मे महिन्यात मी लंडन आणि आयर्लंडला जाऊन आले. तेव्हा फेसबुक पेजवर ही पोस्ट लिहिली होती.

मी तुम्हाला सांगितलं होतंच, मी सध्या लंडनमध्ये आहे. लंडन ही इंग्लंडची राजधानी जरी असली तरी आता तर ते आंतरराष्ट्रीय लोकसंख्येचं शहर झालेलं आहे. लंडनमध्ये फिरताना ट्यूबमध्ये तुम्हाला भारतीय, पाकिस्तानी, आखाती देशातले लोक, आफ्रिकन अमेरिकन, लेबनीज, मोरक्कन, टर्किश, पूर्व युरोपातले लोक असे सर्व वंशांचे आणि धर्मांचे लोक दिसतात. इतक्या वेगवेगळ्या सांस्कृतिक पार्श्वभूमीचे लोक एकत्र नांदत असल्यामुळे अर्थातच लंडनची खाद्यसंस्कृतीही तशीच रंगीबेरंगी आहे.
लंडनमध्ये प्रेट अ माँजे ही बरिस्ता कंपनीची रेस्टॉरंट्स कम फुड शॉप्स पावलोपावली दिसतात. जगातल्या सगळ्यात महागड्या शहरांमध्ये लंडनचा समावेश होतो. पण प्रेट अ माँजेमध्ये तुम्ही वाजवी किंमतीत खाणं विकत घेऊ शकता. फक्त इथे मी ज्या चिरलेल्या आंब्याच्या फोडी खाल्ल्या त्या मात्र आपल्या नीलम किंवा तोतापरी आंब्याच्या कै-या अर्धवट पिकल्यावर जशा लागतात तशा लागत होत्या! पण इथे तुम्ही एखादं सँडविच आणि हॉट चॉकलेट किंवा कॉफी विकत घेतलीत तर तुमचं पोट छान भरतं.
म्हटलं तसं लंडनमध्ये विविध देशातून आलेले लोक राहतात. शिवाय या दिवसांत मोठ्या प्रमाणावर पर्यटकही येत असतात. त्यामुळे लंडनमध्ये विविध प्रकारचं खाणं मिळणारी रेस्टॉरंट्स जागोजागी दिसतात. ब्रिटिश रेस्टॉरंट्सबरोबरच ग्रीक, टर्किश, इजिप्शियन, अमेरिकन, लेबनीज, इटालियन, बांग्लादेशी (बाल्टी), विएतनामीज, चायनीज, मॉरीशन, कोरियन अशी विविध रेस्टॉरंट्स मी इथे बघितली. भारतीय रेस्टॉरंट्स तर लंडनमध्ये प्रसिद्ध आहेतच. विशेषतः चिकन टिक्का मसाला फार प्रसिद्ध आहे. ब्रिटिशांचं फिश आणि चिप्स फारच नावाजलं जातं. तेही इथे जागोजागी मिळतं.
आम्ही गेले सहा दिवस लंडनमध्ये आहोत. माझ्या घरातले सगळेजण वेगवेगळ्या प्रकारचं खाणं खाऊन बघायला तयार असतात. आम्ही आतापर्यंत चायनीज, टर्किश, ग्रीक, अमेरिकन, विएतनामीज, इटालियन आणि भारतीय या प्रकारांचं जेवण जेवलो. मी शाकाहारी असले तरी मला बरेच पर्याय उपलब्ध होते त्यामुळे मलाही या सगळ्या ठिकाणी जेवता आलं.
तुमच्यासाठी मी काही फोटो शेअर करते आहे.
सायली राजाध्यक्ष