लंडनला जायचं जेव्हा ठरलं तेव्हा ज्या-ज्या ठिकाणी आवर्जून जायचं असं ठरत होतं त्यात बरो मार्केटचा समावेश होता. लंडनमधलं हे जगप्रसिद्ध ओपन मार्केट. जिथे भाज्या-फळांबरोबरच, चीजचे प्रकार, तेलांचे प्रकार, मसाल्यांचे प्रकार, जॅम-जेली-स्प्रेड्सचे प्रकार, त-हेत-हेचं मांस, मासे, फुलं, फळांचे रस हे तर मिळतंच पण त्याचबरोबर जगाच्या सर्व भागांमधले खाद्यपदार्थांचे प्रकार मिळतात. यापूर्वी मी स्पेनमधल्या बार्सेलोना या शहरात ला बुकारिया हे मोठ्ठं मार्केट बघितलं होतं. ला बुकारियामध्ये फळं-भाज्यांची रेलचेल होती, खारवलेले पदार्थ होते, मासे होते, मांस होतं, फळांचे रस होते. पण हे सगळं असलं तरी बरो मार्केटमध्ये जे जगभरातल्या खाद्यपदार्थांचे प्रकार होते ते तिथे बघायला मिळाले नाहीत. बरो मार्केट मला ला बुकारियापेक्षा जास्त जिवंत वाटलं. या बाजारात जगभरातून आलेल्या पर्यटकांनी वेगवेगळे पदार्थ चाखायला, विकत घ्यायला एकच गर्दी केलेली होती.
वेगवेगळ्या प्रकारची गाजरं, टोमॅटो यांच्याबरोबरच कांदे, रताळी, वेगवेगळ्या प्रकारची वांगी यांची बाजारात नुसती रेलचेल होती. आपल्याकडे चक्री मिळते ना त्या रूपाची आणि आकाराची इटालियन वांगी होती. शिवाय लेट्यूससारख्या सॅलडसाठी वापरल्या जाणा-या वेगवेगळ्या भाज्यांचे असंख्य प्रकार होते. फळांचे रंग आणि आकार तर अगदी मोहून टाकणारे होते. तिथल्या थंडीमुळे फळांचे रंग छान गडद होते. शिवाय सालीही किती तकतकीत दिसत होत्या. या सगळ्या भाज्या आणि फळं मांडलीही इतक्या मनमोहकपणे होती की फक्त बघत राहावं असं वाटत होतं.
इथे सगळ्यात जास्त लोकप्रिय होतं ते म्हणजे जगभरातून आलेलं वेगवेगळ्या प्रकारचं मांस किंवा मीट. चिकन, मटनापासून ते हॅम, बेकन, बीफ हे प्रकार तर होतेच. शिवाय ससा, रानडुक्कर, उंट, झेब्रा, मगर, सुसर, कांगारू, म्हैस, बायसन, शहामृग अशा सर्व प्राण्यांचं मांस या बाजारात उपलब्ध होतं. आणि त्यांचे पदार्थही. दक्षिण आफ्रिकेच्या द एक्झॉटिक मीट कंपनी या स्टॉलवर खाण्यासाठी एकच झुंबड उडाली होती. उंटाच्या, शहामृगाच्या, झेब्राच्या मांसांच्या बर्गरबरोबर कुठले सॉस चांगले लागतील हे सांगणारे बोर्डही लावलेले होते. माशांचे वेगवेगळे प्रकारही बाजारात उपलब्ध होते. मसल्स (तिस-या किंवा शिंपल्या), श्रिंप्स (मोठी कोलंबी), ऑइस्टर्स (कालवं), लॉबस्टर्स (शेवंडं) असे शेल फिशचे प्रकार तर असंख्य होते. द एक्झॉटिक मीट कंपनीत मिळणारे प्रकार बघून आपल्या देशात याचा स्टॉल उघडावा की काय असा एक खोडकर विचार मनात चमकून गेलाच. पण जिथे गोमांसावरच बंदी आहे तिथे ससा, उंट, झेब्रा, मगर, सुसर यांची काय बात! आपल्या सरकारनं तर अशा स्टॉलवर आजन्म (प्राण्यांच्या संदर्भात वापरला आहे हा शब्द!) बंदी घातली असती.
फळांच्या रसांचे स्टॉल्स तर फारच देखणे दिसत होते. लाल, पिवळ्या, केशरी, जांभळ्या, गुलाबी, शिवाय मिश्र रंगांचेही रसांचे कंटेनर्स सुबक रितीनं मांडलेले होते. हे बघून मात्र ला बुकारियाची आठवण आली. मी एक संत्रं आणि स्ट्रॉबेरीचा मिश्र रस प्यायले. जसं फळांच्या रसांचं तसंच ब्रेड्सचंही. विविध प्रकारच्या ताज्या ब्रेड्सचे ढीगच्या ढीग विकायला होते. त्यात फोकाचिया, राय, चीज, मल्टिग्रेन, फ्लॅक्स सीड्स, सिएबाता, ब्लॅक ऑलिव्ह, कॅरॅमलाइज्ड वॉलनट असे ब्रेड होते. नुसत्या वासानंच भूक खवळली होती. मी फोकाचिया विकत घेतला पण बाकी फारसं काही घेता आलं नाही कारण इथे आणणं कठीण होतं.
एका जमैकन स्टॉलवर चिली जॅम होता. त्याची चव घेतली तर झणका थेट मेंदूपर्यंत गेला. पण इतकी अप्रतिम चव होती की मोह न आवरून चिली जॅमच्या दोन बाटल्या मात्र मी विकत घेतल्या. शिवाय ऑलिव्हजच्या वेगवेगळ्या फ्लेवरच्या पेस्ट्सही विकत घेतल्या. मला फक्त अननसाची किंमत आपल्याकडच्या किंमतीच्या जवळपास जाणारी वाटली. नाही तर बाकी सगळं खूप महाग होतं. आपल्या देशात तुलनेनं सगळं किती स्वस्त आहे याची परत एकदा जाणीव झाली.
बाजाराच्या अगदी शेवटच्या भागात जगातल्या विविध देशांमधल्या खाद्यपदार्थांचे स्टॉल्स होते. तिथे जर्मन, अमेरिकन, भारतीय, इजिप्शियन, मॉरिशियन, पाकिस्तानी, दक्षिण आफ्रिकन, लेबनीज, मोरक्कन, थाय, चायनीज, इथियोपियन अशा वेगवेगळ्या देशांमधले पदार्थ विक्रीला ठेवलेले होते. कोशिरी नावाचा इजिप्शियन पदार्थ होता. हा शाकाहारी पदार्थ म्हणजे आपल्याकडची भेळ म्हणायला हरकत नाही. भात, मॅकरोनी, छोले, टोमॅटो सॉस, व्हिनेगर, वेगवेगळे मसाले घालून केलेला हा पदार्थ खायला देताना त्यावर तळलेला कुरकुरीत कांदा घालतात. इथियोपियन पदार्थांचा जो स्टॉल होता तिथे एका भल्यामोठ्या कढईत बीफचा रस्सा उकळत होता. आणि तो मस्त मसालेदार होता कारण मी शाकाहारी असूनही त्या वासानं माझी भूक चाळवली होती! भारतीय स्टॉलवर अर्थातच चाटचे प्रकार होतेच. शिवाय आलू गोबी आणि छोले होते. भारतीय पदार्थांची चव घेणारे बहुतेक लोक परदेशी होते. बघून बरं वाटलं खरं तर. भारतीय स्टॉलच्या शेजारीच जर्मन पदार्थांचा स्टॉल होता आणि तिथे मनगटाएवढे जाडजाड सॉसेजेस परतत होते. मला आधी इंडियन गुजराती अशी पाटी दिसली. खाली बघितलं तर हे मोठे मोठे सॉसेजेस. मग जरा लक्ष देऊन बघितलं तर दोन्ही स्टॉल्स एक तंबू शेअर करत होते. आणि गुजराती फ्लॉवरचा रस्सा आणि जर्मन सॉसेजेस गुण्यागोविंदानं एका छताखाली नांदत होते. smile emoticon smile emoticon
हे सगळं बघताना मनात येत होतं की, आपल्या देशात पण असा एखादा बाजार सुरू करायला काय हरकत आहे? आपल्या साध्या भाजी बाजारांमध्येही हल्ली किती प्रकारच्या भाज्या मिळतात. शिवाय पूर्वी ज्या अप्राप्य होत्या त्या भाज्याही आता आपल्याकडे सर्रास मिळतात. आणि आपले बाजार भरतात त्यावेळी गेलं तर भाज्यांचे ढीग किती रसरशीत दिसतात. लिंबांचे पिवळे ढीग, मटाराचे हिरवेगार ढीग, टोमॅटोचे लाल ढीग, गाजरांचे लाल-शेंदरी ढीग, वांग्यांचे बैंगनी ढीग नुसते बघत राहावेत असे असतात. पार्ल्याच्या भाजी बाजारात तर भाज्या फारच सुबक पद्धतीनं रचलेल्या असतात. तर अशा भाजी बाजारांचं जर मार्केटिंग केलं तर? शिवाय आपल्याकडचं स्ट्रीट फूडही खूप लोकप्रिय आहे. प्रश्न आहे तो फक्त स्वच्छतेचा, नीटनेटकेपणाचा. नाहीतर उत्पादनं तर आपलीही उत्तम आहेतच ना.सायली राजाध्यक्ष