
किरवंत, सुंदर मी होणार, ती फुलराणी, वा गुरू!, कबड्डी कबड्डी, सही रे सही, प्रेमा तुझा रंग कसा, सख्खे शेजारी, लग्नाची बेडी, तरूण तुर्क म्हातारे अर्क, लेकुरे उदंड जालीं, व्यक्ती आणि वल्ली, मोरूची मावशी, दिनुच्या सासुबाई राधाबाई अशा एकापेक्षा एक सरस नाटकांची निर्मिती करणारे सुधीर भट आणि त्यांची सुयोग ही नाट्यसंस्था महाराष्ट्रातल्या नाट्यरसिकांना चांगलीच परिचित आहे. नाट्य रसिकांना दर्जेदार नाटकांची मेजवानी देणारे भट खाण्यातलेही दर्दी होते.
स्वतः खवय्या असलेल्या भटांना लोकांना खिलवायलाही फार आवडायचं. भट स्वतः वाटणघाटणापासून अगदी साग्रसंगीत स्वयंपाक करायचे. त्यांच्या परदेश दौ-यावरच्या स्वयंपाकाचे किस्से प्रसिध्दच आहेत. सुयोगची नाटकं जेव्हा परदेश दौ-यांसाठी निघायची तेव्हा नाटकांसाठी लागणा-या गोष्टींबरोबरच स्वयंपाकासाठी लागणारी सामग्रीही सज्ज व्हायची. नाटकांमध्ये काम करणा-या कलाकारांकडे स्वयंपाकाचं कुठलं सामान असेल याच्या सूचना भट द्यायचे. म्हणजे एखाद्या कलाकाराकडे पाच किलो तांदूळ असतील तर दुस-याच्या सामानात नारळही! तितकं सामान कमी घ्या अशा सूचना भट संबंधित कलाकाराला द्यायचे. परदेशात ज्या बसमधून ते प्रवास करायचे त्यात मिक्सरपासून स्वयंपाकाला लागणारं सगळं साहित्य असायचं. ज्या हॉटेलवर स्वयंपाक करायला परवानगी असेल तिथे प्रश्नच नाही पण जिथे काही निर्बंध असतील तिथे त्यांच्यावर मात करून स्वयंपाक कसा करायचा हे भटांना चांगलंच माहीत होतं. ताजा नारळ खवून, त्याचं ताजं वाटण करून माशांचं कालवण स्वतः भट करायचे. दौ-यावरच्या स्त्री-कलाकारांनाही स्वयंपाक करण्याची मुभा नव्हती! त्यांना दुस-यानं काही करणं फार पसंत नसायचं. इतके भट स्वयंपाकाच्या पध्दतीबद्दल आग्रही होते. त्यांच्या या प्रेमळ हट्टाचे किस्से त्यांच्या मित्रमंडळीकडूनच ऐकावेत. भट एखाद्या अन्नपूर्णेसारखं किती प्रेमानं आपल्या मित्रांना खाऊ घालत ते ऐकण्यासारखं आहे.
स्वयंपाक करणं आणि लोकांना खिलवणं हे सुधीर भटांचं पॅशन होतं. या पॅशनमधूनच त्यांनी पुण्यात फिश करी-राईस या आपल्या रेस्टॉरंटची सुरूवात केली. भटांच्या या रेस्टॉरंटनं आता पुणेकरांची पसंती मिळवलेली आहे. पुण्यात त्याच्या दोन शाखा आहेत. भट असताना ते स्वतः रेस्टॉरंटसाठी मासे खरेदी करायचे. आता त्यांची पत्नी आणि मुलगा संदेश हे दोघे हीच परंपरा पुढे चालवत आहेत. फिश करी-राईसचे मासे मुंबईतून येतात. स्वतः संदेश भट त्याकडे जातीनं लक्ष देतात. प्रत्येक वेळी पुण्याला गेलं की निदान एक जेवण तरी फिश करी-राईसमध्ये करायचं असं आमचं ठरलेलंच आहे. आमचा मित्र विजय केंकरे यानं सुधीर भटांची निर्मिती असलेल्या तब्बल १८ नाटकांचं दिग्दर्शन केलेलं आहे. त्यामुळे भट कुटुंब विजयच्या चांगल्याच परिचयाचं आहे. काल मी आणि माझा नवरा निरंजन एका दिवसासाठी पुण्याला गेलो होतो. यावेळी विजय बरोबर नव्हता पण मंगल केंकरे आमच्या बरोबर होती. अर्थातच काल दुपारचं जेवण आम्ही फिश करी-राईसमध्ये केलं.
या रेस्टॉरंटमध्ये मुख्यतः भटांच्या कारवारी पध्दतीनं केलेलं जेवण मिळतं. कारवारी जेवणात अर्थातच ओल्या नारळाचा वापर मुक्त हस्तानं केलेला असतो. त्यामुळे इथल्या पदार्थांमध्येही मुबलक प्रमाणात ओलं नारळ वापरलेलं असतं. नारळाचा एक अवगुण असा की ते थोडंही शिळं असेल तर त्याचा खवटपणा पटकन जाणवतो. पण फिश करी- राईसचं वैशिष्ट्य असं आहे की प्रत्येक पदार्थातला नारळ अगदी ताजा खोवलेला असतो. नारळाच्या हिरवी आणि लाल अशा दोन चटण्या, फ्लॉवरचं ताजं लोणचं, वेलकम ड्रिंक म्हणून दिलं जाणारं लसूण-मिरचीच्या झणक्याचं, आमसूलाचं तिवळ, जि-या-मि-याची कढी, सोलकढी हे फिश करी-राईसचे खास पदार्थ. शिवाय जो ताजा मासा उपलब्ध असेल त्याची आमटी, तळलेला तुकडा, मटन आणि चिकनचे प्रकार हे तर असतातच. शाकाहारी जेवणा-यांनाही इथे बरेच पर्याय आहेत ( मी शाकाहारी असल्यानं माझं इकडे बारीक लक्ष असतं!). एक उसळ, एक पालेभाजी आणि एक फळभाजी अशा दोन भाज्या, एक आमटी आणि वेगवेगळ्या प्रकारची कापं, शिवाय भाजलेला पापड. आमच्याकडे वांग्याचे काप नेहमी होतात. पण या रेस्टॉरंटमध्ये वांग्याबरोबरच कच्चं केळं, बटाटा, सुरण, लाल भोपळा, पडवळ, कर्टुली यांचेही काप असतात आणि ते फारच चविष्ट लागतात.
या रेस्टॉरंटचं डेकोरही अगदी बघण्यासारखं आहे. रेस्टॉरंटच्या बाहेरच्या आवारात भटांच्या नाटकांचे बोर्ड ठेवले आहेत. दारातून आत गेल्याबरोबर डावीकडे भटांचं एक रेखाचित्र लावलेलं आहे. या चित्राभोवती भटांच्या वेगवेगळ्या छंदांबद्दल लिहिलेलं आहे. आतमध्येही त्यांच्या नाटकांच्या जाहिरातींचे कोलाज करून लावलेले आहेत. अतिशय स्वच्छ असं हे रेस्टॉरंट आहे. लहानसं असलं तरी कर्मचारी भरपूर आहेत त्यामुळे तुम्हाला ताटकळत बसावं लागत नाही. ओपन किचन असल्यानं स्वयंपाकघरात काय चाललं आहे हे तुम्हाला दिसतं. मुख्य म्हणजे ते सतत गजबजलेलं असतं. मी तीन-चारदा इथे जेवले आहे पण प्रत्येकवेळी तितकीच गर्दी होती. मित्रमंडळीला प्रेमानं खिलवण्याची सुधीर भटांची परंपरा हे रेस्टॉरंट पुढे चालवतं आहे हे नक्की.
सायली राजाध्यक्ष
तुम्ही शिकलेल्या विषेशत: माश्यांच्या पाककृती देणे.
LikeLike