
मी लहानपणी ज्या गावात वाढले ते बीड आणि नंतरच्या काळात जिथे राहिले ते औरंगाबाद ही दोन्ही गावं निजामशाहीतली. त्यामुळे या दोन्ही गावांवर मुस्लिम संस्कृतीचा मोठा पगडा आहे. कारण एक तर मोठ्या प्रमाणावर मुसलमान लोकसंख्या आहेच. शिवाय हैदराबाद संस्थानात असल्यामुळे भाषा, चालीरितींवरही मुस्लिम संस्कृतीचा प्रभाव आहे. माझ्या औरंगाबादच्या मित्रमंडळीशी मी हिंदीत बोलते याचं माझ्या मुलींना नवल वाटतं. आमची हिंदी म्हणजे उर्दूमिश्रीत हिंदी असते. आम्ही जे मराठी बोलतो त्यात कित्येक शब्द उर्दू येतात. उदाहरणार्थ – रूमालाला आम्ही दस्ती म्हणतो, तासांना घंटे, परेशान झालो बाबा किंवा नौकरीला कुठे आहेस तू असे वाक्यप्रयोग आमच्या बोलण्यात आपसूक येतात. मी नोकरी ऐवजी नौकरी म्हणते म्हणून माझ्या मुंबईतल्या मैत्रिणी हसायच्या आणि त्या का हसतात हे मला कळायचं नाही. नंतर ब-याच काळानं याचा उलगडा झाला.
बीडला मोठ्या प्रमाणावर मुसलमान लोकवस्ती होती. पण हे सगळे लोक खडीसाखरेसारखे समाजात मिसळून गेले होते. तिथल्या मुसलमान बायका गाठवलेली मंगळसूत्रं आणि जोडवी घालायच्या. फारसे बुरखे दिसायचे नाहीत. हे सगळे लोक उत्तम मराठी बोलायचे, किंबहुना मराठी हीच त्यांची मुख्य भाषा होती. जे हिंदी बोललं जायचं ते दखनी हिंदी-उर्दू होतं. आमच्याकडे बागवान यायचा (हाही आमच्या रोजच्या वापरातला शब्द) तोही उत्तम मराठी बोलायचा. आम्हाला शाळेत सोडणारे सायकल रिक्षा चालवणारे काका मुसलमान होते. आजोबांकडे आजुबाजुच्या गावांमधून जे मुसलमान पक्षकार यायचे ते मराठी लोकांसारखे फेटे (आमच्या भाषेत पटके) बांधायचे आणि मराठीच बोलायचे. पुढे औरंगाबादला आल्यावर आमचे ड्रायव्हर सलीमभाई होते आणि कोर्टाचे शिपाई मुशीर भाई. आमच्या घरमालकांचे ड्रायव्हर काझी नावाचे होते. त्यामुळे ईद असली की या सगळ्यांच्या घरी बोलावलं जायचं. शीरखुर्मा आणि गुलगुले (गोड भजी) हे दोन मुख्य पदार्थ असायचे. कारण मुख्यतः भेटीसाठी जायचं ते रमजान ईदलाच. रमजान ईदला मांसाहारी पदार्थांचं महत्व नसतं. या ईदचा मुख्य पदार्थ म्हणजे शीरखुर्मा किंवा शेवयांची खीर. गुलगुले हा उपपदार्थ. कणकेत गूळ घालून केलेली गोड भजी म्हणजे गुलगुले. मला गुलगुले काही फारसे कधी आवडले नाहीत पण शीरखुर्मा मात्र फार आवडतो. गेली दहा वर्षं आमच्याकडे असलेला आमचा ड्रायव्हर इम्तियाझ या माझ्यासाठी आवर्जून शीरखुर्मा घेऊन येतो. आज मात्र मी घरी शीरखुर्मा केला होता. सावनीची फर्माईश म्हणून चिकन बिर्याणीही केली होती. ती रेसिपी पुढे कधीतरी. आजची रेसिपी आहे शीरखुर्मा.
शीरखुर्मा
साहित्य – १ लिटर दूध, २-३ टेबलस्पून मिल्क पावडर (ऐच्छिक), ५-६ टीस्पून साखर (आपल्या आवडीनुसार प्रमाण कमी-जास्त करा), पिस्ते, काजू, बदाम, बेदाणे हे सगळं मुक्त हस्तानं घ्या( काजू, बदाम, पिस्त्यांचे मोठे तुकडे करा), आवडत असल्यास २ टेबलस्पून भाजलेला सुक्या खोब-याचा कीस, अर्धा टीस्पून वेलची पूड, थोड्या केशराच्या काड्या दुधात भिजवून, सजावटीसाठी सुकवलेल्या गावठी गुलाबाच्या पाकळ्या (ऐच्छिक), २-३ टेबलस्पून तूप, १ वाटी शेवया
कृती –
१) एका पातेल्यात दूध उकळायला ठेवा.
२) एका कढईत तूप गरम करा. त्यात एक एक करून सुकामेवा तळून घ्या आणि बाजूला ठेवा.
३) उरलेल्या तूपात शेवया चांगल्या लाल रंगावर परतून घ्या.
४) दूध उकळलं की त्यात साखर, वेलची पूड घाला.
५) मिल्क पावडर थोड्या दुधात मिसळून चांगली पेस्ट करून घ्या आणि ती या दुधात घाला.
६) जरासं उकळून त्यात परतलेल्या शेवया, सुका मेवा आणि खोब-याचा कीस घाला. शेवया चांगल्या मऊ शिजू द्या.
७) वरून केशर घाला. आवडत असल्यास वरून अजून तूप घाला.
शीरखुर्मा तयार आहे. देताना वरून गावठी गुलाबाच्या पाकळ्या घालून द्या. नसल्या तर तसाच द्या. काही लोक थोडासा केवडा इसेन्स किंवा गुलाब पाणीही घालतात. शिवाय मगज बी पण घालतात. आपल्या आवडीनुसार या गोष्टी घाला. शीरखुर्मा पातळ असतो आणि वर तुपाचा तवंग असतो. मिल्क पावडरनं घट्टपणा येतो.
तुम्हीही करून बघा. फोटो काढा आणि पाठवा. कसा झाला होता तेही कळवा.
सायली राजाध्यक्ष