पावसाळा आला की चमचमीत खावंसं वाटायला लागतं. बाहेर मस्त धुवांधार पाऊस पडतोय आणि आत घराच्या ऊबेत बसून आपण गरमागरम भजी किंवा वडे खातोय, नंतर मस्त आलं, गवती चहा घातलेला वाफाळता चहा पितोय ही कल्पनाही किती सुखावह वाटते नाही! आमच्या घरी तळलेले पदार्थ फारच कमी वेळा होतात. मात्र पावसाळ्यात एकदा भजी आणि एकदा बटाटेवडे मात्र होतातच होतात. सावनीच्या वेळेस मी गरोदर होते. असेच पावसाळ्याचे दिवस होते आणि मला बटाटेवडे खावेसे वाटले. तेव्हा माझ्या सासुबाईंनी मला हिरव्या मसाल्याचे गरमागरम बटाटेवडे करून खायला घातले होते. आता त्या थकल्या आहेत पण दोन्ही गरोदरपणांमध्ये त्यांनी माझं खूप कौतुक केलंय. मला हवं ते खायला करून घातलंय. साधारणपणे आपल्याकडे पहिल्या वेळेला डोहाळेजेवण करण्याची पद्धत आहे. पण माझ्या सासुबाईंनी दुस-या वेळेलाही माझ्या मित्र-मैत्रिणींना बोलावून डोहाळेजेवण केलं होतं. सासुबाईंना मी मावशी म्हणते. मावशीनं त्यावेळी आणि नंतरही खास माझ्यासाठी केलेल्या कित्येक पदार्थांची चव अजूनही माझ्या जिभेवर रेंगाळते आहे. मी आज माझ्या घरीही हिरव्या मसाल्याचे बटाटेवडे केले होते. तीच रेसिपी मी आज तुमच्यासाठी शेअर करते आहे.
बरेचदा सारणात आलं-लसूण-मिरची-कोथिंबीर घातलं जातं. पण वरच्या आवरणात मात्र फक्त तिखट-हळद-मीठ घालतात. ही जी रेसिपी आहे त्यात सारणातही आलं-लसूण-मिरची-कोथिंबीरीचं वाटण आहे आणि वरच्या आवरणातही. म्हणून ते अजूनच खमंग लागतात.
हिरव्या मसाल्याचे बटाटेवडे
साहित्य – ८-१० मध्यम आकाराचे बटाटे उकडून, ३ मोठे कांदे मध्यम आकारात चिरलेले, (६-७ हिरव्या मिरच्या, ७-८ लसूण पाकळ्या, २ इंच आलं, १ मोठी जुडी कोथिंबीर, हे सगळं चांगलं बारीक वाटून घ्या.), अर्ध्या लिंबाचा रस, मीठ चवीनुसार, तळण्यासाठी तेल
वरच्या आवरणासाठीचं साहित्य – २ वाट्या बेसन, पाव टीस्पून हळद, वाटणातलं अर्धं वाटण, मीठ चवीनुसार, १ टेबलस्पून तेल (कडकडीत तापवा)
कृती –
१) वरच्या आवरणासाठी दिलेलं साहित्य एकत्र करून साधारण भज्यांसाठी आपण पीठ भिजवतो तसं पीठ भिजवून बाजूला ठेवा.
२) उकडलेले बटाटे चांगले मॅश करा पण अगदी लगदा करू नका.
३) एका कढईत थोडं तेल घालून ते चांगलं तापवा. तेल तापलं की त्यात कांदा घाला.
४) कांदा पारदर्शक होईपर्यंत शिजू द्या, लाल करू नका. कांदा मऊ झाला की केलेल्या वाटणातलं अर्धं वाटण त्यात घाला आणि चांगलं परता. त्यातच लिंबाचा रस आणि मीठ घाला.
५) थोडं परतून मॅश केलेला बटाटा घाला. चांगलं मिसळून घ्या आणि लगेचच गॅस बंद करा. जास्त शिजवलंत तर बटाटा फार चिकट होतो.
६) हे मिश्रण थंड झालं की आपल्याला हव्या त्या आकाराचे गोळे करा आणि हातावर दाबून चपटे करा.
७) एका कढईत तेल कडकडीत तापवा. बटाट्याच्या सारणाचा एक, एक गोळा तयार केलेल्या पिठात बुडवून मध्यम आचेवर छान लाल रंगावर तळा. असे सगळे वडे करून घ्या.
१ किलो बटाट्यांचे साधारणपणे मध्यम आकाराचे २५ वडे होतात.
सारणासाठी आपल्या आवडीनुसार लसूण-मिरचीचं प्रमाण कमी जास्त करा. पण हे वडे जरासे तिखटच चांगले लागतात.
या वड्यांबरोबर खायला हिरवी चटणी करा. थोडासा पुदिना, भरपूर कोथिंबीर, थोडंसं ओलं खोबरं, ३-४ लसूण पाकळ्या, ४-५ हिरव्या मिरच्या आणि मीठ घालून मस्त चटणी वाटा. वाटताना पाण्याचा वापर करा. जराशी पातळच वाटा.
वडा पाव करायचा असेल तर रेडीमेड पाव आणा आणि लाल चटणीही तयार मिळते ती आणा. पाव मधोमध कापा. त्याला ही हिरवी चटणी लावा, वर कोरडी लाल चटणी घाला, आवडत असल्यास चिंचेची गोड चटणी लावा. गरम वडा जरासा हातावर दाबून तो ठेवा. पाव बंद करा आणि गरमागरम वडा-पावचा आस्वाद घ्या.
सायली राजाध्यक्ष