बाजरीचा खिचडा

आपल्याकडे बाजरी फक्त हिवाळ्यात खाल्ली जाते. बाजरी उष्ण असते असा एक समज प्रचलित आहे. खरं तर बाजरीमध्ये उच्च पोषणमूल्यं असतात. बाजरीत कॅल्शिअम, आयर्न आणि मॅग्नेशियम मोठ्या प्रमाणावर असतं. त्यामुळे बाजरीचा जेवणात नियमित वापर व्हायला हवा. बाजरीला इंग्रजीत पर्ल मिलेट असं सुंदर नाव आहे. बाजरी दिसतेही मोत्यांसारखीच. मूळ आफ्रिकन असलेली बाजरी फार पूर्वी आपल्याकडे पिकवायला लागले आणि आता तर ती आपल्याकडचीच होऊन गेली आहे.

बाजरीची भाकरी तर आपण करतोच. त्याचबरोबर थालिपीठाच्या भाजणीत बाजरी वापरली जातेच. खिचडा हा एक वन डिश मीलचा प्रकार ब-याच राज्यांमध्ये वेगवेगळ्या प्रकारांनी केला जातो. राजस्थानात शाकाहारी खिचडा केला जातो. ज्यात बाजरीशिवाय तांदूळ आणि मूगडाळ वापरतात. हैदराबादकडे मटण खिचडा फारच लोकप्रिय आहे. काही ठिकाणी गव्हाचा शाकाहारी तसंच मटण घालून केलेला खिचडा करतात. आमच्याकडे मराठवाड्यात शाकाहारी खिचडा केला जातो. ज्वारी किंवा बाजरी आणि थोडे तांदूळ, मूगडाळ वापरून केला जाणारा हा प्रकार अतिशय पौष्टिक आणि रूचकर लागतो.  करायला अतिशय सोप्या अशा या पदार्थाची रेसिपी मी आज शेअर करणार आहे.

बाजरीचा खिचडा

IMG_4864

साहित्य – १ वाटी बाजरी, १ वाटी मूग डाळ, अर्धी वाटी तांदूळ, ३-४ हिरव्या मिरच्या, पाव वाटी शेंगदाणे, २ टेबलस्पून सुकं खोबरं (लाल भाजून), ४-५ लसूण पाकळ्या, १ टीस्पून जिरं, १ टीस्पून काळा मसाला, मीठ चवीनुसार

फोडणीचं साहित्य – पाव वाटी तेल, मोहरी, जिरं, १०-१२ लसूण पाकळ्या गोल चिरलेल्या, ५-६ सुक्या लाल मिरच्या, ८-१० कढीपत्त्याची पानं, पाव टीस्पून हळद, पाव टीस्पून तिखट, चिमूटभर हिंग

कृती –

१) बाजरी स्वच्छ धुवून पाणी पूर्णपणे काढून १५ मिनिटं निथळत ठेवा.

२) १५ मिनिटांनंतर मिक्सरच्या भांड्यात घालून बाजरी जाडसर वाटून घ्या. बरेच लोक बाजरीचा कोंडा काढून टाकतात पण तसं करू नका. कारण हा कोंडाही पौष्टिक असतो.

३) मूगडाळ-तांदूळ धुवून घ्या.  आता बाजरीची जाडसर भरड, मूगडाळ, तांदूळ एका स्टीलच्या पातेल्यात घाला. त्यात ५ वाट्या पाणी घाला.

४) सुकं खोबरं, लसूण, जिरं आणि हिरवी मिरची मिक्सरमधून एकत्र वाटून घ्या. हे वाटण त्यात घाला.

५) शेंगदाणे, काळा मसाला आणि मीठ घाला.

६) मोठ्या कुकरमध्ये हे पातेलं ठेवून कुकरच्या दोन शिट्या करून ७-८ मिनिटं बारीक गॅसवर ठेवा. प्रत्येक कुकरचा अंदाज वेगळा असतो. तेव्हा आपल्या अंदाजानुसार ठेवा. साध्या खिचडीपेक्षा ५-७ मिनिटं जास्त लागतील.

७) प्रेशर सुटल्यावर चमच्यानं नीट हलवून एकत्र करा. कारण बाजरीचा लगदा भांड्याच्या तळाशी बसतो.

खिचडा तयार आहे.

फोडणीची कृती –

१) छोट्या कढलीत तेल तापवा. तेल कडकडीत तापल्यावर त्यात मोहरी, जिरं घाला.

२) ते तडतडलं की त्यात लसूण घालून चांगला लाल होऊ द्या.

३) आता त्यात कढीपत्ता घाला. कढीपत्ता तळला गेला की त्यात सुक्या लाल मिरच्या घाला.

४) नंतर हिंग, हळद आणि लाल तिखट घाला. लगेचच गॅस बंद करा.

खिचडा देताना एका बोलमध्ये शिजलेला खिचडा घ्या. त्यावर हव्या त्या प्रमाणात फोडणी घाला. बरोबर एखादं सॅलड किंवा कोशिंबीर आणि थंडगार ताक द्या. थंड ताक नको असल्यास गरम साधी कढी द्या. हा खिचडा अतिशय रूचकर लागतो. तेव्हा करून बघा आणि कसा झाला ते नक्की कळवा. फोटो काढले तर तेही पाठवा. याच प्रकाराने ज्वारीचाही खिचडा करता येतो.

सोशल नेटवर्किंगवर ही पोस्ट शेअर करताना त्यात या ब्लॉगचा जरूर उल्लेख करा.

4 thoughts on “बाजरीचा खिचडा

  1. Hi Sayali,
    Bajri Khichada khup divas vachat hote ani karaicha tharvat hote….akher Shaniwari muhurt lagla…. kai mast zala hota…pharach mast dish…nutritious too…. ghari pan sarvanna avdala… ek maitrin ali hoti tila pan avdala…. recipe cha print out gheun geli ti….
    Thanks,

    Vasudha

    Like

  2. Just tried this Sayali ji … mi Bharata baher rahat aslyamule it was bery hard to find bajari .. finally milali .. and first thing i tried was this.. inspired by you ..thank you .. wish photo post karta aala asta

    Liked by 1 person

Leave a Reply

Fill in your details below or click an icon to log in:

WordPress.com Logo

You are commenting using your WordPress.com account. Log Out /  Change )

Facebook photo

You are commenting using your Facebook account. Log Out /  Change )

Connecting to %s

%d bloggers like this: