कैरीचं पारंपरिक पन्हं आणि पुदिना पन्हं

बेमोसमी पाऊस मधूनच हूल देत असला तरी उन्हाळा चांगलाच तापलाय हेही खरं. त्यामुळे आता दुपारच्या चहाऐवजी त्यावेळेला गारेगार कलिंगड (टरबूज) चिरून खावंसं किंवा लिंबू सरबत किंवा कैरीचं पन्हं घ्यावंसं वाटायला लागलंय. मी लहान असताना जेव्हा बीडला राहात होते तेव्हा आमच्याकडे मागच्या अंगणात आंघोळीचं पाणी तापवायला एक चूल होती. सकाळी आंघोळी आटोपल्या की आजी त्या चुलीच्या राहिलेल्या विस्तवात कांदे, रताळी, भरताचं वांगं किवा पन्ह्यासाठीच्या कै-या भाजायला टाकायची. ते निखारे विझेपर्यंत त्यात हे सगळं मस्त भाजून निघायचं. या अशा भाजलेल्या कै-यांचं पन्हं काय मस्त लागायचं! आजच्या भाषेत सांगायचं तर त्याला मस्त स्मोकी फ्लेवर यायचा. पन्ह्यासाठीच्या कै-या उकडतात हे मला फार नंतर कळलं. तोपर्यंत मला वाटायचं की कै-या भाजूनच पन्हं करतात.

पुदिना
पुदिना

आज मी पन्ह्याच्याच काही रेसिपीज शेअर करणार आहे. त्यातली पहिली आहे ती आपल्या टिपीकल मराठी पन्ह्याची, दुसरी आहे ती कच्च्या कैरीच्या पन्ह्याची. मी आज जी तिसरी रेसिपी शेअर करणार आहे ती आहे माझी कॉलनीतलीच मैत्रीण पल्लवी काणेकर हिची आहे. पल्लवी मूळची राजस्थानी आहे. ती जे पन्हं करते त्यात पुदिना घातलेला असतो आणि बरोबर सैंधव किंवा काळं मीठ. हे पन्हं फारच अप्रतिम लागतं. तिनं केलेलं हे पन्हं पिऊन मी नेहमी तिला म्हणायचे की हे पन्हं पाणी पुरीतलं पाणी म्हणून मस्त लागेल. आणि आज मी या पन्ह्याचीच पाणी पुरी केली होती जी मस्त झाली होती. तेव्हा मी आज या पन्ह्याचीही रेसिपी आज शेअर करणार आहे.

कैरीचं मराठी पन्हं

साहित्य – कैरी उकडून काढलेला गर १ वाटी, पाऊण वाटी गूळ किंवा साखर, अर्धा टीस्पून मीठ, अर्धा टीस्पून वेलची पूड, आवडत असल्यास ४-५ केशर काड्या

photo 1कृती –
१) कै-यांचे आकार लहान-मोठे असतात म्हणून मी वाटीचं प्रमाण दिलेलं आहे. कै-या कुकरच्या भांड्यात ठेवून उकडून घ्या.
२) थंड झाल्यावर साल काढून आतला गर काढून घ्या.
३) मिक्सरच्या भांड्यात हा गर, गूळ किंवा साखर, मीठ आणि वेलची पूड घाला. चांगलं एकजीव वाटून घ्या. साधारण वाटीभर पाणी घालून परत वाटा.
४) बाटलीत भरून फ्रीजमध्ये ठेवा. जेव्हा हवं असेल तेव्हा आवश्यकतेनुसार त्यात थंड पाणी घाला आणि पन्हं तयार करा.
पन्ह्यासाठीचं हे तयार मिश्रण फ्रीजमध्ये बराच काळ चांगलं राहतं.

मला स्वतःला मिट्ट गोड पन्हं आवडत नाही म्हणून मी साखर-गुळाचं प्रमाण कमी दिलं आहे. आवडीनुसार ते वाढवू शकता. साखर किंवा गूळ कमी वापरायचा असेल तर कमी आंबट कै-या म्हणजे तोतापरी किंवा नीलम कै-या वापरा.
बदल म्हणून यात कधीतरी जिरेपूड घालून बघा.

कच्च्या कैरीचं पन्हं

photo 2

साहित्य – १ कैरी किसून, चवीनुसार पिठी साखर, पाव टीस्पून मीठ

कृती –
१) कैरी मध्यम किसणीनं किसून घ्या.
२) एका पातेल्यात घेऊन त्यात वाटीभर पाणी घालून अर्धा तास भिजू द्या.
३) नंतर त्यात चवीनुसार मीठ-साखर घाला.
४) ग्लासमध्ये गाळून घ्या. थंड करून प्या.
मला स्वतःला कैरीच्या किसासकट पन्हं प्यायला आवडतं. तसं आवडत असेल तर तसं प्या.

किंवा कैरीचे सालासकट मोठे तुकडे करा. मिक्सरच्या भांड्यात घाला. आवडीनुसार साखर-मीठ घाला. चांगलं एकजीव वाटा. आणि हवं तसं पाणी घालून हे पन्हं प्या. हे मिश्रण फ्रीजमध्ये फार टिकणार नाही.

कैरीचं राजस्थानी पन्हं

साहित्य – कैरी उकडून काढलेला गर २ वाट्या, १ ते दीड वाटी साखर, २ टीस्पून काळं मीठ किंवा सैंधव, १ टीस्पून जिरे पूड, २ हिरव्या मिरच्या (पल्लवी घालत नाही पण मी घातल्या होत्या), २ मुठी पुदिना, साधं मीठ चवीनुसार

कृती –
१) कैरीचा गर, साखर, काळं मीठ, जिरे पूड, हिरव्या मिरच्या आणि पुदिना आणि मीठ हे सगळं मिक्सरच्या भांड्यात घाला.
२) एकजीव वाटून घ्या. साखर लागेल तशीच घाला. हे पन्हं जरासं आंबटच चांगलं लागतं.
३) हे मिश्रण बाटलीत भरून फ्रीजमध्ये ठेवा. प्यायला घेताना त्यात हवं तसं पाणी घाला. अतिशय सुरेख लागतं.
मिरचीमुळे या पाण्याचा मस्त झणका लागतो.
हे पाणी वापरून पाणी पुरीही अफलातून होते. पाणी पुरी करणार असाल तर चिमूटभर हिंग घाला.

पन्ह्याचे हे प्रकार करून बघा. कसे झाले होते ते कळवा. तुम्हालाही काही वेगळे प्रकार माहिती असतील तर तेही कळवा.

सोशल नेटवर्किंगवर ही पोस्ट शेअर करताना या ब्लॉगचा जरूर उल्लेख करा.

4 thoughts on “कैरीचं पारंपरिक पन्हं आणि पुदिना पन्हं

  1. Yummmy पन्ह मी नेहमीच करते but tried the Rajasthani version and it just flattered me. Just yummy refreshing and the mirchi added the zing thing to it. Thanks

    Like

  2. Rajasthani panhe was amazing! I made it as panipuri water…you dont even need chichechi chatney with it. Thanks for the great recipe

    Like

Leave a Reply

Fill in your details below or click an icon to log in:

WordPress.com Logo

You are commenting using your WordPress.com account. Log Out /  Change )

Facebook photo

You are commenting using your Facebook account. Log Out /  Change )

Connecting to %s

%d bloggers like this: