पुरणपोळी

आज होळी आहे. अर्थातच पुरणपोळीचा दिवस! मला फार कमी गोड पदार्थ मनापासून आवडतात, त्यातली एक पुरणपोळी आहे. लहान असताना आजी जेव्हा सणांना पुरणपोळ्या करायची तेव्हा लहान लहान वाट्यांमध्ये ताजं कढवलेलं तूप वाढायची. त्या तुपात भिजवलेली पुरणपोळी काय अफलातून लागायची! मला घरीच कढवलेलं तूप आवडतं विकतचं आवडत नाही हे आजी जाईपर्यंत म्हणजे तिच्या वयाच्या चौ-याण्णव्या वर्षापर्यंत तिच्या लक्षात होतं, कारण मी हा स्वभाव विशेष तिच्याकडूनच उचलला आहे.

आपल्याकडे महाराष्ट्रात पुरण करतात ते हरभरा डाळीचं. त्यातही गूळ वापरून केलेलं पुरण हे जास्त चवदार आणि खमंग लागतं.  गुजरातेत तुरीची डाळ वापरून पुरणपोळ्या करतात. दक्षिणेत गुळाचंच पुरण पण त्यात ओला नारळ वापरतात. कोईमतूरला बाबांचे एक पक्षकार होते त्यांच्या घरी आम्ही एकदा गेलो होतो. तेव्हा त्यांच्या बायकोनं ही मोठ्या पुरीच्या आकाराची, कापराचा स्वाद असलेली पुरणपोळी खिलवली होती. पारशी लोक जी पुरणपोळी करतात त्यात सुकामेवा तसंच इसेन्स वापरतात आणि एखाद्या पुडिंगप्रमाणे एकावर एक थर देऊन लाटतात.

आज मी आपल्या नेहमीच्या पारंपरिक पुरणपोळीची रेसिपी शेअर करणार आहे.

पुरणपोळी

IMG_4923

पुरणाचं साहित्य – अर्धा किलो हरभरा डाळ, अर्धा किलो केमिकलविरहीत गूळ, अर्धी वाटी साखर, १ टीस्पून जायफळ पूड, अर्धा टीस्पून जायपत्री पूड, पाव टीस्पून मीठ, १ टीस्पून तेल, ४ ते ५ वाट्या पाणी

पोळीचं साहित्य – ६ वाट्या कणीक, २ वाट्या मैदा, १ टीस्पून तेल

कणीक मुरवत ठेवण्याचं साहित्य – २ टेबलस्पून तेल, पाव टीस्पून मीठ, १ टेबलस्पून पाणी

पोळी लाटण्यासाठी – मैद्याच्या चाळणीनं चाळलेली तांदळाची पिठी

पुरणाची कृती –

१) डाळ स्वच्छ धुवून घ्या.  एका मध्यम आकाराच्या कुकरमध्ये धुतलेली डाळ, पाणी,  तेल आणि मीठ घाला.

२) कुकरचं झाकण शिटीसकट लावा. गॅसवर मोठ्या आचेवर ४-५ शिट्या होऊ द्या. ५ मिनिटं बारीक गॅसवर ठेवा.

३) कुकरचं प्रेशर गेल्यावर डाळ एका मोठ्या चाळणीवर निथळायला ओता. चाळणीखाली बसेल असं पातेलं ठेवा.  मी दिलेल्या पाण्यात बहुतेक पाणी उरणार नाहीच.

४) शिजलेली डाळ गरम असतानाच एका मोठ्या नॉनस्टिक भांड्यात घाला. त्यात गूळ आणि साखर घाला.

५) मध्यम आचेवर पातेलं ठेवा. गूळ आणि साखर विरघळला की हे मिश्रण पातळ होईल.

६) आता मोठ्या आचेवर सतत हलवत हे मिश्रण घट्ट होईपर्यंत शिजवा. याला पुरणाला चटका देणं म्हणतात. पुरण शिजत आलं की नाही हे तपासण्याची सोपी खूण म्हणजे उलथनं किंवा लाकडी चमचा त्यात न पडता उभा राहिला पाहिजे. उलथनं उभं राहिलं की पुरण शिजलं असं समजा.

७) गॅस बंद करा. पुरण गरम असतानाच पुरणयंत्रातून वाटून घ्या म्हणजे ते मऊसूत वाटलं जाईल. हे पुरण तयार झालं.

पोळीची कृती –

१) पोळीसाठी दिलेलं साहित्य एकत्र करून नेहमीच्या पोळ्यांना भिजवतो तशी कणीक भिजवून एका बंद डब्यात ठेवून द्या.

२) जवळपास एका तासानंतर कणीक मुरवत ठेवण्याचं साहित्य मिक्सरच्या छोट्या भांड्यात घालून चांगलं फिरवून घ्या. हे फिरवलेलं मिश्रण दुधाळ दिसतं.

३) आता भिजवलेल्या कणकेत हे मिश्रण घाला आणि कणीक खूप मळा. कणीक चांगली तुकतुकीत दिसायला हवी.

IMG_4912

पोळीची कृती –

१)  भिजवलेल्या कणकेचा लिंबाएवढा गोळा घ्या. तेवढाच पुरणाचा गोळा घ्या.

२) हातावर कणकेची वाटी करून पराठ्यांचं सारण भरतो तसं पुरण भरून घ्या. गोळा नीट बंद करा.

३) हातानं भाकरीसारखा उंडा करा. हातावरच तो जरा कडा दाबून पुरीइतपत मोठा करा.

४) तांदळाच्या पिठीत हा उंडा हलक्या हातानं घोळवून पोळपाटावर कडा लाटत हलक्या हातानं पोळी लाटा.

५) नॉनस्टिक तव्यावर दोन्ही बाजुंनी खरपूस भाजा. पुरणपोळी तयार आहे.

मी पुरणपोळी भाजताना तेल किंवा तूप लावत नाही. पण काही लोक लावतात. तेव्हा आपल्या आवडीनुसार भाजा. अशी खमंग भाजलेली गरम पुरणपोळी भरपूर साजुक तुपाबरोबर खा. किंवा गार पुरणपोळी कुस्करून फ्रीजमधल्या थंडगार दुधात भिजवून खा. गरम पुरणपोळीबरोबर, बटाट्याची खमंग भाजी, कटाची तिखट आमटी, कुरकुरीत भजी आणि मसालेभात असा मेन्यू करा. अफलातून लागतो.

2 thoughts on “पुरणपोळी

  1. मी स्वतः कधी पुरण बनवला नाहीये,फक्त पोळया लाटून भाजल्या आहेत, या वर्षी नक्की प्रयत्न करून पाहींन. thanks

    Like

Leave a Reply

Fill in your details below or click an icon to log in:

WordPress.com Logo

You are commenting using your WordPress.com account. Log Out /  Change )

Facebook photo

You are commenting using your Facebook account. Log Out /  Change )

Connecting to %s

%d bloggers like this: