उन्हाळ्यातले दिवस – एक स्मरणरंजन

ही पोस्ट फेसबुक पेजवर मी मेमध्ये लिहिली होती. पण या ब्लॉगवर ती आज शेअर करतेय.

आज जुन्या आठवणींनी मनात गर्दी केली आहे. मुंबईत असह्य उकाडा आहे आणि मला बीडचा उन्हाळा आठवतो आहे. बीडला उन्हाळ्याच्या सुट्या म्हणजे मज्जा असायची. सातवीत असेपर्यंत बीडलाच राहात होतो. नंतर आठवीपासून सुटी लागली रे लागली की बीडला पळायचे. म्हणजे परीक्षा समजा दुपारी बाराला संपली की घरी येऊन जेवायचं आणि दोनच्या बसनं लगेचच बीडला पळायचं. माझी आत्या नांदेडला होती आणि काकांची नोकरीच्या निमित्तानं वेगवेगळ्या गावी बदली असायची. सुटी लागली की चुलत भावंडं आणि आते भावंडंही यायची. एक चुलत काका आमच्याच घरात बाजुला राहायचे. त्यांचीही मुलं होती. मग काय! नुसता धुमाकूळ असायचा. सकाळीच आजी-आजोबा किंवा आई मंडईतून शेकड्यानं गोटी आंबे (चोखून खायचे आंबे) घेऊन यायचे. ते एका मोठ्या बादलीत पाण्यात घालून अंगणात ठेवलेले असायचे. मग येताजाता फक्त या आंब्यांवर ताव मारायचा. किती खातो याची मोजदाद नसायचीच. जेवताना कुठल्यातरी स्थानिक साध्या आंब्यांचा पातळ रस (नेकनूर या जवळच्या गावचे आंबे प्रसिद्ध होते) असायचाच. बरोबर कैरीचं ताजं लोणचं किंवा तक्कू, कैरी कांद्याची चटणी, मेथांबा, कैरीचं वरण हेही असायचं. मधूनमधून आंब्याच्या रसाबरोबर गव्हाच्या तळलेल्या कुर्डयाही असायच्या.
जेवण झालं की मग बागेतच आंब्याच्याच झाडाखाली पत्त्यांचा अड्डा जमायचा. तासनतास झब्बू किंवा नॉट एट होम किंवा बदाम सात खेळायचो. पुन्हा लहर आली की झाडावर चढून कै-या काढायच्या, त्या चिरायच्या आणि तिखट-मीठ लावून खायच्या. किती आंबट खाताय असं कुणीही म्हटल्याचं आठवत नाहीये. भर दुपारच्या उन्हात नंदू आईस्क्रीमवाल्याची गाडी यायची. ती घंटा ऐकू आली की मग मोर्चा समोरच्या अंगणात वळायचा. नंदूच्या गाडीवरचं पॉट आईस्क्रीम खाण्याची चढाओढ असायची.
दुपार जरा कलली की मग आई एका मोठ्या ताटात पोहे लावायची किंवा चुरमु-यांना तेल-तिखट-मीठ-मेतकूट लावायची. बरोबर कच्चा कांदा. किंवा एखाद्या दिवशी दुपारी भाकरी किंवा पोळ्या उरल्या असतील तर मग हातानं जाडजाड तुकडे करायचे, त्याला तिखट-मीठ-काळा मसाला आणि तेल लावायचं बरोबर कच्चा कांदा खायचा. त्यावेळी पांढरेच कांदे असायचे. सगळे जमलेले असल्यानं रात्रीच्या जेवणात काहीही केलं तरी ते मस्तच लागायचं. बरेचदा ज्वारीच्या पिठाची पातेल्यात लावून केलेली, जाड कांदा घातलेली थालिपीठं, बरोबर भाजलेले दाणे, कच्च्या खारवड्या असायच्या. किंवा मुगडाळीची खिचडी आणि भाजलेले पापड, किंवा पिठलं भाकरी, भुरका असायचं. माझ्या आईला मुलांना घेऊन बाहेर भटकायला जायची फार हौस होती. मंगीराज काका म्हणून बाबांचे मित्र बँक मॅनेजर होते ते त्यांची जीप पाठवत असत. आम्हा सगळ्या मुलांना घेऊन आई बरोबर काही तरी खायला करून घेऊन, खंडेश्वरीला घेऊन जायची. खंडेश्वरी हे बीडला तेव्हा गावाबाहेर असलेलं देऊळ होतं. तेव्हाचा एकमेव पिकनिक स्पॉट. फार मजा यायची. कारण दुसरं काहीच मनोरंजनाचं साधन नव्हतं.
रात्री उशीरापर्यंत विविध भारतीवर गाणी ऐकत पुन्हा पत्ते खेळायचे किंवा गप्पा मारत बसायच्या. अंगणात बाजा टाकून झोपायचं. मग आजोबा त्या लख्ख चांदण्यांनी भरलेल्या आभाळातली नक्षत्रं दाखवायचे. सकाळी ऊन अंगावर येईपर्यंत बाजेवर लोळत पडायचं. उठल्यावर मागच्या अंगणातल्या विहिरीच्या कट्ट्यावर बसून दात घासायचे की आंबे खायला सुरूवात!
आजीचा पापड, पापड्या, खारवड्या, कुर्डया, शेवया करण्याचा कार्यक्रम असायचा. पापड करायचे असतील तेव्हा आजीच्या आजुबाजुला राहणा-या मैत्रिणींकडे जाऊन त्यांची पोळपाट-लाटणी मागून आणायची. मग जेवणं आटोपली की पापड लाटायला बसायचं. लाटताना अर्ध्या लाट्या पोटातच जायच्या. ओले पापड तळून खायला काय मस्त लागायचे! कुर्डयांसाठी गहू भिजवण्यापासून तयारी असायची. त्याचा तो उग्र दर्प घरभर पसरायचा. पण मग तो शिजवलेला चीक काय चविष्ट लागायचा. वाटीत घेऊन चमच्यानं चाटत खात बसून राहावंसं वाटायचं. खारवड्या, ज्वारीच्या पापड्या, तांदळाच्या पापड्या, साबुदाण्याच्या पापड्या असं एका दिवशी एका पाठोपाठ व्हायचं. सगळ्यांचंच शिजवलेलं पीठ मस्त लागायचं. खारवड्यांना बाजरीबरोबर, लसूण-मिरची-जि-याचं वाटण, तांदळाच्या पापड्यांना नुसतं जिरं, ज्वारीच्या कोंड्याच्या पापड्यांना तिखट-मीठ-जिरं, साबुदाण्याच्या कधी नुसतंच मीठ घालून तर कधी जिरं-मिरचीचं वाटण घालून अशा पापड्या व्हायच्या. कडक उन्हात आजीबरोबर गच्चीवर जाऊन प्लॅस्टिकवर त्या पापड्या घालायच्या. पाय नुसते पोळत असायचे. मग दुपारी पुन्हा जाऊन त्या उलट्या करायच्या अर्थातच उलट्या करताना ब-याचशा खायच्याही. शेवया करताना आजी दोन लोखंडी डब्यांवर काठ्या आडव्या ठेवायची आणि अलवार हातांनी त्यावर शेवया वाळवायला घालायची.
आता हे सगळं रेडीमेड मिळतं. उत्तम मिळतं. म्हणून आधीच फक्त छान मिळायचं असं माझं अजिबात म्हणणं नाही. पण त्या बरोबर या ज्या आठवणी होत्या त्या आता मिळत नाहीत हे मात्र खरं.

सायली राजाध्यक्ष

Leave a comment