पुण्याहून मुंबईला येताना लोणावळ्यासाठीची एक्झिट घेऊन आपण लोणावळ्याच्या बाजारात पोचलो की मुख्य रस्त्यावरच उजवीकडे हरी ओम इंटरनॅशनल म्हणून हॉटेल दिसतं. त्याच्या बाजुच्या गल्लीतून आत शिरलं की लगेचच उजव्या बाजुला जोशी सॅनटोरियम आणि होमली फूड अशी पाटी दिसते. हीच फासे बाईंची प्रसिद्ध खानावळ. पुणे-मुंबई प्रवास नियमितपणे करणा-या ब-याच लोकांना फासे बाईंची ही खानावळ माहीत आहे. कुठलाही बडेजाव नसलेली ही खानावळ. बसायलाही अतिशय साधी व्यवस्था पण इथे अतिशय उत्तम जेवण मिळतं.
ही खानावळ ज्यांची आहे त्या शैला फासे तिथेच बाजुला लहानशा घरात राहतात. जवळपास ३०-३२ वर्षांपूर्वी जोशी सॅनटोरियमची जागा विकायला आहे असं कळल्यावर शैलाताईंनी ही जागा विकत घेतली आणि लहानशी खानावळ तिथे सुरू केली. सुरूवातीला इथे फारसे लोक येत नसत. पण लक्ष्मीकांत बेर्डे एकदा इथे आले आणि नंतर वारंवार येतच राहिले. त्यांच्याच ओळखीतून मग नाट्य-चित्रपटसृष्टीतले कलाकार नियमितपणे इथे यायला लागले. शैलाताईंना हे सगळे ममीच म्हणतात. त्याही तितक्याच आपुलकीनं सगळ्यांचा उत्तम पाहुणचार करतात. शैलाताईंनी नंतर गावातच अजून एक बंगला घेतला. तिथेही असंच ममीज किचन सुरू केलं. ते आता त्यांची मुलगी बघते. पण ३०-३२ वर्षांपूर्वी ठाण्याहून एकटं लोणावळ्यात स्थलांतरीत व्हायचं धाडस ममींनी केलं म्हणून आज हे सगळं आहे. शैलाताई मूळच्या ठाण्याच्या. कुटुंब ठाण्याला आणि त्या इथे एकट्या अशी बरीच वर्षं त्यांनी काढली. आताही त्यांची मुलगी मुंबईला येऊन जाऊन असते. त्या इथे एकट्याच राहतात. पण गेली बरीच वर्षं मायेनं गोळा केलेला त्यांचा गोतावळा त्यांच्या बरोबर इथे असतो.
फासे बाईंच्या या चवदार जेवण देणा-या खानावळीची माझी ओळख झाली ती मंगल केंकरेमुळे. सहा-सात वर्षांपूर्वी एका पावसाळ्यात आम्ही खास जेवायला इथे गेलो होतो. मंगलची आणि त्यांची ओळख खूप जुनी आहे. लक्ष्मीकांत बेर्डे आजारी असताना झालेली. त्या दोघी हॉस्पिटलमध्ये थांबत असत. तर आम्ही त्या पावसाळ्यात त्यांच्याकडे जाऊन जेवलो आणि आता कधीही मुंबई-पुणे प्रवास असला की त्यांच्याकडे जाऊन जेवणं हा प्रघात पडून गेला आहे.
शैलाताई फक्त गरजू बायकांनाच आपल्या किचनमध्ये कामाला ठेवतात. त्यांना हवीनको ती सर्व मदत करतात. त्यांच्या मुलांचं शिक्षण करतात. किचनमध्ये तुम्ही कुठल्याही वेळेला जा, हे किचन अतिशय स्वच्छ आणि टापटीप असतं, इंग्रजीत सांगायचं झालं तर स्पॉटलेस क्लीन. मी परवा गेले तेव्हा न कळवता गेले होते. गेल्यावर आधी त्यांच्या घरात गेले. थोडा वेळ गप्पा झाल्यावर मी त्यांना सांगितलं की, मला तुमच्या स्वयंपाकघराचे फोटो काढायचे आहेत. त्या लगेच म्हणाल्या, “जा की, आणि हवे तितके फोटो काढ.” मला वाटत नाही की खाण्याचा व्यवसाय करणारा कुठलाही माणूस कुठल्याही पूर्वसूचनेशिवाय किचनमध्ये जाण्याची परवानगी इतक्या सहज देईल म्हणून.
ममीज किचनमध्ये शाकाहारी आणि मांसाहारी अशा दोन्ही पद्धतींचं जेवण उत्तम मिळतं. स्वयंपाकघरात गेलात तर शाकाहारी जेवण ठेवण्यासाठी वेगळं टेबल तुम्हाला दिसेल. वेगळी भांडी, वेगळे चमचे दिसतील. या किचनमध्ये पुसून ठेवलेली भांडी तुम्ही बघाल तर थक्क व्हाल इतकी ती स्वच्छ असतात. ममी आता फक्त दुरून देखरेख करतात पण त्यांच्या हाताखाली तयार झालेले लोक ही सगळी व्यवस्था चोख बघतात. जेवायला बसायला साधी लाकडी टेबल्स आणि बाकं आहेत. अर्ध्या बंद जागेत ही टेबलं आहेत. पावसाळ्यात उघडा भाग प्लॅस्टिकनं बंद केला जातो.
तुम्ही जेवायला टेबलावर बसलात की स्वच्छ पुसलेली ताटं, वाट्या, चमचे, चिरलेला कांदा, लिंबू, लोणचं येतं. तुम्ही तुमची ताटं मांडून घ्यायची. मग तुम्ही सांगितलं असेल ते गरमागरम जेवण समोर येतं. डब्यात गरमागरम पोळ्या येतात. मासे सांगितले असतील तव्यावरून ताटात येतात. ममींचा चिकन आणि मटनाचा रस्साही मस्त असतो असं माझा नवरा निरंजन म्हणतो. परवा आम्ही गेलो होतो तेव्हा मंगलनं शिरा खावासा वाटतोय असं सांगितल्याबरोबर साजुक तुपातला गरमागरम शिरा समोर आला. मी एकटीच शाकाहारी असते तरी मला तीन-चार प्रकारच्या भाज्या, उसळी खायला मिळतात. निवांत जेवून झालं की ममींबरोबर गप्पा मारत बसतो. ममी खूप बोलघेवड्या आहेत. त्या लोणावळ्याच्या नगरसेवकही होत्या. त्यांच्या तोंडून लक्ष्मीकांत बेर्डेंचे किस्से ऐकणं हीसुद्धा एक मेजवानीच असते.
तुम्हीही कधीही लोणावळ्याला गेलात तर नक्की ममीज किचनला जेवायला जा, ममींशी गप्पा मारा. खात्रीनं सांगते, तुम्हालाही मजा येईल.
सायली राजाध्यक्ष
अभिनंदन फासे ताई.या व्ययसायातील नवख्या लोकांना आपणाकडून काही मार्गदर्शन मिळाले तर फार चांगले होईल. विनायक काळदाते, नाशिक.
LikeLiked by 1 person