एक आगळंवेगळं पुस्तक

परवा बाबांनी फोनवर एका नवीन पुस्तकाचा उल्लेख केला आणि तुला ते पाठवतो म्हणाले. काल श्रीकांत उमरीकरनं ते पुस्तक पाठवलंसुद्धा. आणि माझं आज ते बहुतेक वाचून संपलंसुद्धा. अन्न हेच अपूर्णब्रह्म या नावाचं शाहू पाटोळे यांचं हे पुस्तक आहे. बाबांना ते बघून वाटलं की खूप वेगळं पुस्तक आहे आणि मला ते आवडेल आणि तसंच झालं. अगदी वेगळं पुस्तक आहे. तथाकथित खालच्या जातीतल्या विशेषतः महार आणि मांग या दोन जातींच्या खाद्यसंस्कृतीबद्दल या पुस्तकात विस्तारानं माहिती दिलेली आहे.
आपण इतिहास संशोधक, विचारवंत, सामाजिक संशोधक, धर्म आणि संस्कृतीचा अभ्यासक नाही हे पाटोळेंनी आपल्या प्रस्तावनेतच स्पष्ट केलेलं आहे. शिवाय या पुस्तकात शाकाहाराची हेटाळणी करण्याचा प्रयत्न नाही असंही त्यांनी नमूद केलेलं आहे. जुन्या काळी जी वर्ण व्यवस्था होती त्यात उच्च वर्णांच्या सोयीनुसार आहार पद्धती ठरवल्या गेल्या. एक फार छान वाक्य त्यांनी लिहिलंय, ‘जसा आहार तसा वर्ण तसेच देव आणि जसे देव तसाच त्या वर्णातल्या व्यक्तीचा आहार. जसा आहार तशीच त्यांच्या देवाची आणि व्यक्तींची वृत्तीही.’ आपल्या संस्कृतीत खाद्यसंस्कृती, वर्ण आणि जात वेगळी करता येत नाही. त्यामुळे जन्मतःच जशी जात चिकटायची तसाच आहारही चिकटायचा असं त्यांनी लिहिलं आहे आणि ते किती खरं आहे…
महार आणि मांग जातीतल्या ब-याच लोकांना आपल्या खाद्यसंस्कृतीची लाज वाटते. त्यामुळे कुणाला हे मांडल्यामुळे राग येईल पण वास्तव कसं नाकारणार असा सवाल पाटोळेंनी केला आहे. इतरवेळेला संस्कृती, इतिहास, वर्णव्यवस्था, चळवळ इत्यांदीवर बोलणारे खाद्यसंस्कृतीवर बोलायला मात्र तयार नसतात असं त्यांचं निरीक्षण आहे. महार आणि मांग या दोन जातींच्या लोकांना उच्चवर्णीयांनी किती वाईट वागणूक दिली आहे त्याबद्दल आपण बरंच वाचलंय, ऐकलंयही. पण या पुस्तकात ते परत वाचताना अंगावर काटा उभा राहतो. वरच्या जातीतल्या लोकांची घरं आतून बघणं यांना शक्यच नव्हतं त्यामुळे त्यांचे खाद्यपदार्थ कसे करायचे हे माहीत असणं तर दूरचीच गोष्ट.
महार आणि मांग हे प्रामुख्यानं मांसाहार करणारे. आणि तोही सवर्णांप्रमाणे फक्त उत्तम मांसाचा नव्हे तर जे काय मिळेल त्याचा. त्यामुळे त्यांच्या पाककृतींमध्ये डोक्यापासून, खुरं, जीभ, शेपट्या या सगळ्यांचा वापर केला जातो. (परदेशातही हे सगळे अवयव खाल्ले जातात. आणि त्यांना डेलिकसी मानलं जातं. पण आपल्याकडे त्याकडे बघण्याची दृष्टी फारशी बरी नाही.) बरं जुन्या काळी या जातींमधल्या लोकांची आर्थिक परिस्थिती हलाखीची असल्यामुळे या पाककृती अगदी बेसिक आहेत. ब-याच पाककृतींमध्ये तेलाचाही वापर नाही. तिखट, मीठ, हळद आणि असेल तर शेंगदाणा कूट, आलं, लसूण असे पदार्थ वापरले गेलेले आहेत. पदार्थाला दाटपणा आणायला येसूर किंवा ज्वारीच्या पिठाचा वापर केला जाई. येसूर म्हणजे वाळवलेला कांदा, खोबरं आणि खडा गरम मसाला कुटून केलेला मसाला. (ब्राह्मणांमध्ये येसरही पदार्थाला दाटपणा आणायला वापरतात. त्यात कणीक-बेसन-काळा मसाला असतो.) जे रस्से केले जात त्यांना फक्त कढ आला की आच बंद करत. ते खळाखळा उकळवत नसत.
पालेभाज्या या ब-याचशा रानभाज्या असत. या भाज्या निवडून (आमच्या मराठवाड्यातला निसून हा छान शब्द त्यांनी वापरला आहे.) मग पाण्यात शिजवत असत. त्या घट्ट पिळून घेऊन मग त्यावर तिखट, मीठ असेल तर दाण्याचं कूट आणि ठेचलेला लसूण घालून खाल्लं जाई. काही पालेभाज्या शिजवून, पिळून भाकरीचं पीठ भिजवताना त्यात घालून भाकरी केल्या जात. घरात भाज्या, डाळी उपलब्ध नसतील तर मग पाणी उकळायला ठेवायचं, उकळी आली की त्यात चिरलेला कांदा घालायचा, दाण्याचं कूट आणि तिखट-मीठ घालायचं. या पातळ कालवणात भाकरी कुस्करून खायची. याला खळबूट म्हणतात.
पाटोळे यांनी लीळाचरित्र, ज्ञानेश्वरी, चांगदेव गाथा, नामदेव गाथा या पुस्तकांमधल्या तसंच संतांच्या अभंगांमधल्या खाद्यसंस्कृतीचाही आढावा घेतलेला आहे, जो रंजक आहे. काही वर्षांपूर्वी पाटोळेंनी एका प्रथितयश वृत्तपत्राकडे या काही रेसिपीज पाठवल्या तेव्हा त्यांनी त्या छापायला नकार दिला असंही पाटोळेंनी लिहिलं आहे.
एक अतिशय वेगळी अशी खाद्यसंस्कृती या पुस्तकात वाचायला मिळते. आपण शाकाहारी असो की मांसाहारी, खाणं ही प्रत्येकाच्या आवडीची, सवयीची आणि गरजेची गोष्ट असते ही बाब प्रत्येकानं लक्षात ठेवलीच पाहिजे. जनशक्ती वाचक चळवळीनं हे आगळंवेगळं पुस्तक प्रकाशित केल्याबद्दल त्यांचं अभिनंदन!

सायली राजाध्यक्ष

One thought on “एक आगळंवेगळं पुस्तक

Leave a reply to Sneha Cancel reply