लहान मुलांना सहज खाता येतील, डब्यात देता येतील, मधल्या वेळेला खाता येतील अशा पदार्थांच्या यादीबद्दलची ही तिसरी पोस्ट. आधीच्या दोन पोस्ट्समध्ये भाताचे प्रकार, पराठे आणि पु-यांचे प्रकार यांच्या रेसिपीज होत्या. या पोस्टमध्ये मी काही मधल्या वेळेला खाता येतील असे पदार्थ तसंच डब्यात देता येतील असे पदार्थ यांच्याबद्दल माहिती देणार आहे.

कॉर्न उपमा – नेहमीसारखी फोडणी करा. त्यात थोडा हिंग,कढीपत्ता आणि उडदाची डाळ घाला. ते परतलं की कांदा आणि कॉर्न दाणे घाला. झाकण ठेवून दोन्ही चांगलं शिजू द्या. त्यात आलं-मिरचीचं वाटण घालून परता. मग त्यात रवा घाला. तोही चांगला परता. त्यात साखर, मीठ घाला. अडीचपट पाणी घाला. लिंबाचा रस आणि खोबरं,कोथिंबीर घाला. उतरवताना १ चमचा साजूक तूप घाला. चांगलं एकत्र करा.
याच पध्दतीनं भाज्या (फ्लॉवर,गाजर,मटार) घालूनही उपमा करता येईल.
सुशीला – कुरमुरे ५-७ मिनिटं पाण्यात भिजवा. चांगले भिजले की घट्ट पिळून एका ताटात काढा. त्यात तिखट, मीठ, साखर, लिंबाचा रस, दाण्याचा कूट, बारीक चिरलेली कोथिंबीर घाला. हातानं सगळं नीट एकत्र करा. तेलाची हिंग-मोहरी घालून फोडणी करा. कढीपत्ता घाला. बारीक चिरलेला कांदा घालून परता. त्यावर कुरमुरे घाला. दणदणीत वाफ द्या.
दही पोहे – जाड पोहे धुवून घ्या. पाणी निथळून त्यात दही, थोडंसं दूध, मीठ, आवडत असल्यास साखर घाला. बारीक चिरलेली कोथिंबीर घाला. वरून तळणीच्या मिरचीची खमंग फोडणी द्या. तळणीची मिरची आवडत नसेल तर बारीक चिरलेल्या हिरवी मिरचीची फोडणी द्या.
दूध-पोहे – पोहे धुवून घ्या. त्यात हवं तसं दूध घाला. साखर घालून नीट कालवा.
लाह्याचं दुधातलं पीठ – ज्वारीच्या लाह्यांचं पीठ दुधात कालवा. हवं तसं घट्ट-पातळ ठेवा. साखर घालून कालवा.
लाह्याचं फोडणीचं पीठ – लाह्याच्या पिठात थोडं आंबट ताक आणि पाणी घालून सरसरीत कालवून घ्या. त्यातच तिखट-मीठ आणि दाण्याचं कूट घाला. हिंग-मोहरीची फोडणी करा. कढीपत्ता घाला. त्यावर कालवलेलं पीठ घाला. चांगलं हलवून मंद आचेवर दणदणीत वाफ येऊ द्या. साधारणपणे उपम्यासारखं झालं पाहिजे.
कणसाचा उपमा – कणसं जाड किसणीनं किसा. जरा जास्त तेलाची फोडणी करा. त्यात नेहमीपेक्षा जरासा जास्त हिंग घाला. हिरव्या मिरचीचे तुकडे घाला. आवडत असल्यास शेंगदाणे घाला. कढीपत्ता घाला. त्यावर कणसाचा कीस घाला. मीठ घाला. कणसं गोड असतात त्यामुळे साखर घालू नका. मंद आचेवर मधूनमधून हलवत वाफ येऊ द्या. हवं असल्यास मिरचीऐवजी तिखट घाला. वरून थोडा पाण्याचा किंवा दुधाचा शिपका मारा. परत चांगली वाफ द्या. मोकळा झाला की गॅस बंद करा. वरून ओलं-खोबरं कोथिंबीर घाला.
कणसाचे वडे – कणसं किसून घ्या. त्यात मावेल तसं बेसन घाला. तिखट-मीठ-हळद घाला. आवडत असल्यास आलं-लसूण-मिरचीचं वाटण घाला. भरपूर कोथिंबीर घाला. मध्यम आकाराचे वडे करून चांगले लाल रंगावर तळा. बेसन फार जास्त घालून पीठ घट्ट भिजवू नका. पीठ सरसरीतच ठेवा म्हणजे वडे कुरकुरीत होतील.
मिक्स डाळींचे वडे – हरभरा, उडीद, मूग, तूर या डाळी किंवा यापैकी कोणत्याही दोन-तीन डाळी ३-४ तास भिजवा. जाडसर वाटून घ्या. त्यात बारीक चिरलेला कांदा, थोडे भरडलेले धणे, बारीक चिरलेला कढीपत्ता, आलं-लसूण-मिरचीचं वाटण घाला. मध्यम आकाराचे वडे तळा.
बटाटे वडे – बटाटे उकडा. मॅश करा. कढईत थोड्या तेलाची फोडणी करा. त्यावर कांदा परता. जरा जास्त आलं-लसूण-मिरचीचं वाटण घाला. मीठ आणि हवी असल्यास हळद घाला. वाटण परतलं गेलं की बटाटा घाला. हलवून गॅस बंद करा. थंड झाल्यावर हवे तितके लहान-मोठे गोळे करून वड्यांचा चपटा आकार द्या. बेसनात हळद-तिखट-मीठ घालून भिजवा. कडकडीत तेलाचं थोडंसं मोहन घाला. वडे त्यात बुडवून तळा.
साबुदाणा वडे – भिजवलेल्या साबुदाण्यात उकडलेला बटाटा मॅश करून घाला. एखादा बटाटा साल काढून कच्चा किसून घाला. आलं-मिरचीचं वाटण घाला. जि-याची पूड घाला. मीठ-साखर घाला. भरपूर कोथिंबीर घाला. चांगलं मळून घेऊन हवे त्या आकाराचे वडे करून तळा.
ब्रेड-रोल्स – बटाटे वड्यांसारखंच सारण करून ठेवा. ब्रेड स्लाइसच्या कडा काढा. फक्त कडा काढलेला भाग पाण्यात बुडवा. आता स्लाइस हातावर घेऊन त्यात सारण घाला. हातानं वळून रोलचा आकार द्या. ओल्या भागामुळे कडा चांगल्या बंद होतील. कडकडीत तेलात मोठ्या आचेवर तळा. फार बारीक गॅस ठेवू नका. नाहीतर ब्रेड तेल पितो.
चीज-चटणी सँडविच – ब्रेडच्या कडा हव्या असल्यास काढा. मी काढत नाही. स्लाइसला एका बाजुनं पुदिना चटणी लावा (जितका पुदिना त्याच्या निम्मी कोथिंबीर, चटणी जितकी तिखट हवी तितकी हिरवी मिरची, एक लहान कांदा, लिंबाचा रस आणि साखर-मीठ घालून मिक्सरमध्ये वाटा.) त्यावर किसलेलं चीज घाला किंवा चीज स्लाइस ठेवा. वरून परत चटणी लावलेला स्लाइस ठेवा. आवडत असल्यास चटणीत थोडं बटर मिसळून लावा.
दही डिप सँडविच १ – दही एखादा तास पंचात बांधून ठेवा. पाणी निथळलं की त्यात कांदा, सिमला मिरची, थोडी सेलरी आणि हिरवी मिरची हे सगळं बारीक चिरून घाला. त्यात मीठ घाला. हे डिप ब्रेड स्लाइसला लावा. आवडत असल्यास त्यावर थोडा टोमॅटो सॉस घाला. वरून दुसरा स्लाइस ठेवा.
दही डिप सँडविच २ – दही एक तास पंचात बांधून ठेवा. पाणी निथळलं की त्यात वाटलेलं लसूण-मिरची घाला. मीठ-मिरपूड घाला. बारीक चिरलेली सिमला मिरची घाला. हे डिप लावून सँडविच करा.
टोस्टेड सँडविच – ब्रेडला पुदिना चटणी लावा. वर उकडलेला बटाटा आणि टोमॅटोच्या स्लाइस ठेवा. वर किसलेलं चीज घाला. मीठ-मिरपूड घाला. दुसरा स्लाइस ठेवून सँडविच करा. टोस्टरमध्ये बटर लावून टोस्ट करा.
चिकन सँडविच – श्रेडेड बोनलेस चिकन उकडा. ब्रेडला रेडीमेड मेयोनीज लावा. त्यावर किसलेला कोबी घाला. त्यावर उकडलेलं चिकन घाला. मीठ-मिरपूड घाला. दुसरा स्लाइस ठेवा. (माझी मैत्रीण संजना असं करते)
उरलंसुरलं सँडविच – बटाट्याची भाजी उरली असेल तर ती ब्रेड स्लाइसवर ठेवा. यावर घरातल्या कुठल्याही कोरड्या चटण्या घाला (दाण्याची-तिळाची-कढीपत्त्याची) वर चीज किसून घाला. टोस्ट करून खायला द्या.
स्टर फ्राइड व्हेजीज ऑन टोस्ट – बेबी कॉर्न, ब्रोकोली, गाजर, फरसबी या भाज्या अर्धवट उकडून घ्या. थोडं ऑलिव्ह ऑईल गरम करा. त्यावर बारीक चिरलेला लसूण घाला. त्यावर मश्रूमचे मोठे तुकडे करून परता. सिमला मिरचीचे चौकोनी तुकडे परता. त्यावर उकडलेल्या भाज्या घाला. मीठ-मिरपूड घाला. थोडासा सोया सॉस घाला. मोठ्या गॅसवर परतून गॅस बंद करा.
ब्रेडचे कोरडे टोस्ट करा. त्यावर ही भाजी घालून खायला द्या.
याच भाजीत उकडलेले नूडल्स घातलेत तर झटपट नूडल्स तयार होतील.
चीज-कॉर्न-पोळीचा रोल – यासाठी अगदी कोवळे कॉर्न दाणे वापरा. टीनमधले असतील तर उत्तम. एक पोळी घ्या. त्यावर चीज किसून घाला किंवा स्लाइस घाला. मायक्रोवेव्हमध्ये जरासं फिरवा म्हणजे चीज वितळेल. आता त्यावर कॉर्न दाणे घाला. मीठ-मिरपूड घाला. पोळीचा रोल करा.
मेक्सिकन रोल – राजमा उकडून घ्या. पाणी पूर्ण निथळून घ्या. त्यात बारीक चिरलेलं कांदा-टोमॅटो-हिरवी मिरची, मीठ आणि थोडं तिखट घाला. पोळीवर थोडा दह्याचा चक्का लावा. त्यावर हे तयार सारण घाला. रोल करून तव्यावर मंद आचेवर कोरडं भाजा.
झटपट पास्ता – कुकरमध्ये ऑलिव्ह ऑईल तापवा. त्यावर कांदा आणि थोडा ठेचलेला लसूण घाला. कांदा गुलाबी झाला की त्यावर मिक्सरमध्ये फिरवून टोमॅटो घाला. त्यात तिखट, साखर, मीठ, थोडासा चिली सॉस, थोडा टोमॅटो सॉस घाला. चांगलं शिजलं की त्यात हव्या त्या भाज्या घाला (कॉर्न दाणे, गाजरं, सिमला मिरची, मश्रूम्स इ.), पास्ता न उकडता तसाच घाला. अंदाजानं पाणी घाला. चीज किसून घाला. व्हाइट सॉस न करता नुसतं दूध घातलं तरी चालतं. पण मग ते थोडंसं फाटल्यासारखं दिसतं. पण चवीत काहीही फरक पडत नाही. शिटीसकट झाकण लावा. मंद गॅसवर १० मिनिटं ठेवा.
या पोस्टमधले पदार्थ शक्यतो कमी घटक पदार्थ वापरून केलेले आहेत.
सोशल नेटवर्किंगवर ही पोस्ट शेअर करताना या ब्लॉगचा जरूर उल्लेख करा.