महाराष्ट्राच्या किनारपट्टीच्या भागांमध्ये मासे खाणा-यांचं प्रमाण मोठं आहे. अर्थात किनारपट्टीवरच्या सगळ्याच भागांमध्ये मासे मोठ्या प्रमाणावर खाल्ले जातातच. काही भागांत, म्हणजे उदाहरणार्थ बंगाल, ओडिशा या भागांमध्ये गोड्या पाण्यातले हिलसा किंवा बेकटी हे माशांचे प्रकार लोकप्रिय आहेत. मुंबई आणि कोकणात मात्र समुद्रातले मासे लोकप्रिय आहेत. पापलेट, बांगडे, सुरमई, हलवा, सरंगा, कोलंबी, बोंबील, तिस-या, मोदकं, मुडदुशा, कर्ली, तारली, घोळ, बोय, मांदेळी, कालवं हे खा-या पाण्यातल्या माशांचे काही लोकप्रिय प्रकार. जयवंत दळवींचे खाद्यसंस्कृतीबद्दलचे, त्यातही माशांच्या पदार्थांचे उल्लेख असलेले कितीतरी अप्रतिम लेख आहेत. त्यात कुठे ना कुठे या माशांचे उल्लेख येत राहतात. दळवी हे कट्टर मासेहारी (हो मांसाहारी नव्हेत!) सोमवार आणि गुरूवारी सारस्वतांकडे शाकाहारी जेवण असतं (आमच्या घरी असले कुठलेही नियम पाळले जात नाहीत). दळवींना हे दोन दिवस सुध्दा शाकाहारी जेवणं कठीण वाटायचं. मग ते बाहेर जाऊन जेवायचे. त्यातही भंडा-यांची हॉटेल्स त्यांच्या खास पसंतीची. त्यासाठी दळवींचे हे लेख वाचायलाच हवेत.
मासे खाणा-या लिंबूटिंबू लोकांचा कोलंबी हा आवडता प्रकार. कट्टर खाणा-यांना लहान मासे जास्त आवडतात. शिवाय माशांमध्ये जितके काटे जास्त तितका तो मासा चविष्ट. माझ्या धाकट्या मुलीलाही कोलंबी अतोनात प्रिय आहे. तिला फक्त रवा आणि तांदळाचं पीठ लावून खरपूस तळलेलीच कोलंबी आवडते. पण आज मी जी रेसिपी शेअर करणार आहे ती आहे बेबी कोलंबीची म्हणजे करंदीची. करंदी हा कोलंबीचाच प्रकार. पण अगदी लहान कोलंबी. आजची रेसिपी आहे करंदीचं सुकं.
करंदीचं सुकं
साहित्य – २ वाट्या करंदी (कवच काढून स्वच्छ धुवून घ्या), ३-४ कांदे बारीक चिरलेले, ८-१० लसूण पाकळ्या ठेचलेल्या, ३ आमसुलं, १ टेबलस्पून सुक्या खोब-याचा कूट (भाजून मग करा), दीड टीस्पून लाल तिखट, १ टीस्पून मालवणी मसाला, अर्धा टीस्पून हळद, मीठ चवीनुसार, २ टेबलस्पून तेल, थोडीशी बारीक चिरलेली कोथिंबीर
कृती –
१) करंदीला हळद आणि मीठ लावून ठेवा.
२) एका कढईत तेल घालून ते चांगलं गरम करा. तेल तापलं की त्यात ठेचलेला लसूण घालून लाल होऊ द्या.
३) लसूण लाल झाला की त्यात कांदा घाला. मधूनमधून हलवत कांदा गुलाबी होऊ द्या. कांदा नीट शिजायला हवा पण लाल करायचा नाहीये.
४) कांदा परतला गेला की त्यात करंदी घाला. नीट हलवून घ्या आणि मिनिटभर परता.
५) आता त्यात तिखट, गरम मसाला, आमसुलं, सुक्या खोब-याचा कूट घाला. नीट मिसळून घ्या. हवं असल्यास अगदी थोडं (पाव कप) पाणी घाला.
६) झाकण ठेवून मंद आचेवर कोलंबी शिजू द्या. कोलंबी लवकर शिजते. साधारण ५ मिनिटांनी झाकण काढा.
७) नंतर त्यात कोथिंबीर घाला. अजून २ मिनिटं शिजवा. गॅस बंद करा.
करंदीचं सुकं तयार आहे. आवडीनुसार तिखटाचं प्रमाण वाढवा. फार वेळ ठेवणार असाल तर एखाद्या तासानं आमसुलं काढून टाका, नाहीतर फार आंबटपणा येईल. करंदीचं सुकं तांदळाची भाकरी किंवा साध्या पोळीबरोबरही चांगलं लागतं. आवडत असल्यास पावाबरोबरही खाऊ शकता. याच पध्दतीनं कोलंबीचंही सुकं करता येतं.
मग करून बघा. फोटो काढा आणि मला पाठवा. कसं झालं होतं तेही कळवा.
सोशल नेटवर्किंगवर पोस्ट शेअर करताना या पेजचा जरूर उल्लेख करा.