रात्रीच्या जेवणासाठी काही साधे-सोपे पदार्थ

पाश्चात्य जगातला वन डिश मील हा प्रकार आता आपल्याकडेही सर्रास रूढ होतो आहे. विशेषतः मोठ्या शहरांमध्ये जिथे लोक रोज खूप प्रवास करून रात्री उशीरा घरी पोहोचतात तिथे तरी. उशीरा घरी परतल्यावर नव्यानं साग्रसंगीत स्वयंपाक करण्याची ऊर्जा अंगात उरलेली नसते. स्वयंपाकाला एखाद्या मावशी किंवा महाराज असेल तर ठीक किंवा घरी आई किंवा सासू असेल तर उत्तमच. पण जर अशी कुठलीही सपोर्ट सिस्टीम नसेल तर मात्र मग साग्रसंगीत पूर्ण स्वयंपाक करणं खरंच कठीण जातं. कारण इतर देशांच्या मानानं भारतीय स्वयंपाकाची पध्दतच वेळखाऊ आहे. त्यातल्या त्यात साधा महाराष्ट्रीय स्वयंपाक सोपा आहे तरी पण आपण एका जेवणात भात, पोळी, वरण, भाजी, उसळ, कोशिंबीर, चटणी, लोणचं, ताक असे किती पदार्थ करत असतो. मी आहारतज्ज्ञ नाही. पण एका वेळेला दोन वेगळ्या प्रकारचे कॉम्प्लेक्स कार्बोहायड्रेट्स खाऊ नयेत असं शास्त्र सांगतं. म्हणजे भात खाल्ला तर पोळी खाऊ नये असं. आपल्या रोजच्या पारंपरिक जेवणातून (इथे मी विशिष्ट प्रकारच्या जेवणाचा उल्लेख केला आहे. प्रांतांनुसार, जाती-धर्मानुसार पारंपरिक जेवणं वेगवेगळी असतात) आपल्याला आवश्यक ती कर्बोदकं, प्रथिनं, जीवनसत्वं आणि स्निग्ध पदार्थ असे सगळे घटक मिळत असतात हे खरंच. पण तरी प्रत्येक माणसाची शारीरिक कष्ट करण्याची पध्दत, त्याची एकूण ठेवण आणि आनुवंशिकता या सगळ्या गोष्टी लक्षात घेऊन आपलं रोजचं खाणं ठरवायला हवं. हा कॉमनसेन्स आहे त्यासाठी तज्ज्ञाची गरज नाही. खूप शारीरिक कष्ट करणा-या माणसाला अर्थातच जास्त कॅलरी असलेल्या जेवणाची गरज असते तसं बैठं काम करणा-या माणसाला कमी कॅलरी लागतात. शिवाय प्रत्येक कुटुंबाची विशिष्ट शारीरिक ठेवण असते. काही लोकांचं वजन पटकन वाढतं तर काही लोकांचं वजन तितक्या लवकर वाढत नाही. ज्यांचं वजन लवकर वाढतं त्यांना खाताना नेहमी विचार करावा लागतो. शिवाय प्रत्येक कुटुंबात आनुवांशिक आजारही असतात त्यांचा विचारही आपलं रोजचं खाणं ठरवताना करणं गरजेचं असतं. या सगळ्याचा विचार करून जर आपण असे काही सुटसुटीत जेवणाचे मेन्यू ठरवले की जे करायला फारसे कटकटीचे नाहीत शिवाय त्यातून आपल्याला आवश्यक ते सगळे अन्नघटक मिळतील तर ते घरातल्या गृहिणीला आणि गृहस्थालाही सोपं जाईल. विशेषतः रात्रीच्या जेवणासाठी असे काही सुटसुटीत मेन्यू सुचवावेत असं वाटलं. असेच काही मेन्यू मी आजच्या पोस्टमध्ये सुचवणार आहे. यात काही वन डिश मीलचेही प्रकार आहेत.

१) वेगवेगळ्या प्रकारचे पराठे आणि दही, कोशिंबीर – मेथी पराठा, पालक पराठा, आलू पराठा, मुळा पराठा, फ्लॉवर पराठा, दुधी पराठा, कोथिंबीर पराठा, बीट-गाजर पराठा इत्यादी
२) भाताचा एखादा प्रकार, बरोबर सूप आणि एखादं सॅलड किंवा कोशिंबीर किंवा ताक किंवा मठ्ठा
(पराठ्यांबद्दल तसंच भातांच्या वेगवेगळ्या प्रकारांबद्दल मागे मी दोन-तीन पोस्ट्समध्ये सविस्तर लिहिलेलं आहे त्यामुळे आता परत सविस्तर लिहीत नाही.www.shecooksathome.wordpress.com या माझ्या ब्लॉगवर तुम्हाला सविस्तर माहिती बघता येईल. किंवा या पेजवरच लहान मुलांसाठींच्या पदार्थांच्या पोस्टमध्येही तुम्ही बघू शकाल. )
३) वेगवेगळ्या प्रकारची खिचडी आणि कढी, पापड, कोशिंबीर
यात तुम्ही नेहमीच्या खिचडीत आपल्याला हव्या त्या भाज्या घालून खिचडी करू शकता. खिचडीसाठी वेगवेगळ्या डाळींचा वापर करू शकता. कधी मिश्र डाळींची खिचडी करू शकता. कधी साधी खिचडी करून त्यावर वरून फोडणी घेऊ शकता. कधी ज्वारी-बाजरीचा खिचडा करू शकता. ( यातल्या ब-याचशा रेसिपीज मी आधी शेअर केलेल्या आहेत.)
४) थालिपीठं, लोणी, दही, कोशिंबीर
थालिपीठं करतानाही कधी ज्वारीच्या पिठाची भरपूर कांदा घालून केलेली थालिपीठं तर कधी भाजणीची, कांदा घालून केलेली थालिपीठं तर कधी मेथी किंवा पालक किंवा कोबी किंवा दुधी किसून घालून केलेली थालिपीठं करू शकता. कधी आपल्याला हव्या त्या आवडत्या पिठांची मिसळीची थालिपीठं करू शकता.
५) वरणफळं – चिंचगुळाची किंवा साधी आमटी करून त्यात पोळ्या लाटून त्यांचे तुकडे करून घालून शिजवा. बरोबर एखादी कोशिंबीर करा.
६) उकडशेंगोळे – ज्वारीच्या पिठात तिखट, मीठ, हळद, हिंग, जिरं घालून भिजवा. त्याचे शेंगोळे करा. नेहमीसारखी फोडणी करून त्यात ठेचलेला भरपूर लसूण घाला. तो लाल झाला की थोडी हळद. तिखट घाला. भरपूर पाणी ओता. उकळी आली की शेंगोळे घाला. शिजवा. वरून लसणाची चटणी आणि तूप घालून खा.
७) मिसळ – मटकीची, मुगाची किंवा कुठलीही उसळ जराशी पातळ आणि मसालेदार करा. वरून हवं असल्यास फरसाण किंवा घरी केलेला चिवडा, बारीक चिरलेला कांदा, उकडलेला बटाटा, कोथिंबीर घालून खा. हवा असल्यास बरोबर ब्रेड घ्या.


८) वेगवेगळ्या प्रकारची सँडविचेस आणि बरोबर एखादं सूप
चीज-चटणी सँडविच – ब्रेडच्या कडा हव्या असल्यास काढा. मी काढत नाही. स्लाइसला एका बाजुनं पुदिना चटणी लावा (जितका पुदिना त्याच्या निम्मी कोथिंबीर, चटणी जितकी तिखट हवी तितकी हिरवी मिरची, एक लहान कांदा, लिंबाचा रस आणि साखर-मीठ घालून मिक्सरमध्ये वाटा.) त्यावर किसलेलं चीज घाला किंवा चीज स्लाइस ठेवा. वरून परत चटणी लावलेला स्लाइस ठेवा. आवडत असल्यास चटणीत थोडं बटर मिसळून लावा.
दही डिप सँडविच १ – दही एखादा तास पंचात बांधून ठेवा. पाणी निथळलं की त्यात कांदा, सिमला मिरची, थोडी सेलरी आणि हिरवी मिरची हे सगळं बारीक चिरून घाला. त्यात मीठ घाला. हे डिप ब्रेड स्लाइसला लावा. आवडत असल्यास त्यावर थोडा टोमॅटो सॉस घाला. वरून दुसरा स्लाइस ठेवा.
दही डिप सँडविच २ – दही एक तास पंचात बांधून ठेवा. पाणी निथळलं की त्यात वाटलेलं लसूण-मिरची घाला. मीठ-मिरपूड घाला. बारीक चिरलेली सिमला मिरची घाला. हे डिप लावून सँडविच करा.
टोस्टेड सँडविच – ब्रेडला पुदिना चटणी लावा. वर उकडलेला बटाटा आणि टोमॅटोच्या स्लाइस ठेवा. वर किसलेलं चीज घाला. मीठ-मिरपूड घाला. दुसरा स्लाइस ठेवून सँडविच करा. टोस्टरमध्ये बटर लावून टोस्ट करा.
चिकन सँडविच – श्रेडेड बोनलेस चिकन उकडा. ब्रेडला रेडीमेड मेयोनीज लावा. त्यावर किसलेला कोबी घाला. त्यावर उकडलेलं चिकन घाला. मीठ-मिरपूड घाला. दुसरा स्लाइस ठेवा. (माझी मैत्रीण संजना असं करते)
उरलंसुरलं सँडविच – बटाट्याची भाजी उरली असेल तर ती ब्रेड स्लाइसवर ठेवा. यावर घरातल्या कुठल्याही कोरड्या चटण्या घाला (दाण्याची-तिळाची-कढीपत्त्याची) वर चीज किसून घाला. टोस्ट करून खायला द्या.
९) पास्त्याचे वेगवेगळे प्रकार – चीज मॅकरोनी, टोमॅटो सॉसमधली स्पगेटी, पिंक सॉसमधला पास्ता
१०) पाव –भाजी – पाव भाजी तर आता आपल्या घराघरांमध्ये नियमितपणे केली जाते. नेहमी एकाच पध्दतीची भाजी न करता कधी मसालेदार रस्सा भाजी करा किंवा आपल्याला हव्या त्या भाज्या घालून मग मसाले घाला आणि भाजी करा. अधिक पौष्टिक करायचं असेल तर मग मल्टिग्रेन ब्रेड वापरा.
११) आमटी-भात-कोशिंबीर – आपल्या घरी होणारी नेहमीची साधी आमटी किंवा इतर कुठल्याही डाळीची कधी लसूण फोडणीला घालून तर कधी कांदा फोडणीला घालून तर कधी शेवग्याच्या शेंगा घालून तर कधी चिंचगूळ घालून अशी जरा घट्ट आमटी करा. बरोबर गरम भात आणि एखादी कोथिंबीर घ्या.
१२) चिकन किंवा मटन रस्सा किंवा फिश करी आणि भात – नेहमी करतो तसा चिकन किंवा मटनचा रस्सा करा, भात किंवा पोळी काहीही घ्या. बरोबर कच्चं सॅलड चिरून ठेवा. माशाची आमटी, भात आणि तळलेला माशाचा तुकडा असाही मेन्यू करू शकता.
१३) पिठलं, भाकरी किंवा भात आणि कोशिंबीर – दहीदुधाचं पिठलं, कांदा-लसणाचं पिठलं, कुळथाचं पिठलं, आधणाचं पिठलं असं आपल्याला हव्या त्या प्रकारचं पिठलं करा. बरोबर भात किंवा भाकरी आणि कोशिंबीर करा.

मी वर जे मेन्यू दिले आहेत ते मला पटकन् सुचलेले आहेत. तुमच्या घरी जे काही पदार्थ नेहमी होत असतील, आवडत असतील अशा पदार्थांचा विचार करून तुम्ही आपल्या सोयीनं मेन्यू ठरवू शकता. मी वर म्हटलं तसं मी आहारतज्ज्ञ नाही पण कॉमनसेन्स वापरून या मेन्यूत आपल्याला सर्व प्रकारचे अन्नघटक मिळावेत असा प्रयत्न केलेला आहे. पास्ता, ब्रेड हे मैद्यापासून बनतात पण तुम्ही मल्टिग्रेन ब्रेड किंवा पास्ता वापरू शकता. किंवा मैदा जरी वापरला तरी भाज्यांचा भरपूर वापर केलात तर मग कधीतरी तेवढा मैदा खायला हरकत नाही. दिवसा फळं खायला वेळ मिळत नसेल तर निदान रात्री तरी दोन फळं खाच.
या मेन्यूतल्या बहुतेक रेसिपीज मी याआधी शेअर केलेल्या आहेत.  ब्लॉगवर याआधीच्या पोस्ट्स बघितल्यात तर यातल्या ब-याचशा रेसिपीज सापडतील.
सोशल नेटवर्किंगवर ही पोस्ट शेअर करताना या ब्लॉगचा जरूर उल्लेख करा.

8 thoughts on “रात्रीच्या जेवणासाठी काही साधे-सोपे पदार्थ

Leave a comment