गेल्या पोस्टमध्ये मी भातांच्या नेहमी केल्या जाणा-या प्रकारांबद्दल लिहिलं होतं. कल्पनाशक्तीचा वापर केला तर आपण भाताचे कितीतरी प्रकार करू शकतो. आज त्याच पोस्टचा दुसरा भाग.
कॉर्न पुलाव – १ वाटी तांदूळ असतील तर १ वाटी कॉर्न दाणे, १ वाटी गाजराचा कीस आणि अर्धी वाटी चिरलेली सिमला मिरची घ्या. तूपावर थोडा अख्खा गरम मसाला (२ लवंगा, ७-८ मिरी, २ वेलच्या, १ तमालपत्रं) घाला. तांदळाला थोडा एव्हरेस्टचा गरम मसाला चोळा. गरम मसाला तडतडला की त्यात भाज्या घाला. चांगलं परता. नंतर त्यात तांदूळ घालून परता. चांगले परतले की दुप्पट पाणी घाला. मीठ घाला. भात चांगला शिजवून घ्या. हा भात अतिशय सौम्य चवीचा होतो.
मसूर पुलाव – १ वाटी मोड आलेले मसूर आणि १ वाटी तांदूळ असं प्रमाण घ्या. आलं-लसूण-सुकी लाल मिरची-धणे- थोडी खसखस असं वाटून घ्या. तेल गरम करा. त्यावर चिरलेला कांदा घाला. कांदा परतला की चिरलेला टोमॅटो घाला. टोमॅटो चांगला परतला की वाटलेला मसाला घाला. तो परतून मसूर घाला. मसूर जरासा परतला की तांदूळ घाला. दुप्पट पाणी घाला. मीठ घाला. भात चांगला शिजवा. वरून थोडं साजूक तूप सोडा. होत आला की भरपूर कोथिंबीर घाला.
जिरा राईस – निथळलेल्या बासमती तांदळाला थोडी लसणाची पेस्ट चोळून ठेवा. तूप गरम करा. त्यावर थोडा अख्खा गरम मसाला (मिरी, लवंग, वेलची, तमालपत्र) घाला. तडतडला की त्यात भरपूर जिरं घाला. जिरं तडतडलं की त्यावर तांदूळ घाला. लसणाचा खमंग वास येईपर्यंत आणि चांगले सळसळीत कोरडे होईपर्यंत परता. नंतर त्यात दुप्पट पाणी घाला. मीठ घाला. भात मोकळा शिजवा.
फ्राईड राईस – गाजर, फरसबी, कोबी, सिमला मिरची, बीन स्प्राऊट्स, कांद्याची पात अशा सगळ्या किंवा हव्या त्या भाज्या चायनीजला चिरतो तशा चिरून घ्या. पातीचा कांदाही वापरा. फ्राईड राईसला बुटका तांदूळ वापरा. पण मोकळा भात व्हायला हवा. कुकरला सव्वापट पाणी घालून मोकळा भात शिजवून घ्या. गाजर, फरसबी अर्धवट शिजवून घ्या. बाकीच्या भाज्या कच्च्याच घ्या. तेल गरम करा. त्यात पात वगळून बाकीच्या भाज्या घाला. वापरत असाल तर अजिनोमोटो घाला. मी घालत नाही. भाज्या मोठ्या आचेवर चांगल्या परता. त्यात मीठ-मिरपूड-सोया सॉस घाला. त्यात शिजलेला भात आणि कांद्याची पात घालून हलक्या हातानं मिसळून घ्या.
हातफोडणीचा भात – उरलेला भात असतो तो हातानं चांगला मोकळा करा. त्यावर कांदा अगदी बारीक चिरून घाला. कोथिंबीर घाला. मीठ घाला. एका लहान कढईत फोडणी करा. त्यात मोहरी आणि जरा जास्त हिंग घाला. गॅस बंद करून जरा जास्त लाल तिखट घाला. ही फोडणी भातावर ओता. हलक्या हातानं कालवा.
फोडणीचा भात – तेलाची मोहरी-हिंग-हळद अशी फोडणी करा. त्यात कढीपत्ता आणि शेंगदाणे घाला. चांगलं परतलं की कांदा घालून चांगला मऊ होईपर्यंत परता. शिजलेल्या भातावर तिखट-मीठ घालून चांगलं हलवून घ्या. तो भात यात घाला. कोथिंबीर घाला. दणदणीत वाफ काढा.
दक्षिण भारतात तर भाताचं प्रस्थ फारच मोठं आहे. दक्षिणेतल्या बहुसंख्य राज्यांमध्ये मुख्य जेवण हे भाताचंच असतं. त्यामुळे अर्थातच इथे भातांचेही विपुल प्रकार बघायला मिळतात. भिशी बेळे भात, लेमन राईस, पुळीवगरै, कोकोनट राईस, तैर सादम किंवा दही भात, चित्रान्ना, वेन पोंगल, टोमॅटो राईस असं भाताच्या प्रकारातलं वैविध्य आपल्याला इथे बघायला मिळतं. शिवाय सांबार-राईस आणि रस्सम राईसही आहेतच. मुंबईत मुथ्थुस्वामी नावाचा दाक्षिणात्य केटरर आहे. तो जे जेवण देतो त्यात भाताचे हे सगळे प्रकार अफलातून असतात. मी लहान असताना आम्ही तिरूपती बालाजीला गेलो होतो. तेव्हा पहिल्यांदा मी बादलीत भात आणि सांबार देताना बघितलं. अवाक झाले होते मी ते बघून. कारण आपल्याकडे एखाद्या वाटीचा भात होतो. तर वर उल्लेख केलेल्या काही प्रकारांच्या रेसिपीजही मी शेअर करते आहे.
भिशी बेळे भात – अर्धी वाटी चणा डाळ, अर्धी वाटी उडीद डाळ, १ इंच दालचिनीचा तुकडा, १ कप सुकं खोबरं, १० लाल सुक्या काश्मिरी मिरच्या, १ वाटी धणे (हा सगळा मसाला थोड्याशा तेलावर खमंग लाल भाजून त्याची पूड करून ठेवा.) फरसबी, कांदा, टोमॅटो, शेवग्याच्या शेंगा, गाजर, बटाटे या किंवा यापैकी आवडतात त्या भाज्या घेऊन त्याचे तुकडे करा. मी कुकरला करते. त्यामुळे आधी तूरडाळीचं वरण शिजवून घ्या. तेलाची मोहरी-हिंग-हळद-कढीपत्ता घालून फोडणी करा. त्यावर भाज्या घाला. भाज्या परतून त्यात वरण घाला. आपल्या आवडीनुसार तयार मसाला घाला. चिंचेचा कोळ घाला. आवडत असल्यास थोडा गूळ घाला. मीठ घाला. चांगली उकळी आली की धुवून तासभर ठेवलेले तांदूळ घाला. एक शिटी काढा. वरून साजूक तूप घालून भात खा. कुकरमध्ये करायचं नसेल तर बाहेर पातेल्यातही करू शकता.
चित्रान्ना – भात शिजवून घ्या. तो थंड होऊ द्या. थोडा मोकळा भात हवा. कढईत तूप गरम करा. मोहरी घालून तडतडली की थोडी चणा डाळ आणि उडीद डाळ घालून चांगली लाल होऊ द्या. मग सुक्या लाल मिरच्या, कढीपत्ता आणि जरा जास्त हिंग घाला. थोडीशी हळद घाला. मग त्यात भात, मीठ घालून हलक्या हातानं मिसळून घ्या. आता त्यात कोथिंबीर, थोडं ओलं खोबरं, लिंबाचा रस किंवा चिंचेचा कोळ किंवा कैरीचा कीस घाला. जरासं गरम करून गॅस बंद करा. काही लोक यात जाडसर दाण्याचं आणि तिळाचं कूटही घालतात.
पुळीवगरै किंवा चिंचेचा भात – अर्धी वाटी चणा डाळ, अर्धी वाटी उडीद डाळ, अर्धी वाटी धणे, पाऊण वाटी तीळ, १०-१२ काश्मिरी सुक्या लाल मिरच्या ( हा सगळा मसाला कढईत सुका भाजून घ्या. थंड झाल्यावर त्याची पूड करून ठेवा.) भात शिजवून थंड करून मोकळा करून घ्या. कढईत तूप किंवा तेल गरम करा. मोहरी घालून तडतडली की थोडे शेंगदाणे घाला. शेंगदाणे लाल झाले की त्यात थोडी चणा डाळ आणि थोडी उडीद डाळ घालून लाल होऊ द्या. आता त्यात कढीपत्ता घाला. हिंग घाला, हळद घाला. मस्त फोडणी झाली की त्यात चिंचेचा कोळ घाला. एक मिनिटभर परतून आपल्या आवडीनुसार मसाला आणि मीठ घाला. भात घाला. हलक्या हातानं मिसळून घ्या. गरमागरम खा.
लेमन राईस – भात शिजवून थंड करून, मोकळा करून घ्या. एका कढईत तेल गरम करा. त्यात मोहरी घाला. तडतडली की थोडी चणा डाळ आणि उडीद डाळ घाला. ती लाल झाली की कढीपत्ता, सुक्या लाल मिरच्या, हिंग आणि थोडं किसलेलं आलं घाला. हळद आणि भात घाला. मीठ आणि लिंबाचा रस घाला. हलक्या हातानं मिसळून घ्या.
दही भात – भात शिजवून थंड करून घ्या. दही भातासाठी शक्यतो मऊ भात घ्या. भात करताना त्यात दही, दूध, मीठ घालून चांगला सरबरीत कालवा. आवडत असल्यास त्यात किसलेली काकडी घाला. थोडं किसलेलं आलं, मेतकूट, कोथिंबीर घालून कालवा. एका कढईत तेलाची खमंग फोडणी करा. त्यात उडदाची डाळ घालून लाल करा. नंतर त्यात कढीपत्ता, सुकी लाल मिरची किंवा तळणीची मिरची घाला. जरा जास्त हिंग घाला. ही फोडणी भातावर घाला. दही भात तयार आहे.
यापुढची पोस्ट असणार आहे ती खिचडीच्या प्रकारांची.
सायली राजाध्यक्ष