लहान मुलांसाठीचे सोपे पदार्थ भाग २

लहानग्यांना खायला काय द्यायचं हा प्रश्न आयांसमोर सतत असतो. लहानग्यांसाठी काही सोपे पदार्थ सुचवणारी पोस्ट मी परवा लिहिली होती. या पोस्टमध्ये अगदी लहान बाळांना खायला काय देता येईल ते सुचवलं होतं. तसंच काही सोपी सूप्स आणि भाताचे काही सोपे प्रकारही सांगितले होते. आज त्याच

पोस्टचा पुढचा भाग.

10505105_259899190883474_5936234508933346427_o

पराठे आणि पु-यांचे काही सोपे प्रकार –

साधा पराठा – कणकेत थोडं मोहन आणि मीठ घालून ती भिजवा. आपल्याला हव्या त्या आकारात घडीचे पराठे करा. तूप किंवा लोणी लावून खमंग भाजा. कुठल्याही चटणीबरोबर, तूप-साखरेबरोबर, गूळ-तुपाबरोबर, साध्या भाजीबरोबर, एखाद्या घट्ट डाळीबरोबर द्या.
जि-या-मि-याचा पराठा – कणीक भिजवतानाच त्यात जाडसर कुटलेलं जिरं आणि थोडी जाडसर कुटलेली मिरपूड आणि मीठ घाला. तूप लावून पराठे खमंग भाजा.
पालक पराठा – पालक देठांसकट थोड्या पाण्यात घालून अर्धवट शिजवा. थंड करून मिक्सरमध्ये घाला. आवडत असल्यास थोडासा लसूण वाटताना घाला. या पेस्टमध्ये बसेल तितकी कणीक, तिखट, मीठ, जिरे पूड घाला. जाडसर पराठे लाटून तेल लावून खमंग भाजा.
आलू पराठा १ – बटाटे उकडून मॅश करा. त्यात धणे-जिरे पूड, थोडा आमचूर, मीठ, थोडं वाटलेलं आलं-लसूण-मिरची(लहान मुलांसाठी आहे म्हणून थोडं, मोठ्यांसाठी करताना प्रमाण वाढवा) भरपूर बारीक चिरलेली कोथिंबीर असं एकत्र करून सारण तयार करा. कणकेच्या पारीत हे सारण भरून पराठे करा. आवडीनुसार तेल, तूप किंवा लोणी लावून भाजा.
आलू पराठा २ – मॅश केलेला बटाटा, बारीक चिरलेला पालक, वाटलेलं लसूण मिरची, मीठ असं एकत्र करा. त्यातच कणीक घालून पीठ मळून घ्या. पराठे आवडीनुसार तेल, तूप किंवा बटर लावून भाजा.
मेथी पराठा – मेथी स्वच्छ धुवून बारीक चिरा. त्यात वाटलेला लसूण घाला. एखादं केळं कुस्करून घाला. एखादा चमचा दही घाला. तिखट-मीठ-धणे-जिरे पूड-हळद घाला. थोडे तीळ किंवा ओवा घाला. हे सगळं एकत्र करून थोडा वेळ ठेवा. जरा वेळानं पाणी सुटल्यावर कणीक आणि जरासं बेसन घाला. लागेल तसं पाणी घालून पीठ मळा. पराठे लाटून खमंग भाजा.
दुधीचा पराठा – दुधी किसून घ्या. त्यात भरपूर कोथिंबीर चिरून घाला. जिरे पूड-हळद-तिखट-मीठ घाला. थोडा वेळ तसंच ठेवा. पाणी सुटल्यावर कणीक घाला. पराठे लाटून भाजा.
गाजर-बीट पराठा – गाजर आणि बीट कुकरला वाफवून घ्या. २ गाजरं असतील तर १ बीट या प्रमाणात. गार झाल्यावर दोन्ही चांगलं मॅश करा. त्यात फक्त जिरेपूड आणि मीठ घाला. कणीक घालून पीठ भिजवा. तूप लावून भाजा. अतिशय सौम्य चवीचे हे पराठे छान लागतात.
कांदा पात आणि चीज पराठा – कांदा पात बारीक चिरा. त्यात चीज किसून घाला. चालत असल्यास बारीक चिरलेली हिरवी मिरची घाला. थोडंसं मीठ घाला. कणीक घालून भिजवा आणि पराठे करा. बटर लावून भाजा.
कोबी पराठा – कोबी किसून घ्या. बारीक चिरलेली भरपूर कोथिंबीर घाला. तिखट-मीठ-हळद घाला. जरा वेळ तसंच ठेवा. नंतर त्यात हवी तितकी कणीक घाला. पीठ भिजवा. पराठे करा.
मुळ्याचा पराठा १ – मुळा किसून घ्या. तेलाची नेहमीसारखी फोडणी करा. थोडा हिंग हळद घाला. मुळ्याचा कीस घाला. जरा वाफ आली की त्यात तिखट-मीठ-दाण्याचा कूट घाला. थोडं बेसन घाला. जरा वाफ येऊ द्या. हे मिश्रण थंड करा. कणकेच्या पारीत भरून पराठे करा.
मुळ्याचा पराठा २ – जाड किसणीनं मुळा किसून घ्या. पंचावर टाकून ठेवा. पंधरा मिनिटांनी पंचातच पिळून घ्या. त्यात तिखट-मीठ-धणे पूड-आमचूर आणि थोडा गरम मसाला घाला. बारीक चिरलेली मिरची आणि कोथिंबीर घाला. दोन पोळ्या लाटून घ्या. एका पोळीवर हे सारण पसरा. दुसरी पोळी ठेवून कडा दाबून बंद करा. परत हलक्या हातानं थोडं लाटा. तूप लावून भाजा.
कोथिंबीर पराठा – बारीक चिरलेली भरपूर कोथिंबीर, तिखट, मीठ आणि जिरेपूड एकत्र करा. कणकेच्या पारीत हे सारण भरून पराठे करा. तेल लावून खमंग भाजा.
पनीर पराठा – पनीर कुस्करून घ्या. त्यात बारीक चिरलेली कोथिंबीर, कमी तिखट मिरची, जिरेपूड, थोडासा आमचूर आणि मीठ घाला. कणकेच्या पारीत हे सारण भरून पराठे करा.
फ्लॉवर पराठा – फ्लॉवर जाड किसणीनं किसा. त्यात भरपूर कोथिंबीर घाला. धणे-जिरे पूड, आमचूर, तिखट किंवा बारीक चिरलेली मिरची, थोडा बारीक चिरलेला कांदा, थोडा गरम मसाला आणि मीठ घालून सारण करा. दोन पोळ्या लाटून घ्या. एका पोळीवर हे सारण पसरा. दुसरी पोळी ठेवून कडा दाबून बंद करा. परत हलक्या हातानं थोडं लाटा. तूप लावून भाजा.

आपली कल्पनाशक्ती वापरून असे कितीतरी प्रकारचे पराठे करता येतील. फक्त कणीक न वापरता मिश्र पिठं वापरता येतील.

मेथी पुरी – २ वाट्या कणीक, अर्धी वाटी बेसन, २ टीस्पून रवा असं प्रमाण घ्या. त्यात बारीक चिरलेली भरपूर मेथी, तीळ, तिखट-मीठ-हळद घाला. थोडं गरम तेलाचं मोहन घालून पीठ घट्ट भिजवा. जाडसर पु-या लाटा. मध्यम आचेवर तळा.
पालक पुरी – पालक थोड्या पाण्यात वाफवा. थंड झाल्यावर वाटताना लसूण-मिरची घालून वाटा. त्यात बसेल असं कणीक आणि जरासं बेसन घाला. थोडंसं मोहन घालून घट्ट पीठ भिजवा. पु-या करा.
बटाटा पुरी – बटाटा उकडून मॅश करा. त्यात थोडी जिरे पूड आणि हळद तसंच बारीक चिरलेली हिरवी मिरची घाला. त्यातच पीठ भिजवा. पु-या लाटून तळा.
लाल भोपळ्याची गोड पुरी – लाल भोपळा कुकरला वाफवा. तो गरम असतानाच त्यात थोडा गूळ घाला. ते सगळं चांगलं मॅश करा. चिमूटभर मीठ घाला. थोडे तीळ घाला. मावेल तेवढी कणीक घालून घट्ट पीठ भिजवा. पु-या लाटा. तेलात किंवा तूपात तळा.
अशा प्रकारानं वेगवेगळ्या प्रकारच्या पु-या करता येतील.

गाकर – गाकर हा पोळीचाच एक प्रकार. नेहमीसारखी कणीक भिजवा. गोळा घेऊन पराठ्याला घालतो तशी घडी घाला. मोठ्या पुरीएवढी लाटा. गाकर जाडच असतो. तव्यावर मध्यम आचेवर खमंग भाजा. तूप लावा. गरम गाकर दूध, लसणाची चटणी किंवा दाण्याची चटणी याबरोबर उत्तम लागतो.
मिक्स फुलके किंवा भाकरी – नाचणी, कणीक, ज्वारी, बाजरी आणि तांदळाचं पीठ समप्रमाणात एकत्र करा. थोडंसं मीठ घालून पीठ भिजवा. हवे असल्यास फुलके करा किंवा जाडसर भाकरी करा.
मुली लहान असताना मी बाजरीची किंवा ज्वारीची भाकरी करायचे. त्यावर घरचं लोणी लावायचे. त्याच्यावर दाण्याची किंवा तिळाची चटणी लावायचे. वर काकडी, टोमॅटोचे स्लाइस आणि गाजराचा कीस घालायचे. भाकरीचे चार तुकडे करून हा पिझ्झा त्यांना खायला द्यायचे. त्या लहान होत्या त्यामुळे त्याही खायच्या. smile emoticon smile emoticon

तर असे किती तरी पदार्थ मुलांना डब्यात देता येतील. मधल्या वेळेला खायला करता येतील आणि मोठ्यांना नाश्त्यासाठीही करता येतील. याविषयावरची पुढची पोस्ट लवकरच.

सोशल नेटवर्किंगवर ही पोस्ट शेअर करताना या ब्लॉगचा जरूर उल्लेख करा.

Leave a Reply

Fill in your details below or click an icon to log in:

WordPress.com Logo

You are commenting using your WordPress.com account. Log Out /  Change )

Google photo

You are commenting using your Google account. Log Out /  Change )

Twitter picture

You are commenting using your Twitter account. Log Out /  Change )

Facebook photo

You are commenting using your Facebook account. Log Out /  Change )

Connecting to %s

%d bloggers like this: