेला असतो. शिवाय बडिशेपेची पूड, मोहरी पूड, मिर पूड हे लागेल तसं करून ठेवते. मी सुके मसाले विकत आणून वापरते. पण मी सोया सॉस, चिली सॉस सोडले तर बहुतेक रेडिमेड सॉस शक्यतो वापरत नाही. अगदीच आवश्यक तिथेच वापरते. कोरडे मसाले मात्र माझ्याकडे मुबलक प्रकारचे असतात. म्हणजे रेडीमेड इटालियन हर्ब्ज, सुंठ पावडर, दालचिनी पावडर हेही माझ्याकडे नेहमी असतं. ऑलिव्ह ऑईलचे दोन प्रकार असतात. एक साधं ऑलिव्ह ऑईल जे कुकिंगसाठी वापरतात. दुसरं एक्स्ट्रॉ व्हर्जिन ऑलिव्ह ऑईल, हे शक्यतो कच्चं वापरावं. सॅलड्समध्ये, सँडविचेसवर किंवा हमससारख्या डिप्समध्ये. माझ्या घरी दोन्ही प्रकारचं ऑलिव्ह ऑईल असतं. आपल्या भारतीय जेवणासाठी मात्र व्हेजिटेबल ऑईल्स चांगली लागतात. दाण्याचं, तिळाचं, मोहरीचं, राईस ब्रान, सोयाबीन अशी वेगवेगळी तेलं आपल्याकडे सगळीकडे मिळतात. तेल कुठलं वापरावं याविषयी बरेचसे मतप्रवाह आहेत. पण वेगवेगळ्या तेलांचे वेगवेगळे गुणधर्म असतात. म्हणून तेल आलटून पालटून वापरावं असं म्हणतात. मी शेंगदाणा आणि राईसब्रान आलटून पालटून वापरते. टोमॅटो केचप मुलींना आवडतं म्हणून मी आणते खरी पण मी पदार्थांमध्ये फारच क्वचित त्याचा वापर करते. मी रेडीमेड टोमॅटो प्युरे, नारळाचं दूध, आलं-लसूण पेस्ट कधीही वापरत नाही. मी या गोष्टी जशा लागतील तशा ताज्या करून वापरते. पनीरही मी घरीच करते. चिंच-गूळ-खजुराची चटणी महिन्यातून एकदा करून ती बाटल्यांमध्ये भरून फ्रीजरला ठेवलेली असते. खोवलेला नारळ लहान लहान काचेच्या कंटेनर्समध्ये फ्रीजरला ठेवलेला असतो. म्हणजे एकावेळेला एकच कंटेनर काढला की काम होतं. शिवाय चिंचेचा कोळ काढून तोही फ्रीजरला ठेवलेला असतो. फक्त तो आठवणीनं आधी बाहेर काढून ठेवावा लागतो इतकंच. अजून एक गोष्ट, मी प्लॅस्टिकचा वापर शक्यतो करत नाही. फ्रीजमध्ये सर्व गोष्टी स्टील किंवा काचेच्या कंटेनर्समध्येच ठेवलेल्या असतात. पाण्याच्या बाटल्या स्टीलच्या वापरते. तुम्ही प्लॅस्टिकच्या वापरत असाल तर दरवर्षी त्या बदलण्याची खबरदारी घ्या.
आपण सगळेच स्वयंपाक करताना मसाल्याचा डबा वापरतो. हा डबा आठवड्याला किमान एकदा स्वच्छ धुवा. त्यात अर्थातच हळद, तिखट, काळा मसाला, मोहरी, जिरं, उडदाची डाळ आणि हिंग मी ठेवते. तुम्ही जे मसाले नियमितपणे वापरत असाल ते ठेवत असणार. मी या डब्याबरोबरच असाच एक डबा अख्ख्या गरम मसाल्यासाठी वापरते. ज्यात मी लवंग, मिरी दाणे, वेलची, बडी वेलची, शहाजिरं, दालचिनी इत्यादी ठेवते. शिवाय तमालपत्रंही हाताशीच असतात. मसाल्याच्याच ड्रॉवरमध्ये मला सतत लागणा-या गोष्टी एका लहानशा ट्रेमध्ये असतात. म्हणजे टीस्पून, टेबलस्पून ( मी रेसिपीज लिहित असले तरी तुमच्यासाठी टीस्पून, टेबलस्पून लिहिते. मी एरवी काहीही मोजून घालत नाही! या गोष्टी माझ्या मुली वापरतात.) सु-या, साल काढणं, लायटर, थोडे लहान चमचे, एक लहानसा बत्ता, एक लहान स्क्रू ड्रायव्हर, काही पाकिटं फोडल्यावर ती बंद करण्यासाठी लागणारे चिमटे इत्यादी गोष्टी या ट्रेमध्ये ठेवलेल्या असतात. माझं स्वयंपाकघर अतिशय लहान आहे. अन्न हेच पूर्णब्रह्मचा कव्हर फोटो आहे ते माझं स्वयंपाकघर आहे. गॅसच्या उजव्या बाजुला एका मोठ्या कुंडीसारख्या भांड्यात मला स्वयंपाक करताना लागणारे चमचे, पळ्या, रवी, मॅशर, झारे, उलथनं आदी ठेवलेलं असतं. तर दुस-या एका लहान लाकडी भांड्यात नॉनस्टिक भांड्यांसाठी लागणारे लाकडी चमचे ठेवलेले असतात. गॅसच्या डाव्या बाजुला एक लहानसं शेल्फ आहे. तिथे एक लहान घड्याळ (कुकरचा वेळ मोजायला स्वयंपाकघरात अगदी आवश्यक), मिठाची बरणी, तूप, आणि रोज न लागणारे काही मसाले म्हणजे मालवणी मसाला, कांदा-लसूण मसाला वगैरेंच्या बाटल्या ठेवलेल्या असतात.
खरं सांगायचं तर तुम्ही सगळ्याच जणी थोड्या फार फरकानं हे करत असणारच. पण एकमेकांबरोबर शेअर केलं की एखादी गोष्ट पटकन लक्षात येते किंवा आवडून जाते किंवा अरे इतकी साधी सोपी गोष्ट आपला वेळ वाचवू शकते असाही साक्षात्कार होतो. म्हणून मी ही शेअर करते आहे. यातल्या कित्येक गोष्टी मी वेगवेगळ्या लोकांच्या बघून, वाचून आणि अर्थातच इतकी वर्षं स्वयंपाकघरात वावरल्यानंतर आत्मसात केलेल्या आहेत.
नाश्ता आणि रोजच्या स्वयंपाकाचं नियोजन मी कसं करते हे मी पुढच्या पोस्टमध्ये शेअर करणार आहे.सोशल नेटवर्किंगवर ही पोस्ट शेअर करताना या ब्लॉगचा जरूर उल्लेख करा.

4 thoughts on “स्वयंपाकाचं नियोजन भाग १

 1. नमस्कार,

  तुमची साइट काल पाहिली आणि प्रेमातच पडले. स्व. नियोजन हां तर जिव्हाळ्याचा विषय. तुम्ही प्लास्टिक न वापरता काच वापरा लिहिलेय. पण फ्रीजर मध्ये काच तडकणार नाही का? म्हणजे मी खजूर चिंच चटणी करून फ्रिझरमध्ये बाटलित किंवा ग्लास जार मध्ये ठेवली तर चटणी गोठल्यावर जार फुटणार नाही? एकदा मुलीने चुकून पाण्याची बाटली ठेवलेली आणि पाणी गोठल्यावर बाटली फुटली.

  बाकी तुमचे इतर नुस्खे खुप छान आहेत.

  regards
  साधना

  Like

  1. Mam you are too good…You post what ever people wants in their daily life..

   Keep writing and I request you to make one blog post about organising entire home from cleaning to arranging things and daily must to do cleaning of home…

   Like

 2. Hello,
  I stumbled upon your blog very recently and am slowly going through the posts. Organization-related ones are very, very interesting and helpful. So thank you for posting such ones and please keep more coming. You mentioned that you wash all your vegetables, dry and store them in the fridge, what type of bags do you use for leafy and non-leafy vegetables, if not plastic bags?

  Like

Leave a Reply

Fill in your details below or click an icon to log in:

WordPress.com Logo

You are commenting using your WordPress.com account. Log Out /  Change )

Facebook photo

You are commenting using your Facebook account. Log Out /  Change )

Connecting to %s

%d bloggers like this: