चाट आवडत नाही असा माणूस विरळाच असेल. आपल्या देशात, सर्व प्रांतांमध्ये, राज्यांमध्ये रस्त्यावर जागोजागी चाटच्या गाड्या दिसतात. चाट हा आपल्या देशाच्या खाद्यसंस्कृतीचा एक महत्वाचा भाग आहे. चाट मुळात उत्तर प्रदेशातली. चाटना म्हणजे चाटून खाणं या शब्दातून चाट या शब्दाचा उगम झाला. चाटमध्ये असलेल्या आंबट-गोड-तिखट चटण्यांमुळे बोटं चाटणं क्रमप्राप्त असतं! चाटच्या सगळ्या पदार्थांमध्ये काहीनाकाही कॉमन घटक पदार्थ असतोच. उदाहरणार्थ सगळ्या पदार्थांवर चिंच-खजुराची गोड चटणी घालून खातात. दही वडा, भेळ, आलु चाट, समोसा चाट, पाणी पुरी, शेव-बटाटा पुरी अशा पदार्थांच्या नुसत्या नावानंसुद्धा तोंडाला पाणी सुटतं. या सगळ्या पदार्थांमध्ये तिखट आणि गोड चटणी कॉमन आहे. शिवाय बारीक चिरलेला गुलाबी किंवा पांढरा कांदा, उकडलेला फिक्या पिवळट रंगाचा बटाटा, चटपटीत तपकिरी चाट मसाला, वरून भुरभुरली जाणारी पिवळीधमक बारीक शेव, हिरवीगार कोथिंबीर, चाटचा झणका वाढवणारी गडद हिरवी मिरची, चॉकलेटी रंगाची चिंच-खजुराची चटणी, काश्मिरी मिरच्या वापरून बनवलेली लाल जर्द लाल चटणी, पुदिना-कोथिंबीर-आलं-लसूण घालून केलेली पुदिना चटणी या सगळ्या रंगांच्या सरमिसळीनं चाट नुसती चवदारच नाही तर नेत्रसुखदही होते. मूळची उत्तर प्रदेशातली असली तरी आता त्यात मुंबईच्या पाव-भाजीनं महत्वाचं स्थान पटकावलेलं आहे. शिवाय शेव पुरीसारखे पदार्थ हा गुजरातचा प्रभाव आहे.
चाटचे सगळेच पदार्थ मला आवडतात. आमच्या घरी भेळ नेहमी होते. माझी बहीण भक्ती ही चाटचे पदार्थ फारच उत्तम करते. भेळ ही तिची खासियत आहे. मी कोल्हापूरला राजाभाऊची प्रसिद्ध भेळ खाल्लेली आहे. पुण्यातली गणेश भेळही प्रसिद्ध आहे. नगर-औरंगाबाद रस्त्यावर पांढरीचा पूल म्हणून एक लहानसं गाव आहे. तिथली सुकी भेळ प्रसिद्ध आहे. माझ्या चुलतभावाच्या लग्नानंतर औरंगाबादला परतताना रात्री एक वाजता आम्ही तिथे भेळ खाल्ली होती! तर आजची रेसिपी आहे भेळ. चाटच्या पदार्थांना प्रमाण नसतं. आपापल्या अंदाजानुसार आणि आवडीनुसार घटक पदार्थांचं प्रमाण कमी जास्त करा.
भेळ
साहित्य – कुरमुरे, फरसाण, उकडून बारीक चिरलेला बटाटा, बारीक चिरलेला टोमॅटो, बारीक चिरलेला कांदा, बारीक चिरलेली कोथिंबीर, कैरीच्या मोसमात बारीक चिरलेली थोडी कैरी, चिंच-खजुराची चटणी, लसूण-मिरचीचा ठेचा (थोड्या तेलावर भरपूर लसूण आणि आवडीप्रमाणे हिरवी मिरची घालून परतून घ्या. थंड झालं की मीठ घालून मिक्सरमध्ये वाटून घ्या.)
कृती –
१) वर दिलेलं सगळं साहित्य आपल्या आवडीनुसार प्रमाण घेऊन एकत्र करा. छान मिसळून घ्या.
२) प्लेटमध्ये घ्या. वरून बारीक शेव भुरभुरा.
भेळ तयार आहे.
या चटपटीत भेळेचा आस्वाद घ्या आणि कशी झाली होती ते नक्की कळवा.
सायली राजाध्यक्ष
tai khu khuch chan………………..
LikeLike