दोन वर्षांपूर्वी याच दिवसांमध्ये आम्ही स्पेनला गेलो होतो. देश खूप सुंदर आहे असं ऐकलं होतं आणि प्रत्यक्ष बघितल्यावर तर त्याची खात्रीच पटली. प्रचंड मोठा असा २४ तासांचा प्रवास करून आम्ही स्पेनच्या दक्षिणेला असलेल्या अंदालुसिया या नावानं ओळखल्या जाणा-या प्रांतातल्या मलागा या शहरात पोहोचलो. विख्यात चित्रकार पाब्लो पिकासो याचं हे जन्मगाव. या गावात पिकासोच्या चित्रांचं एक म्युझियमही आहे.
स्पेनचा या दक्षिणेकडच्या भागावर बराच मोठा काळ मुस्लिम राज्यकर्त्यांनी राज्य केलं. त्याचा प्रभाव इथल्या संस्कृतीवर दिसतो. या मुरीश संस्कृतीच्या खुणा त्यांच्या स्थापत्यकलेत जागोजागी दिसतात. आम्ही या भागातली ग्रेनाडा, कोर्दोबा, सेविये, मलागा ही शहरं आणि स्पेनच्या उत्तरेकडची बार्सिलोना आणि माद्रीद ही मोठी शहरं आणि तोलेदो हे स्पेनच्या प्राचीन राजधानीचं लहानसं पण अतिशय सुंदर गाव बघितलं.
मी आणि माझी मैत्रीण लीना शाकाहारी असल्यानं अर्थातच आम्हाला खाण्यासाठी फार काही पर्याय नव्हते. म्हणजे एका रेस्टॉरंटच्या मॅनेजरला जेव्हा आम्ही व्हेजिटेरियन हवं असं सांगितलं तेव्हा त्याला भयंकर टेन्शन आलं! माझ्या शेफला असं काहीही करता येत नाही, पण मी त्याला समजावून सांगण्याचा प्रयत्न करतो असं तो म्हणाला. पण जागोजागी ब्रेडचे उत्तम प्रकार, उत्तम चीज, अत्युत्कृष्ट चवीची ऑलिव्ह ऑईल्स मात्र आम्हाला मिळाली. आमच्या बरोबरचे इतर लोक म्हणजे विजय-मंगल केंकरे, राजन-स्मिता भिसे, धनंजय गोरे, श्रीरंग-माधवी पुरोहित आणि माझा नवरा निरंजन हे कट्टर मांसाहारी असल्यानं त्यांनी मात्र या प्रवासातलं खाणं मनसोक्त एंजॉय केलं. विशेषतः स्पॅनिश हॅमॉन किंवा हॅमवर तर हे सगळे बेहद्द खूष होते.
भाताचा सुप्रसिध्द स्पॅनिश प्रकार पाएया हा मात्र अगदीच फुसका निघाला. खूपसं केशर घातलेला हा मसालेभातासारखा प्रकार प्रत्यक्षात मात्र बेचव होता (हे फक्त माझंच मत नव्हतं तर मांसाहारी पायेयाबद्दल पण इतरांचं हेच मत होतं!) चुरो हा आपल्या चकलीसारखा पदार्थ बरा होता. म्हणजे बराच होता. मैद्याच्या चकल्या करून त्या तळतात आणि घट्ट ड्रिंकिंग चॉकलेटबरोबर त्या खायला देतात. मात्र ब-याच ठिकाणी व्हेज पिझ्झा मात्र अप्रतिम मिळाला. सबवे सोडलं तर कुठेही व्हेज सँडविचेस देखील मिळाली नाहीत. लीनानं बार्सिलोनाला मात्र महत्प्रयासानं मॅकडोनल्ड्समध्ये व्हेज बर्गर करून घेण्यात यश मिळवलं.
अर्थात असं असलं तरी स्पेनच्या रेस्टॉरंट्सची सुंदर रूपडी, त्यांचा इतिहास (मलागाला आम्ही जिथे जेवलो तिथे सुप्रसिध्द नाटककार लॉर्का जेवायचा म्हणे!), वेगवेगळ्या प्रकारच्या वाईन्स (माझं आणि विजयचं लिमॉन (लिंबू सरबत) हे वाईन आणि बियरपेक्षा महाग असायचं!), रस्त्यावर जागोजागी असलेले लहानसे सुरेख कॅफे, माद्रीदहून बार्सिलोनाला जातानाच्या ट्रेनमधल्या कॅफेत प्यायलेलं ड्रिंकिंग चॉकलेट, तोलेदोच्या रस्त्यावर भटकताना लहानशा दुकानातून घेऊन खाल्लेली स्पॅनिश मिठाई, बार्सिलोनाचा, डोळ्याचं पारणं फेडणारा जगप्रसिध्द ला बुकारिया हा बाजार या सगळ्या आठवणी मात्र अजूनही मनात रेंगाळताहेत. हा ला बुकारिया बाजार खाण्यापिण्याच्या विविध पदार्थांनी ओसंडून वाहात होता. वेगवेगळ्या प्रकारची आकर्षक मांडणी केल्यानं या बाजाराचं रूप काहीच्या काही खुललं होतं. विविध फळांचे रस, कापलेली फळं, गरमागरम पदार्थ याच बरोबर वेगवेगळ्या प्रकारच्या भाज्या, मासे, हॅमचे प्रकार, ऑलिव्ह ऑईलचे प्रकार, चॉकलेट्स यांची नुसती रेलचेल या बाजारात होती. या बाजारात फिरताना फारच मजा आली होती.
अर्थात खाणं तर महत्वाचं आहेच आणि चांगलं खाणं तुमच्या आनंदात भरच घालत असतं. पण आपल्या प्रिय मित्रांबरोबर असताना तितकंसं चांगलं नसलेलं खाणंसुध्दा चवदार लागतंच की!
तर आज या स्पेन प्रवासाच्या काही आठवणी तुमच्याबरोबर शेअर करतेय.