कुकर मेथड

एकदा माझ्या कुकर मेथडबद्दल लिहीन असं मागे एकदा मी म्हटलं होतं. परतलेल्या भाज्या सोडल्या तर रोजचा बहुतेक सर्व स्वयंपाक मी कुकरमध्ये करते. कुकरमध्ये स्वयंपाक करण्याचे किती तरी फायदे आहेत. सगळ्यात महत्वाचा फायदा म्हणजे कुकरमध्ये पदार्थ केल्यानं त्यातली पोषणमूल्यं ब-यापैकी शाबूत राहतात. उघड्या कढयांमध्ये किंवा भांड्यांमध्ये पदार्थ शिजवतो तेव्हा त्यातल्या पोषणमूल्यांचा मोठ्या प्रमाणावर नाश होत असतो. शिवाय स्वयंपाक अतिशय झटपट होतो. अत्यंत कमी तेल-तुपात पदार्थ करता येतात (यात बचतीचा हेतू नसून प्रकृतीसाठी ते चांगलं असतं), इंधनाची बचत होतेच.

IMG_5071

माझ्याकडे वेगवेगळ्या प्रकारचे पाच कुकर आहेत. या सगळ्या कुकर्सचा मी नियमितपणे वापर करते. सगळ्यात जुना जो कुकर आहे तो १४ वर्षं जुना आहे. दुसरा १२ वर्षं जुना आहे, बाकीचे दोन ३-४ वर्षं जुने आहेत तर प्रेशर पॅन जे आहे ते दोन वर्षांपूर्वी घेतलेलं आहे. हे सांगण्याचा उद्देश असा की जर नीट वापरलेत तर कुकर वर्षांनुवर्षं चांगले राहतात. कुकरच्या गास्केट (रबरी रिंग ), व्हॉल्व्ह आणि शिट्या नीट साफ ठेवल्यात तर कुकर उत्तम अवस्थेत राहतात. कुकर धुताना रबरी रिंग काढून मग धुवावा तसंच ती रिंगही स्वच्छ धुवावी. शिट्यांचे सगळे भाग वेगवेगळे करून मग शिटी धुवून, कोरडी करून परत जोडून ठेवावी. कारण कुकर वापरतो तेव्हा कुकरमध्ये शिजवलेल्या पदार्थांचे कण शिटीत जातात.

माझा सगळ्यात मोठा जो कुकर आहे तो अल्युमिनियमचा आहे. हा कुकर मी इडली, ढोकळा, कोथिंबीर वडी-अळूवडीचे रोल वाफवायला, पुडिंग वाफवायला किंवा बरेच लोक जेवायला येणार असतील तर मग जेव्हा जास्त प्रमाणावर भात-वरण लावायचं असेल त्यासाठी वापरते. बाकीचे चारही कुकर्स स्टीलचे आहेत. त्यातला मध्यम आकाराचा कुकर (मला लिटरमध्ये सांगता येत नाही) मी रोजचं वरण-भात, भातांचे वेगवेगळे प्रकार, मासे स्टीम करणं, वरणफळं किंवा उकडशेंगोळ्यांसारखे वन बोल मीलचे प्रकार करण्यासाठी वापरते. त्या खालोखालचा कुकर आहे त्यात खिचडी, जास्त प्रमाणात करण्याच्या उसळी आणि भाज्या, सूपच्या भाज्या शिजवणं आदी करते. आणि अगदी लहान जो कुकर आहे त्यात रोजच्या भाज्या-उसळी करते. प्रेशर पॅनमध्ये जास्त प्रमाणात पुलाव, मसालेभात करायचा असेल तर ते करते. परवा तर मी चीज मॅकरोनीही डायरेक्ट कुकरलाच केली होती आणि ती उत्तम झाली होती.

प्रत्येक कुकरचा पदार्थ शिजण्याचा कालावधी वेगवेगळा असतो. पदार्थाचं प्रमाण किती कमी-जास्त आहे यावरही तो अवलंबून असतो. शिवाय काही पदार्थ जेमतेम शिजलेलेच चांगले लागतात तर काही अगदी मऊ शिजलेले. हे सगळं लक्षात घेऊन कुकरचा वापर करायला हवा. काही कुकरच्या शिट्या दीर्घ असतात तर काहींच्या अगदी लहान कालावधीच्या अंतरानं होणा-या. आपापल्या घरातल्या कुकर्सच्या या खोडी आपल्याला माहीत असतातच. तेव्हा सरसकट नियम न लावता आपल्या अनुभवानं याबद्दलचे निकष ठरवावेत. एक वाटी छोले असतील तर ते लहान कुकरमध्ये अगदी १५-२० मिनिटांत मऊ शिजतील पण ५ वाट्या छोले शिजायला जास्त वेळ लागेल हे लक्षात ठेवायला हवं. पदार्थ कुकरच्या भांड्यात शिजवताय की डायरेक्ट कुकरमध्ये यावरही पदार्थ शिजण्याचा कालावधी अवलंबून असतो. डायरेक्ट शिजवत असाल तर कमी वेळ लागतो.

IMG_5061

कुकरमध्ये या भाज्या तुम्ही डायरेक्ट करू शकता – गवार, पापडी, श्रावण घेवडा, फरसबी, चवळी (वाली) किंवा तत्सम शेंगा, भरलं वांगं, भरलं कारलं, भरली दोडकी, वांग्याची साधी रस्सा भाजी, दोडक्याची साधी रस्सा भाजी, दुधी भोपळ्याची भाजी, लाल भोपळ्याची भाजी, तोंडल्याची रसभाजी (कोबी, फ्लॉवर, भेंडी, तोंडली, सर्व पालेभाज्या या परतून केल्या जाणा-या भाज्या कुकरमध्ये करू नका) पनीरची रस भाजी.

डायरेक्ट करता येतील अशा उसळी – छोले, राजमा, मटकी, चवळी, मूग, डबल बी, पांढरे वाटाणे, हिरवे वाटाणे, साधे चणे किंवा हरभरे, वाल

डायरेक्ट करता येतील असे आमटी किंवा वरणांचे प्रकार – सांबार, साधं फोडणीचं वरण, मुगाच्या सालीच्या डाळीचं वरण, अख्खा मसूर, टोमॅटोचं वरण, चिंचगुळाची आमटी, मुगाची आमटी, चण्याच्या डाळीचं दालफ्राय, माखी दाल आदी प्रकार करता येतील.

वन बोल मील्स – खिचडी, पुलाव, मसालेभात, वरणफळं, उकड-शेंगोळे, मॅकरोनी

मांसाहारी – चिकन रस्सा, मटन रस्सा, स्टीम्ड फिश

आता हे पदार्थ मी डायरेक्ट कसे करते त्याची काही उदाहरणं देते :

गवार, पापडी किंवा तत्सम शेंगांच्या भाज्या – पाव किलो गवार असेल तर अगदी लहान (मला वाटतं दीड ते दोन लिटरचा कुकर) १ टीस्पून तेल गरम करा. नेहमीसारखी हिंग-हळद-मोहरीची फोडणी करा. त्यावर मोडलेल्या शेंगा घाला. त्यात आपल्याला हवे असलेले मसाले घाला (तिखट, काळा मसाला, धणे-जिरे पूड, मीठ, दाण्याचं कूट आणि थोडासा गूळ), सगळं नीट हलवून घ्या,२ टेबलस्पून पाणी घाला. कुकरचं झाकण शिटीसकट लावा. एक शिटी करा. गॅस बंद करा. प्रेशर सुटलं की भाजी काढून घ्या.

भरली वांगी, दोडकी इत्यादी – नेहमीसारखी फोडणी करा. त्यात कांदा परता. मसाला भरलेली भाजी लावा.पाण्याचा एक हबका मारा. शिटीसकट झाकण लावा. जेमतेम पाच मिनिटं प्रेशर येऊ द्या. गॅस बंद करा. शिटीची वाट पाहिलीत तर भाजीचा लगदा होईल. (कारलं करण्याआधी मीठ लावून किंवा पाण्यात घालून उकडून कडूपणा कमी करा आणि मग हीच कृती करा.) मी वर म्हटलं तसं इथे आपापल्या कुकरचा अंदाज घ्या. पनीरची भाजी करताना गॅस लवकर बंद करा. पनीर दोन मिनिटांत मऊ होतं.

IMG_5069

उसळी –उसळींसाठी आपण वेगवेगळ्या प्रकारांनी फोडण्या करतो. म्हणजे छोल्यांना मोहरी घालत नाही नुसतंच तेल तापवतो किंवा मराठमोठ्या उसळींना हिंग-मोहरीची फोडणी घालतो. तेव्हा आपण ज्या पध्दतीनं फोडणी करत असाल तशी ती करा. कांदा-टोमॅटो परतायचा असेल तर तो परता. हवे ते मसाले घाला. भिजवलेलं कडधान्य धुवून घाला. कोथिंबीर घाला. सगळं नीट एकत्र करा. शिटीसकट कुकरचं झाकण लावा. उसळी करताना एक लक्षात ठेवा की प्रत्येक कडधान्याला शिजायला वेगवेगळा वेळ लागतो. मटकी, मसूर फार लवकर शिजतात. त्या खालोखाल पांढरे वाटाणे, चवळी इत्यादी, चणे, छोले, राजमा यांना शिजायला वेळ लागतो. त्यामुळे हा सगळा अंदाज घेऊन मग गॅस बंद करा.

वरणांचे प्रकार – वरणाला करतो तशी फोडणी करा.  आपल्याला हवं असेल तसं, कांदा, लसूण, टोमॅटो, भाज्या जे काय घालायचं असेल ते घाला. हवे असलेले मसाले घाला. धुतलेली डाळ घाला. सगळं नीट हलवून घ्या. जितपत पातळ हवं असेल त्याप्रमाणात पाणी घाला. शिटीसकट झाकण लावा. आपल्या अंदाजानं गॅस बंद करा. मसूर, मूग, मूग डाळ, चणा डाळ या डाळी आणि कडधान्यं लवकर शिजतात. तूरडाळीला वेळ लागतो. गॅस बंद केल्यावर आणि वरण शिजल्यावर जर घट्ट वाटलं तर हवं तितकं पाणी घालून सारखं करून घ्या.

वन बोल मील्स – खिचडी करताना नेहमीसारखी फोडणी करा. त्यात तुम्ही ज्या काय भाज्या आणि मसाले घालत असाल ते घाला. धुतलेले डाळ-तांदूळ घाला, कोथिंबीर घाला. आपल्या अंदाजानं शिटी करा. पुलाव करताना भाज्या परतून घ्या. त्यात तांदूळ परता, मसाले, पाणी घाला. पुलावाला पाणी घालताना दीडपटच घाला म्हणजे पुलाव मोकळा राहील. कुकरला प्रेशर आलं की लगेच गॅस बंद करा. पुलाव सळसळीत राहीला पाहिजे. मसालेभाताला एक शिटी करा. मसालेभात मऊच चांगला लागतो.  वरणफळांबद्दल आणि उकडशेंगोळ्यांबद्दल मी मागे लिहिलेलं आहेच.

मांसाहारी – चिकन करताना तेल गरम करून कांदा-टोमॅटो असं जे काय हवं असेल ते परता. हवे ते मसाले घाला. धुतलेलं आणि वाटण लावून ठेवलेलं चिकन घाला. हवं तितकं पाणी घाला. एका शिटीत चिकन शिजतं. मटनाला वेळ लागतो.

स्टीम्ड फिश – कुकरमध्ये खाली पाणी घाला. त्यावर जाळी ठेवा. कुकरचा डबा ठेवा. त्या डब्यावर बसणा-या चाळणीत मसाला लावलेले मासे ठेवा. शिटी न लावता कुकरचं झाकण लावा. जो मासा असेल त्याप्रमाणात वाफवा. पापलेटसारख्या माशाला कमी वेळ (५-७ मिनिटं) लागतो तर सुरमईसारख्या माशाला (८-१० मिनिटं) लागतात.

कोथिंबीर वडी, अळू वडी वगैरे तुम्हीही कुकरलाच वाफवत असणार. सुपच्या भाज्या कुकरमध्ये डायरेक्ट टाकल्यात तर दोन शिट्यांत शिजतात.

कदाचित तुमच्यापैकी बरेज जण ही पध्दत वापरतही असाल. जे वापरत नसतील त्यांनी माझी ही कुकर मेथड वापरून बघा. मला नक्की तुमचे अनुभव सांगा.

सोशल नेटवर्किंगवर ही पोस्ट शेअर करताना या ब्लॉगचा जरूर उल्लेख करा.

Advertisements

12 comments

 1. Hi Sayali
  Tuze mails farach upayukt astat g.
  Specially daily rutin baddal je lihites te tar
  Mastach
  Nust vachal Tari te experience kelya sarkh vatat
  Thax for being there as a guideline for us
  Ani Ashich lihit raha
  Mrunmai

  Sent from my iPhone

  >

  Like

 2. Yes, thanks for sharing, its amazing. Me sudhha cooker madhe barychsha bhajya kelya mule maze gas bill ekdam kami ale. thanks once again

  Like

 3. Hi,Sayali,
  मी प्रथमच तुझ्या पोस्ट पहिल्या. खूप छान माहिती आहे.अगदी घरातल्या काट्यावरचे अनुभव वाटतात.
  Tuzya new post mala mail war kaltil ka?
  FB warun tuzi link follow karta yet nahiye

  Like

  1. Thanks! प्लीज ब्लॉग फॉलो करा मग तुम्हाला नोटिफिकेशन्स मिळत राहतील. किंवा अन्न हेच पूर्णब्रह्मचं फेसबुक पेज लाइक करा.

   Like

 4. Hi
  Tumhi cooker sagle outer lid wale use.kartay any special reason.
  Mazya kade outer lid chi ss chi handi aahe pan sarkhi kharab hote .
  Maza vachnat alay innerlid wale jast safe astat.
  Mi.cooker madhe gavar batate daliya khichdi direct karte
  Daal dhokli ani macroni cha vichar karaychi pan kadhi kela nhi ata karun baghel
  Very nice collection

  Like

 5. हॅलो सायली राजाध्यक्ष
  तुमचा ब्लॉग खूप आवडला. आम्ही मूळचे सोलापूरचे असल्याने माझ्या खाण्याच्या आवडीनिवडी बऱ्याच अंशी तुमच्या सारख्या आहेत. त्यामुळे सर्वच पदार्थ आणि त्याबरोबरीने दिलेल्या तुमच्या आवडी अगदी मीच लिहिल्या आहेत असं वाटलं.
  वन बोल मिल हा प्रकार खूप छान आहे आणि हल्लीच्या धावपळीच्या काळात खूप उपयुक्त आहे.
  आपल्या खाद्यसंस्कृतीतल्या मागे पडलेल्या अजून खूप रेसेपी तुमच्याकडून अपेक्षित आहे.

  Like

Leave a Reply

Fill in your details below or click an icon to log in:

WordPress.com Logo

You are commenting using your WordPress.com account. Log Out /  Change )

Google photo

You are commenting using your Google account. Log Out /  Change )

Twitter picture

You are commenting using your Twitter account. Log Out /  Change )

Facebook photo

You are commenting using your Facebook account. Log Out /  Change )

Connecting to %s