लहान मुलांसाठी सहज करता येतील अशा पदार्थांबद्दल मी याआधीच्या तीन पोस्ट्समध्ये लिहिलं. या पोस्टना दणदणीत प्रतिसाद मिळाला. पहिल्या दोन पोस्ट साधारणपणे १२ हजार लोकांनी बघितल्या. तर तिसरी पोस्ट २२ हजार लोकांनी बघितली. तुमच्या या प्रतिसादाबद्दल मनापासून आभारी आहे मी. आज याच विषयावरची चौथी आणि शेवटची पोस्ट लिहिते आहे. या पोस्टमध्ये मी मुलांसाठी वेगवेगळे गोड पदार्थ काय करता येतील आणि कसे करता येतील ते लिहिणार आहे.
माझी मोठी मुलगी सावनी जेव्हा दीड वर्षाची झाली आणि सगळं खायला लागली तेव्हा माझ्या सासुबाई (विजया राजाध्यक्ष) या तिच्यासाठी दर रविवारी एक नवा गोड पदार्थ करत असत. तिला सगळ्या चवी कळल्या पाहिजेत, तिनं सगळं खायला शिकलं पाहिजे असं त्यांना वाटायचं. आज मी त्यातल्या काही पदार्थांच्याही रेसिपीज शेअर करणार आहे.
आधीच कबूल करते. मला स्वतःला फार वेगवेगळे गोड पदार्थ करता येत नाहीत. मला स्वतःला गोड फार प्रिय नाहीये त्यामुळे असेल कदाचित. त्यामुळे या यादीत तेच पदार्थ आहेत जे मला चांगले जमतात. म्हणून तुम्हाला कदाचित ही यादी अपुरी वाटू शकेल.
कस्टर्ड – व्हॅनिला फ्लेवरची रेडीमेड कस्टर्ड पावडर मिळते ती वापरा. साधारणपणे अर्धा लिटर दूध उकळायला ठेवा. एका कपात ४-५ टेबलस्पून कस्टर्ड पावडर आणि थोडं थंड दूध मिसळून चांगली पेस्ट करून घ्या. गॅसवरच्या दुधात ४-५ टीस्पून साखर घाला. दुधाला उकळी आली की गॅस बंद करा. कपातली पेस्ट त्यात घालून सतत हलवत नीट मिसळून घ्या. त्यात गुठळ्या होता कामा नयेत. परत गॅस पेटवा. मंद आचेवर परत सतत हलवत २ मिनिटं शिजवा. थंड झाल्यावर फ्रीजमध्ये ठेवा. अगदी गार करून खायला द्या. वर साय आली असेल तर हँड मिक्सरनं किंवा व्हिपरनं अगदी हलक्या हातानं फिरवा.
याच कस्टर्डबरोबर जेली दिलीत की जेली कस्टर्ड तयार.
सध्या आंब्याचा मोसम आहे. या तयार कस्टर्डमध्ये दोन हापूस आंब्यांचा रस घाला. मँगो फ्लेवरचं कस्टर्ड तयार होईल. या मँगो कस्टर्डमध्ये आंबा बारीक चौकोनी चिरून घालून द्या. किंवा सफरचंद, चिकू, केळी, द्राक्षं अशी फळं घालून द्या.
मँगो कस्टर्डमध्ये सुका-मेवा घालून खायला द्या.
कस्टर्ड जितपत घट्ट-पातळ हवं असेल तसं पावडरचं प्रमाण कमी-जास्त करा.
जेली – जेली क्रिस्टलची पाकिटं बाजारात तयार मिळतात. रेक्स कंपनीच्या क्रिस्टलची जेली चांगली होते. या पाकिटावर जेली कशी करायची त्याची कृती असते. एक पाकिट असेल तर साधारणपणे ३ कप पाणी घ्या. सगळं पाणी उकळी येईपर्यंत चांगलं गरम करा. त्यात २ टीस्पून साखर घाला. साखर विरघळली की गॅस बंद करा आणि त्यात पाकिटातली पावडर ओता. पूर्ण विरघळेपर्यंत हलवत रहा. हे मिश्रण थंड झालं की हवं असल्यास मोल्डमध्ये घालून किंवा साध्या डब्यात ओतून फ्रीजमध्ये सेट करायला ठेवा. ५-६ तासांत जेली सेट होईल. पाकिटावर अर्धं पाणी गरम आणि अर्ध थंड असं प्रमाण असतं. पण सगळं पाणी गरम केलं तर क्रिस्टल्स लवकर विरघळतात. शिवाय वरून थोडी साखर घातल्यामुळे जेली गोड होते. मुलांना थोडं जास्त गोड खायला हरकत नाही!
कॅरॅमल पुडिंग – १ कप दुधाला दीड अंडं असं प्रमाण घ्या. इतक्या प्रमाणाला दीड चमचा साखर घ्या. अंडी फोडून घ्या. त्यात थंड दूध घाला. साखर घाला. हव्या त्या प्रमाणात व्हॅनिला इसेन्स घाला. मिक्सरमध्ये किंवा हँड मिक्सरनं चांगलं घुसळून घ्या. एका गोल चपट्या डब्यात (पोळ्या ठेवतो तसा डबा) ७-८ टीस्पून साखर घाला. हा डबा मध्यम आचेवर गॅसवर ठेवा. सतत हलवत साखर विरघळू द्या. साखर विरघळल्यानंतर जळायला लागेल. ती जळू द्या. काळपट ब्राऊन झाली की गॅस बंद करा. डबा चिमट्यानं धरून विरघळलेलं कॅरॅमल डब्याला सगळ्या बाजुंनी लागेल असं फिरवा. कॅरॅमल साधारणपणे ५-७ मिनिटांत सेट होतं. आता या डब्यात दूध आणि अंड्याचं मिश्रण ओता. कुकरमध्ये शिटी न लावता २० मिनिटं पुडिंग वाफवा. थंड करून एका प्लेटवर उलटं करा. हवं तसं कापून द्या.
याच पुडिंगमध्ये अंडं आणि दुधाबरोबर ब्रेड घातलात तर ब्रेड पुडिंग तयार होईल. एक कप दुधाला एक ब्रेड स्लाइस घ्या.
कॅरॅमल गडद रंगांचं केलंत तर उत्तम चव येते. सोनेरी रंगावर ठेवलंत तर तितकं छान लागत नाही.
ट्रायफल पुडिंग – वरच्या कृतीप्रमाणे कस्टर्ड आणि जेली करून ठेवा. गोल आकाराचा चपटा डबा घ्या (पोळ्यांना वापरतो तसा). बाजारात तयार स्पाँज केक मिळतो. तो गोल आकारातला घ्या. तो मधोमध स्लाइस करून दोन पातळ गोल कापा. दोन डब्यात दोन गोल लावा. थोड्या दुधात साखर आणि ड्रिंकिंग चॉकलेट घाला. नीट हलवून घ्या. कोमट करून घ्या. आता हे दूध केकवर घालून केक भिजवा. त्यावर कस्टर्डचा थर द्या. त्याच्यावर चिरलेली फळं आवडीनुसार घाला (संत्रं, मोसंबी, द्राक्षं, आंबा, डाळिंब इत्यादी) त्यावर जेलीचा थर द्या. आवडत असल्यास वर सुकामेवा घाला. फ्रीजमध्ये सेट करायला ठेवा. अगदी थंड करून खायला द्या.
बरेचसे लोक केक भिजवायला सिरपचा किंवा फ्रुटीसारख्या ज्युसचा वापर करतात. पण त्यामुळे पुडिंग फार गोड होतं म्हणून मी दूध वापरते.
स्ट्रॉबेरीज अँड क्रीम – घरची साय घ्या. ती चांगली फेटा. त्यात पिठीसाखर घालून चांगलं मिसळून घ्या. त्यात स्ट्रॉबेरीचे चिरलेले तुकडे घाला.
असंच मँगो अँड क्रीमही उत्तम लागतं.

कणकेचा शिरा – कणीक आधी कोरडी खमंग भाजा. नॉनस्टिक कढई वापरा. भाजत आली की त्यात साजुक तूप घाला. परत चांगला खमंग वास येईपर्यंत भाजा. नंतर त्यात कोमट दूध घाला. नीट हलवून झाकण ठेवून वाफ येऊ द्या. वाफ आल्यावर त्यात किसलेला गूळ घाला. हलवून घ्या. गूळ विरघळला की गॅस बारीक करून झाकण ठेवा. एक वाफ आली की गॅस बंद करा. अतिशय सुंदर लुसलुशीत शिरा होतो. याला फ्लेवरला इतर काहीही घालायचं नाही. कणीक आधी कोरडी भाजलीत तर तूप कमी लागतं. १ वाटी कणीक असेल तर १ वाटी तूप आणि अर्धा ते पाऊण वाटी गूळ घ्या. साधारणपणे दुप्पट दूध घ्या.
दलियाची खीर – गव्हाचा रवा किंवा दलिया किराणा दुकानात मिळतो. तो धुवून २ तास भिजवून ठेवा. भिजला की त्यातलं पाणी तसंच ठेवून त्यात गूळ घाला. खोवलेलं ओलं खोबरं घाला. चिमूटभर मीठ घाला. कुकरला भांड्यात ठेवून, मंद आचेवर निदान २०-२५ मिनिटं शिजू द्या. दलिया फुलतो म्हणून पाणी भरपूर असू द्या. दलिया शिजल्यावर, जरा कोमट झाला की हँड मिक्सरनं जरासं फिरवून घ्या. थंड होऊ द्या. नंतर त्यात हवं तसं दूध घाला. दूध घातल्यावर उकळू नका कारण गुळामुळे दूध नासण्याची शक्यता असते. भिजवून शिजवलेला काजू तुकडा आणि थोडी जायफळ पूड घाला. थंड करून खायला द्या. आवडत असेल तर गरमच द्या.

लाल भोपळ्याचे घारगे – लाल भोपळा साल काढून कुकरला शिजवून घ्या. गरम असतानाच मॅश करा म्हणजे तो चांगला मॅश होईल. त्यात लगेचच हवा तसा गूळ घाला. चिमूटभर मीठ घाला. हे मिश्रण चांगलं हलवून घ्या. त्यात मावेल तशी कणीक आणि थोडंसं तांदळाचं पीठ घाला. घट्ट पीठ मळून घ्या. पु-यांसारखे जाडसर घारगे लाटा आणि तुपात तळून खायला द्या.
झटपट नारळी भात – एक वाटी बासमती तांदूळ धुवून घ्या. मध्यम आकाराच्या कुकरमध्ये तूप गरम करा. त्यात लवंगा, छोटासा दालचिनीचा तुकडा घाला. काजू-बेदाणे घालून परतून घ्या. त्यात धुतलेले तांदूळ घाला. चांगलं परता. आता त्यात एक वाटी गूळ आणि अर्धी वाटी ओलं खोबरं घालून परता. थोडी जायफळ पूड आणि केशर घाला. दुप्पट पाणी घाला. शिटीसकट झाकण लावा. आपल्या अंदाजानं भात शिजेपर्यंत मध्यम आचेवर ठेवा. कुकरचं झाकण लावायच्या आधी गूळ पूर्ण विरघळला आहे याची खात्री करून घ्या. नाहीतर तो तळाशी लागेल.

शेवयांची खीर – शेवया तूपावर खमंग भाजा. त्यात जितपत घट्ट-पातळ हवं असेल तसं दूध घाला. आवडीप्रमाणे साखर घाला. वेलची पूड घाला. काजू-बदामाची जाडसर पूड घाला. अजून घट्ट हवी असेल तर थोडी मिल्क पावडर घाला. आवडत असल्यास बेदाणे घाला. उकळली की गॅस बंद करा.
श्रीखंड आणि पुरणपोळीच्या रेसिपीज हल्लीच शेअर केलेल्या आहेत तेव्हा त्या परत देत नाही. त्या पेजवर मिळतीलच.
करून बघा. कशा झाल्या ते कळवा. फोटो काढून पाठवा.
ही पोस्ट सोशल नेटवर्किंगवर शेअर करताना या ब्लॉगचा जरूर उल्लेख करा.