पाणी पुरी

मी लग्न होईपर्यंत रस्त्यावर कधीही पाणी-पुरी खाल्ली नव्हती! कारण मला रस्त्यावरच्या गाड्यांवरची अस्वच्छता बघूनच ती खावीशी वाटायची नाही. तेव्हा घरीही नियमितपणे कधी पाणी-पुरी होत नसे. लग्न होऊन मुंबईला आल्यानंतर निरंजनबरोबर मी रस्त्यावर पाणी-पुरी खायला लागले. आमच्या अगदी घराजवळ एक पाणी-पुरीवाला आहे. तो आसपासच्या भागांमध्ये अगदी प्रसिध्द आहे. त्याच्याकडची पाणी-पुरी अफलातून असते. माझा मेव्हणा तर अंधेरीहून खास या पाणी-पुरीवाल्याकडची पाणी-पुरी खायला यायचा. ही तो माझा मेव्हणा होण्याआधीची गोष्ट आहे. आमच्या या पाणी-पुरीवाल्याकडे मी आमच्याच कॉलनीतल्या व. पु. काळे आणि मे. पुं. रेगे या दोघांनाही पाणी-पुरी खाताना बघितलेलं आहे. या भय्याकडची नुसती पाणी-पुरीच नव्हे तर शेव-पुरी, भेळ, रगडा-पॅटिस हे पदार्थही उत्तम असतात. अगदी लहानशी हातगाडी चालवणा-या या भय्यानं आता स्वतःची कायमची गाडी उभारली आहे. त्याच्या हाताखाली आता पुरेसा स्टाफही आहे. या भय्याची दोन्ही मुलं चांगल्या इंग्रजी शाळेत शिकलेली आहेत. हे सगळं त्यानं आपल्या या कौशल्याच्या जोरावर केलं आहे. फक्त एकच आहे तो मराठी नसून उत्तर प्रदेशी असला तरी तो मराठी दुकानदारांसारखाच अंगावर खेकसतो!

photo 1
पाणी-पुरी मुळात उत्तर प्रदेशातली असली तरी आता महाराष्ट्रातही ठिकठिकाणी उत्तम पाणी-पुरी मिळते. बंगाली लोक याला पुचका म्हणतात. काहीजणांना व्होडका घालून केलेलं पाणीही आवडतं. हल्ली ब-याच पार्ट्यांना स्टार्टर म्हणून व्होडका घातलेली पाणी-पुरी देतात. मी एका जेवणाला कोलंबीचं मिश्रण घातलेली पुरी बघितली होती. तर एका जेवणाला मालवणी मसाल्याचं भाजीचं मिश्रण असलेली खाल्ली होती. पण हे सगळे प्रकार बकवास आहेत असं माझं मत आहे! पाणी-पुरी खायची तर ती पुदिन्याच्याच पाण्याची.
गेली काही वर्षं मात्र मी घरी नियमितपणे पाणी-पुरी करायला लागले आहे. स्वच्छता हा तर एक भाग आहेच. पण त्याचबरोबर एकदा केली की मुली आणि मीही दोन दिवस मनसोक्त पाणी-पुरी खातो. गोड चटणी माझ्याकडे फ्रीजरला बाटल्या भरून तयार असते. पुदिन्याचं पाणी ताजंच करावं लागतं. हे पाणी मी दोन-तीन प्रकारांनी करते. एक आहे माझ्या बहिणीची कैरी उकडून, त्यात पुदिना, कोथिंबीर, मिरची, हिंग, मीठ घालून केलेलं आंबट-तिखट पाणी, दुसरं आहे मी काही दिवसांपूर्वी शेअर केलेलं राजस्थानी पन्हं, तिसरं आहे पुदिना,कोथिंबीर, मिरची, काळं मीठ, हिंग, मिरी दाणे, जिरे पूड, लिंबाचा रस आणि तयार पाणी-पुरी मसाला वापरून केलेलं पाणी.
अन्न हेच पूर्णब्रह्मची एक मैत्रीण गौरी पत्की-महाजन ही अमेरिकेत राहते. तिनं मला पाणी-पुरीची सविस्तर रेसिपी लिहायचं सुचवलं होतं. म्हणून आजची ही रेसिपी आहे पाणी-पुरी.

पाणी-पुरीची रेसिपी लिहिताना एक गोष्ट आधीच सांगते की भेळ, पाणी-पुरी या पदार्थांना प्रमाण नाही. आपल्या आवडीनुसार घटक पदार्थांचं प्रमाण कमी-जास्त करून आपल्या आवडीची पाणी-पुरी तुम्ही करा. मी आज ढोबळ रेसिपी सांगणार आहे.

पाणी-पुरी
पाणी-पुरीचे तीन महत्वाचे घटक म्हणजे पुदिन्याचं पाणी, गोड चटणी आणि पुरीत घालण्यासाठी रगडा किंवा मूग-चणे यांचं मिश्रण

गोड चटणीचं साहित्य – जितकी चिंच तितकाच गूळ आणि तितकाच खजूर, धणे पूड, जिरे पूड, तिखट आणि मीठ चवीनुसार

तिखट पाण्याचं साहित्य – १ जुडी पुदिना, त्याच्या अर्धी कोथिंबीर, जितपत तिखट हवं असेल तितक्या मिरच्या (५-६ माणसांसाठी ३-४ कमी तिखट मिरच्या पुरेत), १ टीस्पून काळं मीठ, १ टीस्पून जिरे पूड, पाव टीस्पून हिंग, २ टीस्पून रेडीमेड चाट मसाला, पाव इंच आल्याचा तुकडा, एका लिंबाचा रस, मीठ चवीनुसार

रगड्याचं साहित्य – १ वाटी पांढरे वाटाणे ७-८ तास भिजवून ठेवा. धणे पूड, तिखट आणि मीठ चवीनुसार

मूग-चणे मिश्रणाचं साहित्य – अर्धी वाटी मोड आलेले मूग, अर्धी वाटी मोड आलेले चणे, २ उकडून मॅश केलेले बटाटे, धणे पूड, तिखट, मीठ चवीनुसार

कृती –

गोड चटणीची कृती –
१) चिंच, गूळ आणि खजूर एकत्र करून कुकरच्या भांड्यात घाला. त्यात अंदाजानं पाणी घालून कुकरला अगदी मऊ शिजवून घ्या.
२) थंड झाल्यावर मिक्सरमधून एकजीव वाटा. वाटलेलं मिश्रण भांड्यात काढा. त्यात चटणी जितपत पातळ हवी असेल तितकं पाणी घाला.
३) त्यात धणे पूड, जिरे पूड, तिखट आणि मीठ घाला. नीट मिसळून घ्या. पातेलं गॅसवर ठेवून मधूनमधून हलवत चटणीला चांगली उकळी काढा.
४) गॅस बंद करा. चटणी थंड झाली की नंतर काचेच्या बाटल्यांमध्ये भरून फ्रीजरला ठेवा. हवी तशी वापरा. काचेच्या बाटल्यांत भरताना वर पुरेशी जागा रिकामी ठेवा नाहीतर बाटल्या फुटतील.

तिखट पाण्याची कृती –
१) यासाठी दिलेलं सगळं साहित्य मिक्सरमध्ये एकजीव वाटा. त्यात कपभर पाणी घालून परत वाटा.
२) बारीक गाळणीनं गाळून घ्या. त्यात साधारणपणे ३-४ कप पाणी घाला.
३) चव बघून मसाले कमी-जास्त करा. हे पाणी फ्रीजमध्ये ठेवून अगदी थंड करा.

रगड्याची कृती –
१) पांढरे वाटाणे कुकरला अगदी मऊ होईपर्यंत शिजवून घ्या.
२) शिजल्यानंतर ते चांगले घोटून घ्या.
३) त्यात धणे पूड, तिखट आणि मीठ घाला. नीट हलवून घ्या.

मूग-चणे मिश्रणाची कृती –
१) मूग आणि चणे जेमतेम शिजवा. लगदा करू नका.
२) त्यात मॅश केलेला बटाटा घालून एकत्र करा.
३) त्यात धणे पूड, तिखट, मीठ घालून हलक्या हातानं कालवून घ्या.

पाणी-पुरीची कृती –
१) एका प्लेटमध्ये लहान वाटीत गोड चटणी, दुस-या वाटीत तिखट पाणी, मूग-चण्याचं मिश्रण, रगडा आणि पाणी-पुरीच्या पु-या असं घ्या.
२) पु-या फोडून त्यात आवडीप्रमाणे रगडा, मूग-चणे मिश्रण, गोड चटणी आणि तिखट पाणी घाला.
ही सगळी कृती लवकर लवकर करा नाहीतर पु-या फुटतील.

photo 5

चमचमीत पाणी-पुरी तयार आहे.
तुम्ही पाणी-पुरी करत असालच. पण या पध्दतीनंही करून बघा आणि कशी झाली होती ते नक्की कळवा.

सायली राजाध्यक्ष

Leave a Reply

Fill in your details below or click an icon to log in:

WordPress.com Logo

You are commenting using your WordPress.com account. Log Out /  Change )

Google photo

You are commenting using your Google account. Log Out /  Change )

Twitter picture

You are commenting using your Twitter account. Log Out /  Change )

Facebook photo

You are commenting using your Facebook account. Log Out /  Change )

Connecting to %s

%d bloggers like this: