चायनीज जेवणाची क्रेझ भारतात गेल्या काही वर्षांत आली. त्यातही पुण्या-मुंबईकडे आधी आणि नंतर हळूहळू इतर गावांमध्ये चायनीजचं वेड पसरत गेलं. आता तर गावागावांमध्ये कोप-याकोप-यांवर सोकॉल्ड चायनीज जेवणाच्या गाड्या उभ्या असतात. आपल्याकडे ईशान्य भारतातल्या लोकांना सरसकट चायनीज म्हणून हिणवण्याची पध्दत आहेच. त्यांनीही बापड्यांनी ते खरं मानलं आणि आता या चायनीजच्या गाड्या बहुसंख्य वेळा ईशान्य भारतातून आलेले लोक चालवतात.
माझ्या सासुबाईंना (विजया राजाध्यक्ष) वेगवेगळ्या प्रकारचा स्वयंपाक करून बघण्याची आवड होती आणि आज ब्यांऐशीव्या वर्षीही ती कायम आहे. मावशीच्या एका वाढदिवसाला शांता शेळके यांनी मंगला बर्वे यांचं चायनीज पदार्थ हे पुस्तक भेट दिलं होतं. तिनं आता ही सगळी पुस्तकं मला दिलेली आहेत. आजच्या या पोस्टमध्ये मी शांताबाईंची सही असलेल्या पानाचा फोटोही शेअर करणार आहे. मी आज ज्या रेसिपीज शेअर करणार आहे त्या या पुस्तकातल्या नाहीत. मी त्या कुठेतरी वाचलेल्या आणि नंतर माझ्या पध्दतीनं बदल केलेल्या आहेत.
परवाच माझ्या धाकट्या मुलीच्या नाकाची एक लहानशी सर्जरी झाली. हॉस्पिटलमध्येच तिनं मला घरी गेल्यावर चायनीज खायचं आहे अशी फर्माईश केली. अर्थातच घरी आल्यावर मी ती पूर्णही केली. तेव्हा आज त्यातल्या दोन रेसिपीज मी शेअर करणार आहे. व्हेज हाका नूडल्स आणि मिक्स्ड व्हेजिटेबल्स विथ ग्रेव्ही. आपल्याकडे जे चायनीज मिळतं ते आपल्या चवींशी मिळतंजुळतं केलेलं असतं आणि म्हणूनच ते आपल्याला आवडतं. अस्सल चायनीज जेवण आवडणारे माझ्या नव-यासारखे फार कमी लोक असतात. माझ्या धाकट्या मुलीलाही हे इंडियन चायनीजच आवडतं.
व्हेज हाका नूडल्स
साहित्य – २ पाकिटं चिंग्ज सिक्रेट किंवा तत्सम कुठलेही नूडल्स, २ वाट्या कोबी लांब चिरलेला, २ वाट्या बीन स्प्राऊट्स (मोड आलेले, सालं काढलेले मूग, दुकानात मिळतात), प्रत्येकी १ वाटी हिरवी, लाल आणि पिवळी सिमला मिरची (लांब पातळ चिरलेली), २ मोठी गाजरं (जाड किसणीनं किसलेली), १ जुडी कांद्याची पात (कांदा लांब पातळ चिरलेला, पात बारीक चिरलेली), आवडत असल्यास १ पाकिट मश्रूम्स (पातळ स्लाइस केलेले), १ टेबलस्पून सोया सॉस, मीठ-मिरपूड चवीनुसार, २ टेबलस्पून तेल
कृती –
नूडल्स उकडण्याची कृती –
१) एका मोठ्या पातेल्यात भरपूर पाणी उकळायला ठेवा.
२) पाण्याला खळखळून उकळी आली की त्यात नूडल्स न तोडता घाला. नूडल्स उकळत्या पाण्यात मोकळ्या होतील. जेमतेम ३-४ मिनिटंच शिजवा. नूडल्स अगदी लिबलिबीत शिजवायचे नाहीत. ते थोडे कच्चेच हवेत.
३) हे नूडल्स एका मोठ्या चाळणीत ओता. लगेचच त्यावर फ्रीजमधलं थंडगार पाणी ओता म्हणजे नूडल्स शिजण्याची प्रक्रिया बंद होईल.
४) पाणी पूर्ण निथळलं की नूडल्स एका परातीत घ्या. त्यावर २ टीस्पून तेल घाला. आणि हलक्या हातानं तेल नूडल्सला सगळीकडे लावून घ्या. यामुळे नूडल्स एकमेकांना चिकटणार नाहीत.
मुख्य कृती –
१) एका मोठ्या पसरट कढईत (या कढईला वोक असं म्हणतात, पण कुठलीही नॉनस्टिक कढई चालेल) तेल गरम करा.
२) त्यात कांदा घालून परता. कांदा लाल करायचा नाही. कांदा जरासा शिजला की त्यात बीन स्प्राऊट्स घाला. अजून एखादं मिनिट शिजवा.
३) आता त्यात सिमला मिरच्या आणि गाजर घाला. परत जरासं शिजवा आणि नंतर त्यात कोबी घाला.
४) कोबी एखादा मिनिटं शिजला की कांद्याची पात घाला.
५) चांगलं हलवून घ्या आणि त्यात सोया सॉस, मीठ आणि मिरपूड घाला.
६) सगळं नीट एकजीव करा आणि त्यात नूडल्स घाला. हलक्या हातानं चांगलं मिक्स करा. दोन मिनिटं हलवत हलवत होऊ द्या. गॅस बंद करा.
हाका नूडल्स तयार आहेत.
ही सगळी कृती मोठ्या आचेवर करायची आहे. भाज्या अर्धवट कच्च्याच ठेवायच्या आहेत. आपल्या आवडीनुसार यात बारीक चिरलेला लसूणही घालू शकता.
मिक्स्ड व्हेजिटेबल्स विथ ग्रेव्ही
साहित्य – दीड वाटी फ्लॉवर (मोठे तुरे काढलेला), दीड वाटी ब्रोकोली (मोठे तुरे काढलेला), दीड वाटी गाजर (मोठे तुकडे केलेलं), दीड वाटी झुकिनी (मोठे तुकडे केलेले), दीड वाटी बेबी कॉर्न (तिरपे मोठे तुकडे केलेले), दीड वाटी पनीर किंवा टोफू (चौकोनी तुकडे केलेले), १ वाटी फरसबी (लांब तिरपी चिरलेली), १ वाटी सिमला मिरची (चौकोनी मोठे तुकडे केलेली), ३-४ सुक्या लाल मिरच्या, १ टेबलस्पून लसूण अगदी बारीक चिरलेला, २ टीस्पून आलं किसलेलं, २ टेबलस्पून सोया सॉस, २ टीस्पून चिली सॉस, २ टीस्पून व्हाईट व्हिनेगर (ऐच्छिक), ३ टेबलस्पून कॉर्न फ्लोअर (१ कप पाण्यात मिसळून ठेवा) १ टीस्पून साखर, मीठ-मिरपूड चवीनुसार, १ टेबलस्पून तेल
कृती –
१) एका मोठ्या पातेल्यात पाणी उकळायला ठेवा. पाण्याला उकळी आली की त्यात फरसबी आणि गाजर घाला. ३-४ मिनिटं शिजवा.
२) आता त्यात फ्लॉवर आणि ब्रोकोलीची तुरे घाला. फरसबी शिजत आली की गॅस बंद करा, तेवढ्या वेळात बाकीच्या भाज्या शिजतात.
३) उकडलेल्या भाज्या एका चाळणीत निथळून ठेवा. भाज्या अर्धवट कच्च्या असल्या पाहिजेत.
४) दुस-या लहान पातेल्यात पाणी घालून बेबी कॉर्न शिजवून घ्या. तेही चाळणीत निथळून ठेवा.
५) एका मोठ्या कढईत तेल गरम करा. तेल कडकडीत गरम झालं की लाल मिरच्या आणि लसूण घाला.
६) लसूण परतला की त्यात आलं घाला. परतून घ्या आणि त्यात झुकिनी आणि सिमला मिरची घाला.
७) एखादं मिनिट परता आणि त्यात उकडलेल्या भाज्या घाला. चांगलं मिसळून घ्या आणि त्यात सोया सॉस, चिली सॉस, मीठ, मिरपूड, साखर, व्हिनेगर घाला. परत चांगलं हलवा.
८) आता त्यात पनीर किंवा टोफूचे तुकडे घाला. परत चांगलं हलवा आणि दीड कप गरम पाणी घाला.
९) उकळी आली की त्यात पाण्यात कालवलेलं कॉर्न फ्लोअर घाला. हलवत रहा. कॉर्न फ्लोअर लगेचच घट्ट होईल.
१०) ग्रेव्ही फार घट्ट वाटली तर थोडं पाणी घाला. झाकण ठेवून एक उकळी काढा. गॅस बंद करा.
मिक्स व्हेजिटेबल्स इन ग्रेव्ही तयार आहे. ही भाजी जराशी तिखटच चांगली लागते. तेव्हा आपल्या आवडीनुसार चिली सॉस, मिरपूडीचं प्रमाण वाढवा.
याबरोबर मी सेलरी राईस आणि स्टर फ्राईड व्हेजिटेबल्स केलं होतं त्याची रेसिपी पुन्हा कधी तरी.
चायनीज करायचं असेल तर हाताशी भरपूर वेळ हवा. कारण भाज्या चिरण्यातच खूप वेळ जातो. प्रत्यक्ष कृतीला वेळ लागत नाही. या भाज्या चिरणं हे कौशल्याचं काम आहे. त्या एकसारख्या चिरल्या गेल्या पाहिजेत. मी परवा भाज्या चिरून माझे चारी पदार्थ होईपर्यंत जवळपास दोन ते अडीच तास गेले. कारण याच्या भाज्याही मीच चिरते. तेव्हा हाताशी वेळ असेल तेव्हाच हे पदार्थ करा. झुकिनी हा काकडीचाच एक प्रकार आहे. मिळाला नाही तर वापरला नाही तरी चालेल.
सोशल नेटवर्किंगवर पोस्ट शेअर करताना या ब्लॉगचा जरूर उल्लेख करा.
मग करून बघा आणि नक्की कळवा कसं झालं होतं ते.
माझ्या नूडल्स बरेचदा जरा चिकट होतात. जास्त उकळवते का(६/७ मिनिटे) ? की अजून काही ?
LikeLike
हॅलो पद्मश्री, हो नूडल्स जास्त शिजवायचे नाहीत. ते फक्त ३-४ मिनिटंच शिजवायचे. चाळणीत काढले की लगेचच अगदी थंड पाणी त्यावर ओतायचं. आणि पूर्ण निथळले की मग थोडं तेल लावून ठेवायचे. मग ते मोकळे राहतात.
LikeLike
Hi Sayali,
I tried this recipe too last night for dinner. I added rice too to noodles. I have been making rice/ noodles quite often using my own recipe. But had never made Chinese gravy before. Your recipe gravy was good. Thanks. Looking forward to try more recipes from your blog as they are too simple to follow and give a very good taste.
Cheers.
LikeLike
sayali taai …celery rice chi recipe share karal ka pls? ankhi mhnaje noodles madhe jar chicken pieces ghalayche astil tar te vegle shijvun ghyave lagtat ka te sanga na ?
LikeLike