कटाच्या आमटीच्या दोन रेसिपीज मला माहीत आहेत. त्यातली पहिली आहे कटाची ब्राह्मणी आमटी आणि दुसरी आहे ब्राह्मणेतर समाजात केली जाणारी झणझणीत कटाची आमटी जी मला जास्त आवडते.
कटाची ब्राह्मणी आमटी
साहित्य – अर्धी वाटी पुरण किंवा २ वाट्या पुरणाचा कट (डाळ शिजवल्यावर जे पाणी निथळतं ते), १ टेबलस्पून चिंचेचा कोळ, २ टीस्पून काळा मसाला, १ टीस्पून तिखट, अर्धा टीस्पून हळद, ८-१० कढीपत्त्याची पानं, १ टेबलस्पून तेल, मोहरी, पाव टीस्पून हिंग, मीठ चवीनुसार (कट वापरलात तर १ टेबलस्पून गूळ घाला), थोडी बारीक चिरलेली कोथिंबीर
कृती –
१) एका पातेल्यात तेलाची मोहरी हिंग घालून खमंग फोडणी करा. त्यात कढीपत्ता घाला.
२) आता त्यात चिंचेचा कोळ, गूळ, काळा मसाला, तिखट, मीठ घालून २ वाट्या पाणी घाला.
३) खळखळून उकळी आली की पुरण पाण्यात कालवून घाला. पुरण वापरणार असाल तर गूळ घालू नका.
४) कोथिंबीर घालून परत चांगली उकळी येऊ द्या.
कटाची आमटी तयार आहे.
ब्राह्मणेतर समाजात केली जाणारी आमटी
साहित्य – अर्धी वाटी पुरण किंवा २ वाट्या पुरणाचा कट (डाळ शिजवल्यावर जे पाणी निथळतं ते), १ टेबलस्पून चिंचेचा कोळ, २ टीस्पून काळा मसाला, १ टीस्पून तिखट, अर्धा टीस्पून हळद, ८-१० कढीपत्त्याची पानं, १ टेबलस्पून तेल, मोहरी, पाव टीस्पून हिंग, मीठ चवीनुसार (कट वापरलात तर १ टेबलस्पून गूळ घाला), थोडी बारीक चिरलेली कोथिंबीर
भाजण्याचा मसाला – एक मोठा कांदा, २ टेबलस्पून सुकं खोबरं, ८-१० लसूण पाकळ्या, १ इंच आलं ( कांदा डायरेक्ट गॅसवर भाजा. कढईत सुकं खोबरं कोरडं भाजा. थोड्याशा तेलावर आलं-लसूण आणि भाजलेल्या कांद्याच्या फोडी परतून घ्या. आणि बारीक गोळी वापरा.)
कृती –
१) एका पातेल्यात तेलाची मोहरी हिंग घालून खमंग फोडणी करा. त्यात कढीपत्ता घाला.
२) आता त्यात चिंचेचा कोळ, गूळ, काळा मसाला, तिखट, वाटलेला मसाला, मीठ घालून २ वाट्या पाणी घाला.
३) खळखळून उकळी आली की पुरण पाण्यात कालवून घाला. पुरण वापरणार असाल तर गूळ घालू नका.
४) कोथिंबीर घालून परत चांगली उकळी येऊ द्या.
कटाची झणझणीत आमटी तयार आहे. ही आमटी अर्थातच पुरणपोळीबरोबर उत्तम लागतेच पण गरम साध्या भाताबरोबरही अप्रतिम लागते. किंवा नुसतीच ओरपायलाही मस्त लागते.
सोशल नेटवर्किंग साईटवर ही पोस्ट शेअर करताना या ब्लॉगचा जरूर उल्लेख करा.