लहान मुलांसाठीचे काही सोपे पदार्थ भाग १

अन्न हेच पूर्णब्रह्मच्या ब-याच मैत्रिणींनी त्यांच्या लहानग्यांसाठी काही रेसिपीज शेअर कराव्यात असं सुचवलं आहे. खरं तर आता माझ्या मुली मोठ्या झाल्या आहेत. आणि त्यांचं लहानपण मला आता खूप दूर गेल्यासारखं वाटतंय. म्हणजे लहानपणी त्या काय बोलायच्या, कशा गंमती करायच्या हे लख्ख आठवतं पण त्यांच्यासाठी मी खास खायला काय करायचे याच्या आठवणी काहीशा धूसर झाल्या आहेत. परवाच जेवताना शर्वरी म्हणाली की, आई तू डब्यात बीट आणि गाजराचे जे पराठे द्यायचीस ना ते माझ्या एका मैत्रिणीला खूप आवडायचे. ते ती खायची आणि तिच्या डब्यातलं जंक मी! आता बोला! म्हणजे हिनं जंक खाऊ नये आणि जरा भाज्या हिच्या पोटात जाव्यात म्हणून मी धडपड करायचे आणि ही असं करायची. शिवाय मुलींच्या शाळेचा नियम होता की डब्यात घरी शिजवलेलं पूर्णान्नच दिलं पाहिजे. म्हणजे भाजी-पोळी, पराठा, भाताचे प्रकार, इडली-डोसे इत्यादी. त्यामुळे डब्यात नवीन काय देता येईल याचा सतत विचार असायचा. मोठी सावनी लहानपणी सगळा डबा संपवून येत असे. पण धाकट्या शर्वरीला भाज्या अजिबात आवडायच्या नाहीत (अजूनही आवडत नाहीत) त्यामुळे ती भाजी-पोळी दिली की डबा सांडला म्हणायची आणि स्कूल बॅगमध्ये ते तुकडे तसेच टाकून आणायची.
आज मी अशाच लहान मुलांसाठीच्या मला ज्या आठवतात त्या काही रेसिपीज शेअर करणार आहे. मी आहार तज्ज्ञ नाही. त्यामुळे या फक्त माझ्या वैयक्तिक अनुभवातल्या रेसिपीज आहेत. त्या तुम्ही तुमच्या निकषांनुसारच वापरा. मी खाली जे काही लिहिणार आहे ते माझ्या मुली लहान असताना डॉक्टरांनी जे काही सांगितलं होतं ते आहे. अर्थात माझ्या समजानुसार जे सर्वसाधारणपणे वैज्ञानिकदृष्ट्या मान्य आहे तेच मी या पोस्टमध्ये लिहिणार आहे. सतत नवीन पध्दती रूढ होत असतात. तेव्हा तुम्हाला डॉक्टर किंवा आहार तज्ज्ञ आता जे काय सांगतील त्यानुसारच तुम्ही बाळांचा आहार ठरवा.

अगदी लहान बाळांसाठी म्हणजे आईच्या दुधाव्यतिरिक्त नुकतंच वरचं अन्न खाऊ लागलेल्या बाळांसाठी असं काही करता येईल : अशा म्हणजे सहा महिन्यांहून अधिक वयाच्या बाळांना जेव्हा एखादा नवीन पदार्थ खाऊ घालतो तेव्हा किमान आठवडाभर तोच पदार्थ द्यावा. तो पचला की मग दुसरा पदार्थ खाऊ घालावा. अंडं साधारणपणे एक वर्ष पूर्ण होईपर्यंत देऊ नये कारण अंड्यानं एलर्जी होण्याची शक्यता असते. शिवाय अंडं पहिल्यांदा द्याल तेव्हा ते पूर्ण शिजवलेलंच असावं. हाफ फ्राय किंवा हाफ बॉइल्ड देऊ नये. शिवाय एक वर्षाखालच्या बाळांना प्रोसेस्ड फूड अजिबात देऊ नये. म्हणजे बिस्किटं, चीज, सॉस, मॅगी किंवा तत्सम पदार्थ इत्यादी.

बाळाला सगळ्यात आधी जेव्हा वरचं अन्न सुरू कराल तेव्हा आधी वरणाच्या वरचं पातळ पाणी देऊन बघा. आधी २ चमच्यांनी सुरू करा आणि मग हळूहळू वाढवा. त्यानंतर बाळाला तुम्ही खिमट देऊ शकता. मुगाची डाळ आणि तांदूळ (३ वाट्या तांदूळ, १ वाटी मुगाची डाळ) स्वच्छ धुवून चांगलं वाळवा. मग ते मंद आचेवर जरासं भाजून घ्या. आणि नंतर मिक्सरवर जाडसर पीठ करा. हे चमचाभर पीठ त्यात भरपूर पाणी, चिमूटभर मीठ घालून पेजेपेक्षाही पातळ असं शिजवा आणि बाळाला ते खाऊ घाला. हळूहळू यात कधी तरी चिमूटभर हिंग किंवा चिमूटभर जिरे पूड घालून वेगवेगळ्या चवीचं खिमट तुम्ही देऊ शकता. नंतर हळूहळू शिजवलेल्या भाज्या (आधी एका वेळेला एकच) मग त्यात लाल भोपळा, पालक, दुधी भोपळा, गाजर, बीट, बटाटा असं देऊ शकाल. मीठ, जिरेपूड घातल्यानं चव चांगली येते. अशीच एक-एक भाजी वापरून पातळ सूपही देऊ शकाल. मग हळूहळू काही फळं म्हणजे केळं, सफरचंद किंवा पेअर (कुकरमध्ये शिजवून) द्या. चिकू, पपई, द्राक्षं अशी फळं उशीरा सुरू करा.
यानंतर काही दिवसांनी पातळ उपमा, मऊ इडली कुस्करून, मऊ डोसा कुस्करून, भात-वरण मिक्सरमधून काढून, पातळ शिरा असं देता येईल. काही दिवसांनी पोळी किंवा भाकरी मिक्सरमधून काढून त्यात भाजी घातलेलं पातळ वरण घालून देऊ शकाल. आमच्या वेळेस डॉक्टर सांगायचे की बाळ एक वर्षाचं होईल त्यादिवशी तुमच्या ताटातले सगळे पदार्थ बाळानं खाल्ले पाहिजेत. आताही बहुधा तसंच असावं.

खाली ज्या रेसिपी सांगते आहे त्या एका वर्षापेक्षा मोठ्या मुलांसाठी आहेत.

लहान मुलांसाठी काही सोपी सूप्स –
टोमॅटो सूप – २ टोमॅटो, १ गाजर, कांद्याची एखादी फोड, १ बेबी बटाटा, २ मिरी दाणे, १ कप पाणी घालून कुकरच्या भांड्यात शिजवून घ्या. गार झाल्यावर मिक्सरमध्ये वाटा. लहान पाव कप दूध घाला. चिमूटभर साखर घाला. मीठ घाला. उकळून प्यायला द्या. थोड्या मोठ्या मुलांना (म्हणजे दीड वर्षापेक्षा जास्त), थोडी साय किंवा किसलेलं थोडंसं चीज घाला. याच पध्दतीनं लाल टोमॅटोऐवजी लाल भोपळा वापरूनही सूप करता येईल.
गाजर सूप – २ गाजरं, २ बेबी बटाटे, १ लहान कांदा, २ मिरी दाणे असं सगळं कुकरच्या भांड्यात घाला. कपभर पाणी घालून शिजवा. गार झाल्यावर मिक्सरमध्ये वाटा. लहान पाव कप दूध घाला. मीठ घाला. उकळून प्यायला द्या. जरा मोठ्या मुलांना वरून थोडं लोणी घाला. याच पध्दतीनं गाजराऐवजी कोबी किंवा फ्लॉवर घालूनही सूप करता येईल.
पालक सूप – अर्धी जुडी किंवा २० पालकाची पानं, १ टोमॅटो, १ बेबी पोटॅटो, कांद्याची मोठी फोड, ३-४ मिरी दाणे हे सगळं कुकरच्या भांड्यात घाला. शिजवून थंड करा आणि मिक्सरमध्ये वाटा. पाव कप दूध घाला. वरून थोडी साय किंवा चीज घाला किंवा किसलेलं पनीर घाला.
चिकन सूप – कपभर चिकनचे सूप पीसेस (दुकानात तयार मिळतात) धुवून घ्या. थोड्याशा लोण्यावर किंवा तेलावर एक कांदा चिरून परता, त्यात ३ मिरी दाणे, २ लवंगा, १ लहान तुकडा दालचिनी घाला. त्यावर चिकनचे तुकडे घाला. मीठ घाला. हव्या असल्यास भाज्या घाला. मंद गॅसवर चिकनचा पूर्ण अर्क उतरेपर्यंत उकळा. नंतर चमच्यानं गरम मसाला काढून टाका. लहान मुलांना देताना चिकनची हाडं काढून द्या. हे सूप याच पध्दतीनं आजारी माणसांसाठी तसंच मोठ्या माणसांसाठीही करता येईल.
टोमॅटो वगळता कुठलंही सूप कधीही गाळू नका. कारण त्यातला चोथा निघून जाईल.

10568918_261493810724012_3587899811372608107_n

लहान मुलांसाठी काही सोपे भाताचे प्रकार –
खिचडी – मूग, मसूर, सालीची मूग डाळ, तूर डाळ यापैकी कुठलीही एक डाळ आणि तांदूळ समप्रमाणात घ्या. स्वच्छ धुवून घ्या. थोड्याशा तूपावर मोहरी-जिरं घाला. कढीपत्त्याची ३-४ पानं घाला. डाळ-तांदूळ परता. त्यात चमचाभर दही घाला. दुप्पटीपेक्षा थोडंसं जास्त पाणी घाला. धणे-जिरे पूड आणि मीठ घाला. आवडत असतील तर थोडे शेंगादाणे घाला. खात असतील तर थोडं तिखट किंवा काळा मसाला घाला. वरून कोथिंबीर घाला. तयार खिचडीवर साजूक तूप घालून खायला द्या.
याच खिचडीत आवडीप्रमाणे भाज्या घालूनही खिचडी करू शकता.
पुलाव – लांब तांदूळ तासभर आधी धुवून ठेवा. गाजर, फ्लॉवर, बटाटा, सिमला मिरची, फरसबी या किंवा आवडीप्रमाणे यापैकी कुठल्याही भाज्या शिवाय मटार घ्या. तूप गरम करा. त्यावर थोडा खडा गरम मसाला (२मिरी, २ लवंगा, २ वेलच्या, १ तमालपत्र) घाला. ते परतून भाज्या घाला. भाज्या परतल्या की तांदूळ परता. दुप्पट पाणी घाला. मीठ घाला. शिजवा. आवडत असल्यास उतरवताना थोडं चीज किसून घाला. हा पुलाव डब्यात द्यायलाही उत्तम लागतो.
कॉर्न भात – तांदूळ आणि उकडलेले कॉर्न दाणे समप्रमाणात घ्या. तुपावर थोडं जिरं घाला. एखादी कमी तिखट हिरवी मिरची मोठे तुकडे करून घाला. थोडंसं आलं किसून घाला. धुतलेले तांदूळ परता. नंतर त्यात कॉर्न दाणे घाला. दुप्पट पाणी घाला. मीठ घाला. थोडा लिंबाचा रस घाला. शिजवा. यात हवं असल्यास किसलेलं गाजरही घालू शकता.
मटार भात – तांदूळ आणि मटार समप्रमाणात घ्या. तेलावर कांदा परता. नंतर त्यात टोमॅटो घालून परता. मग मटार घालून चांगलं परता. धुतलेल्या तांदळाला थोडा काळा मसाला चोळून घ्या. आता त्यावर तांदूळ परता. दुप्पट पाणी घाला. थोडासा लिंबाचा रस आणि मीठ घाला. शिजवा. वरून खोबरं-कोथिंबीर घालून द्या. याच प्रकारे तोंडली भातही करता येतो.
भाताचे हे प्रकारही मुलांना डब्यात देता येतील असे आहेत. हे सगळे पदार्थ मोठ्या माणसांना साध्या आजारांमध्ये द्यायलाही चालतील.
या पोस्टचा पुढचा भाग पुढच्या पोस्टमध्ये लिहीन.


सोशल नेटवर्किंगवर ही पोस्ट शेअर करताना या ब्लॉगचा जरूर उल्लेख करा.

5 thoughts on “लहान मुलांसाठीचे काही सोपे पदार्थ भाग १

  1. Hello stylitai
    Your blog is really amazing!! Party chi tyari me kuthala lakhat wachali Mala nahi milat aaha. Please sangu shakshil ka? THANKS

    Like

Leave a Reply

Fill in your details below or click an icon to log in:

WordPress.com Logo

You are commenting using your WordPress.com account. Log Out /  Change )

Facebook photo

You are commenting using your Facebook account. Log Out /  Change )

Connecting to %s

%d bloggers like this: