सध्या औरंगाबदला माहेरी आले आहे. चार-पाच दिवस राहणार आहे आणि माझ्या आवडीचे खास मराठवाडी असे शक्य तितके पदार्थ खाणार आहे. कालच मेघननं माझ्या बहिणीनं केलेला अतिशय चवदार असा कैरीचा मेथांबा खाल्ला. आठवणीनं सुध्दा तोंडाला पाणी सुटलंय इतका तो चमचमीत झाला होता. खरं सांगायचं तर आज पोस्ट कशाबद्दल लिहावी असा संभ्रम माझ्या मनात आहे. असं पहिल्यांदाच झालंय कारण बहुतेकदा काय लिहायचं हे मनात तयारच असतं. पण आज मात्र नेमकं काय लिहू असं झालंय खरं. कै-यांचे दिवस आहेत तर कै-यांबद्दलच लिहावं झालं…
काही दिवसांपूर्वी कैरीच्या चटणीची रेसिपी शेअर केली होती. त्याआधी गुढी पाडव्याला आंबा डाळीचीही रेसिपी शेअर केली होती. आज कैरीच्या सारस्वती आमटीची रेसिपी शेअर करणार आहे. मराठवाड्यात कैरीच्या दिवसांमध्ये कैरी घालून केलेलं वरण करण्याची पध्दत आहे. फक्त हळद, हिंग कढीपत्त्याची फोडणी आणि तिखट,मीठ, जरासा काळा मसाला आणि गूळ घालून केलेलं हे कैरीचं वरण फर्मास लागतं. त्याच धर्तीवर सारस्वतांमध्ये ही कैरीची आमटी करतात. सारस्वती पदार्थ असल्यामुळे अर्थातच ओलं खोबरं आणि धणे आहेतच या रेसिपीत. शिवाय वाटणात आणि नंतर फोडणीतही उडदाची डाळ घालतात. आणि मेथ्याही. म्हणून या आमटीला उडदामेथी असंही म्हणतात. बांगडा घालूनही उडदामेथी करतात. पण आजची रेसिपी आहे ती शाकाहारी उडदामेथीची.
कैरीची उडदामेथी किंवा आमटी

साहित्य – २ कै-या सालं काढून लांबट तुकडे केलेल्या, आवडत असल्यास कोयही वापरा, एका मोठ्या लिंबाएवढा गूळ, फोडणीसाठी २ टीस्पून तेल, अगदी २ चिमूट मोहरी, १ टीस्पून उडदाची डाळ, अर्धा टीस्पून मेथी दाणे, ४-५ कढीपत्त्याची पानं, पाव टीस्पून हळद, मीठ चवीनुसार
वाटण मसाला १ – १ टीस्पून धणे, २ टीस्पून उडीद डाळ, १ टीस्पून मेथी दाणे, १ टीस्पून तांदूळ, ३-४ बेडगी लाल मिरच्या (हे सगळं तेलावर खमंग लाल भाजून पूड करून घ्या. नंतर त्यात थोडंसं पाणी घालून चांगली पेस्ट करा.)
वाटण मसाला २ – १ वाटी खोवलेलं ओलं खोबरं, २ टीस्पून धणे, २ टीस्पून तिखट, अर्धा टीस्पून हळद, अर्धा टीस्पून हिंग (हे सगळं कच्चंच चांगलं एकजीव वाटून घ्या. वाटताना पाण्याचा वापर करून मुलायम पेस्ट बनवा.)
कृती –
१) एका पातेल्यात तेल गरम करा. मोहरी घाला. ती तडतडली की त्यात उडदाची डाळ आणि मेथी दाणे घालून चांगलं लाल होऊ द्या.
२) त्यात कढीपत्ता घाला. चिमूटभर हिंग आणि हळद घाला.
३) आता त्यात कैरीचे तुकडे आणि कोय घाला. चांगलं हलवून घ्या आणि एक वाटी पाणी घाला.
४) जराशी उकळी आली की त्यात मीठ आणि गूळ घाला. अजून २ वाट्या पाणी घालून चांगली खळखळून उकळी येऊ द्या. कैरी मऊ शिजायला हवी.
५) उकळी आल्यावर गॅस बारीक करून वाटण मसाला १ घाला. नीट हलवून घ्या आणि वाटण मसाला २ घाला.
६) मंद गॅसवर जरासं शिजू द्या. चव बघून हवं असल्यास गुळाचं प्रमाण वाढवा. आपल्याला हवं तसं पाण्याचं प्रमाणही कमी-जास्त करा. उडदामेथी ही जराशी घट्टच असते. फार पातळ करू नका. गॅस बंद करा.
उडदामेथी तयार आहे. ही उडदामेथी गरम साध्या भाताबरोबर अफलातून लागते.
फार वेळ ठेवणार असाल तर कोय काढून टाका म्हणजे आमटी फार आंबट होणार नाही.
करून बघा आणि कशी झाली होती हे नक्की कळवा.
सोशल नेटवर्किंगवर ही पोस्ट शेअर करताना या ब्लॉगचा जरूर उल्लेख करा.