स्वयंपाकाचं नियोजन – ४

रोज जेवायला काय करायचं हा यक्षप्रश्न असतो. म्हणजे स्वयंपाकापेक्षाही तो विचारच जास्त त्रास देतो. थोडंसं नियोजन केलं, त्यानुसार यादी करून खरेदी केली आणि थोडीशी पूर्वतयारी केली तर मग हा प्रश्न तितकासा त्रास देणार नाही. मी स्वयंपाकाचं नियोजन कसं करते हे मी तुम्हाला सांगते. आमच्या बांद्रा इस्टमध्ये, आमच्या घरापासून दहा मिनिटांच्या अंतरावर रोज भाजी बाजार भरतो. मी आठवड्यातून दोनदा भाजी घेऊन येते. मग जी काय भाजी आणली आहे त्यानुसार पुढच्या ३-४ दिवसांचा साधारण मेन्यू ठरवते. दरवेळेला लिहून ठेवतेच असं नाही पण मनात ठरलेलं असतं. शिवाय माझा नवरा, निरंजन सारस्वत आहे त्यामुळे आमच्याकडे मासेही लागतात. माझ्या मुलींना चिकनही आवडतं. धाकट्या मुलीला कुठलीही हिरवी भाजी आवडत नाही. दोन्ही मुलींना आणि मलाही अधूनमधून चटकमटक खायला आवडतं. निरंजन आणि माझी मोठी मुलगी मधूनमधून थोडंसं डाएट करतात. आमच्याकडे एकावेळेला भात आणि पोळी हे दोन्ही फार कमीवेळा खाल्लं जातं. डबे असतील तर बरेचदा भाजी-पोळीच होते पण हल्ली निरंजन बरेचदा घरून काम करतो मग जरा वेगळा स्वयंपाक केला जातो. हे सगळं लक्षात घेऊन मनात एका आठवड्याचा साधारण मेन्यू तयार होतो. अर्थात यात सक्ती कुठलीच नाही. एखादा पदार्थ ठरलेला असेल आणि ऐनवेळेला दुसरं काही खावंसं वाटलं तर मग तसंही करते. मी जेव्हा माझ्या डिजिटल अंकांचं काम करत असते तेव्हा मला डोकं वर करायला वेळ नसतो. शिवाय मला अन्न हेच पूर्णब्रह्मलाही लक्षात ठेवावं लागतं. मग त्याकाळात मी चक्क विचार करून आठवड्याचा मेन्यू एका डायरीत लिहून काढते. त्यातल्या ज्या गोष्टी मी करणार असते त्या सकाळी लवकर करते आणि मगच कामाला बसते. आपलं घर हे काही हॉटेल नसतं त्यामुळे आपला पंधरा दिवसांचा स्वयंपाक बघितला तर तोच आपण आलटून पालटून करत असतो. मी आज तुम्हाला असेच काही मेन्यू सुचवणार आहे. या मेन्यूतले पदार्थ माझ्या घरी नेहमी होतात आणि माझ्या घरातल्या लोकांना ते आवडतात. तुम्ही तुमच्या घरात नेहमी होणा-या आणि सगळ्यांना आवडणा-या पदार्थांमधून असे काही मेन्यू तयार करू शकाल.

सोमवार
नाश्ता – मिक्स डाळींची धिरडी
दुपारचं जेवण – पापडीची साधी भाजी, तळलेलं पापलेट, काकडी-टोमॅटो-कांदा कोशिंबीर, पोळ्या, ताक
रात्रीचं जेवण – पालक सूप, उकडलेल्या भाज्या आणि मसालेभात

मंगळवार
नाश्ता – मेथी पराठे
दुपारचं जेवण – लाल माठाची भाजी, भेंडीची भाजी, पोळ्या, छोले-कांदा पात सॅलड, ताक
रात्रीचं जेवण – पिठलं, वांग्याचं दह्यातलं भरीत, ठेचा, पोळी किंवा भाकरी, हवा असल्यास भात

बुधवार
नाश्ता – तिखट आप्पे
दुपारचं जेवण – फरसबीची भाजी, वांग्याचे काप, बिटाची कोशिंबीर, पोळ्या, ताक
रात्रीचं जेवण – ताकातला पालक, भात आणि कांद्याची कोशिंबीर

गुरूवार
नाश्ता – उत्तप्पा-चटणी
दुपारचं जेवण – कोबीची भाजी, मेथीचं वरण, दुधी भोपळ्याचं दह्यातलं रायतं, पोळ्या, ताक
रात्रीचं जेवण – पापलेटची आमटी, फोडणीचं वरण ( कारण मी शाकाहारी आहे ), भात, तळलेला बांगडा

शुक्रवार
नाश्ता – कॉर्न दाणे घालून केलेला उपमा
दुपारचं जेवण – मटकीची उसळ, काकडीची कोशिंबीर, पोळ्या आणि ताक रात्रीचं
जेवण – पाव-भाजी आणि दुधी भोपळ्याचं सूप

शनिवार
शनिवारी बरेचदा आम्ही ब्रंच करतो म्हणजे ब्रेकफास्ट आणि लंच एकत्रच करतो. मग त्या दिवशी बरेचदा इडली-सांबार-चटणी किंवा डोसा-भाजी-सांबार-चटणी असं करते. मग दुपारी भूक लागलीच तर निरंजन स्टीम केलेले मासे खातो.
रात्रीचं जेवण – तोंडल्याच्या काच-या, चिंचगुळाचं वरण, पोळ्या, टोमॅटो-कांदा कोशिंबीर

रविवार
नाश्ता – पोहे
दुपारचं जेवण – रविवारी दुपारच्या जेवणात आमच्याकडे माह की दाल किंवा राजमा किंवा धाबेवाली दाल असतंच असतं. तेव्हा या तीनपैकी काहीतरी एक, भेंडीची भाजी, तळलेले मासे, वांग्याचे काप, पोळ्या आणि ताक
रात्रीचं जेवण – टोमॅटो सूप आणि ऑम्लेट-पोळ्या

सोमवार
नाश्ता – घावन-चटणी
दुपारचं जेवण – गवारीची भाजी, बटाट्याच्या काच-या, काकडी-टोमॅटो-कांदा कोशिंबीर, ताक
रात्रीचं जेवण – फ्लॉवरचं सूप आणि थालिपीठं

मंगळवार
नाश्ता – नाचणीचा डोसा-चटणी
दुपारचं जेवण – चण्याची रसदार उसळ, मेथीची कोशिंबीर, पोळ्या, ताक
रात्रीचं जेवण – वरणफळं

बुधवार
नाश्ता – लाह्याच्या पिठाचे मुटके
दुपारचं जेवण – कांद्याची पीठ पेरून भाजी, ताकाची कढी, साधं वरण, कच्चं चिरलेलं सॅलड, पोळ्या
रात्रीचं जेवण – स्टीम केलेले मासे, कॉर्न पुलाव, दही बुंदी, टोमॅटो-गाजर सूप

गुरूवार
नाश्ता –मुगाची धिरडी
दुपारचं जेवण – मेथीची पीठ पेरून किंवा मूग डाळ घालून भाजी, तोंडल्याच्या काच-या, लाल भोपळ्याचं दह्यातलं रायतं, पोळ्या, ताक
रात्रीचं जेवण – भाज्या घालून केलेली खिचडी, भाजलेले पापड, पालक सूप

शुक्रवार
नाश्ता – कोबीचे पराठे
दुपारचं जेवण – फ्लॉवरची साधी परतलेली भाजी, मसूराची रसदार उसळ, कांद्याची दह्यातली कोशिंबीर, पोळ्या, ताक
रात्रीचं जेवण – पुदिना चटणी आणि दही डिप सँडविचेस, मिक्स भाज्यांचं सूप

शनिवार
ब्रंच – आधीच्या रविवारी इडली केली असेल तर मग डोसा किंवा डोसा केला असेल तर मग इडली, मग दुपारचं जेवण नाही.
रात्रीचं जेवण – चिकन खिमा, वांग्याची भाजी, कांदा-टोमॅटोचं रायतं, पोळ्या

रविवार
नाश्ता –मिश्र पिठांची धिरडी
दुपारचं जेवण – काळ्या वाटाण्यांची आमटी,मसाला भेंडी, वांग्याचे काप, तळलेले मासे, कच्चं चिरलेलं सॅलड, पोळ्या, भात, ताक
रात्रीचं जेवण – साधी खिचडी, कढी, पापड

वानगीदाखल मी इथे दोन आठवड्यांचा मेन्यू दिलेला आहे. अर्थातच हा ढोबळ मेन्यू आहे. यात लोणचं, चटणी वगैरे सविस्तर मेन्यू लिहिलेला नाही. हे पदार्थ आवडीनुसार आपल्या जेवणात असतातच. जिथे दोन भाज्या लिहिल्या आहेत तिथे मुलींची नावडती भाजी आहे. शिवाय नाश्त्याचे पदार्थ अजूनही किती तरी वेगवेगळे करता येतात. मागे मी भलीमोठी यादीही पोस्ट केलेलीच आहे. या मेन्यूत मी कडधान्यं, पालेभाजी, फळभाजी, सूप, सॅलड, दही-ताक, मांसाहारी पदार्थ यांचा समावेश करायचा प्रयत्न केलेला आहे. हा मेन्यू मी माझ्या घरात जे पदार्थ उपलब्ध होते तसा ठरवलेला आहे. तुम्ही तुमच्या आवडीनुसार त्यात हवे तसे बदल करू शकता. आमच्याकडे बरेचदा रात्री वन डिश मील किंवा वन पॉट मीलही असतं. त्याबद्दल मी याआधीच्या पोस्टमध्ये लिहिलेलं आहे.
साधारणपणे रोजच्या मुख्य तीन जेवणांमध्ये कडधान्य, एक पालेभाजी, एक फळ भाजी, कोशिंबीर असावंच. सकाळी डोसा केला तर संध्याकाळी बटाट्याची भाजी करू नये किंवा सकाळी नाश्त्याला डाळींची धिरडी केली असतील तर मग जेवणात उसळ करू नये किंवा जेवणात उसळ असेल तर कडधान्यांचं सॅलड करू नये. असे काही ढोबळ नियम पाळलेत तर आपल्याला आवश्यक ते सगळे अन्न घटक मिळू शकतील.

2 thoughts on “स्वयंपाकाचं नियोजन – ४

 1. This post is very useful !!
  रोजच्या स्वयंपाकाच नियोजन करायला अगदीच उपयोगी पडले तुम्ही सुचवलेले मेन्यु
  Thank you so much 😊

  – Jayani
  (From Tokyo, Japan)

  Like

Leave a Reply

Fill in your details below or click an icon to log in:

WordPress.com Logo

You are commenting using your WordPress.com account. Log Out /  Change )

Facebook photo

You are commenting using your Facebook account. Log Out /  Change )

Connecting to %s

%d bloggers like this: