भाताचे प्रकार -१

भात हा आपल्या देशातल्या लोकांच्या जेवणातला एक अनिवार्य पदार्थ आहे. दक्षिणेपासून उत्तरेपर्यंत आणि पश्चिमेपासून पूर्वेपर्यंतच्या सगळ्या राज्यांमध्ये या ना त्या स्वरूपात भात खाल्ला जातो. शिवाय आपल्या देशाला मोठा सागरी किनारा लाभलेला आहे. किनारपट्टीवरच्या लोकांचं भात आणि मासे हे ठरलेलं जेवण असतंच. आपल्याकडे तांदूळ वापरून केले जाणारे इडली, डोसा, उत्तप्पा, पापड हे पदार्थ तसंच तांदळाचं पीठ वापरून केले जाणारे भाकरी, मोदक, धिरडी हे पदार्थही अतिशय लोकप्रिय आहेत. सध्याच्या आहारशास्त्राप्रमाणे पॉलिश केलेले तांदूळ जास्त खाऊ नयेत कारण त्यात फारशी पोषणमूल्यं नसतात. त्यापेक्षा हातसडीचे किंवा पॉलिश न केलेले तांदूळ खावेत. पण असं असलं तरी आपल्याकडे बहुतेक लोकांना भात आवडतो. त्यामुळे आपल्या देशात भाताचे असंख्य प्रकार केले जातात. मटण, चिकन, मासे, भाज्या घालून वेगवेगळ्या प्रकारच्या बिर्याण्या आणि पुलाव, डाळी घालून खिचडीसदृश पदार्थ, चिंचेचा कोळ, कैरीचा कीस, दाणे-तीळ घालून चित्रान्नासारखे प्रकार हे सगळे प्रकार फार लोकप्रिय आहेत. आजच्या पोस्टमध्ये मी भाताच्या अशाच काही प्रकारांबद्दल लिहिणार आहे.
आपल्या देशातच भाताचं प्रचंड उत्पादन होतं. जगात तांदूळ उत्पादनात भारताचा दुसरा क्रमांक लागतो. त्यामुळे अर्थातच हवामानानुसार त्या-त्या भागांत पिकणारे तांदळाचे कित्येक प्रकार आहेत. बासमती, आंबोमोहोर, काली मूछ, सूरती कोलम, घोटी, गंधसाळ, जिरेसाळ, मसुरी, इंद्रायणी, चिन्नोर, जिरगा, कमोद, पटणी, मोगरा असे अनेक प्रकार महाराष्ट्रातच मिळतात. त्यातले बरेचसे इथे पिकतातही. त्याशिवाय तामिळनाडू, आंध्र, केरळ, कर्नाटक, बंगाल, ओरिसा अशा राज्यांमध्येही तांदळाच्या असंख्य जाती पिकवल्या जातात. अर्थातच प्रत्येक तांदळाचं आपलं गुणवैशिष्ट्य असतंच. म्हणजे बासमती तांदळाचा भात मोकळा होतो, दाणा लांब असतो. इंद्रायणी तांदळाचा भात मऊ आणि आसट होतो. आंबेमोहोर, जिरेसाळ, गंधसाळ या तांदळाच्या जातींना सुंदर वास असतो. म्हणून वेगवेगळ्या प्रकारच्या तांदळाचा वापर वेगवेगळ्या प्रकारच्या भातांच्या प्रकारांसाठी केला जातो.

भात करताना लक्षात ठेवायच्या काही गोष्टी – तांदूळ जुना असेल तर भाताला अधिक पाणी लागतं. नवीन असेल तर कमी पाणी लागतं. जुन्या तांदळाचा भात मोकळा होतो. नवीन तांदळाचा भात चिकट, मऊ, आसट होतो. पुलाव, बिर्याणी करताना लांब दाण्याचे म्हणजे बासमती तांदूळ वापरावेत. पण खिचडी, दहीभात यासारख्या पदार्थांसाठी लहान दाण्याचा म्हणजे आंबेमोहोरसारखा तांदूळ वापरावा. अगदी गरम आसट भात खायचा असेल तर इंद्रायणीसारखा तांदूळ वापरावा. पण हा भात गार झाल्यावर अजिबात गिच्च गोळा होतो. पुलाव, बिर्याणी, खिचडी करताना तांदूळ किमान एक तास आधी धुवून, संपूर्ण पाणी काढून ठेवावेत.

साधा भात – साधा भात आपल्याला माहीतच आहे. कुकरला करत असाल तर तांदळाच्या जातीनुसार पाणी घाला. नवीन असतील तर सव्वापट सुद्धा पाणी पुरेल. जुने असतील तर दीडपट पाणी घाला. बाहेर करायचा असेल तर नवीन तांदळाला पावणेदोनपट आणि जुन्या तांदळाला दुप्पट पाणी घाला. भात अगदी मऊ, लुसलुशीत करायचा असेल तर आपल्या अंदाजानं पाण्याचं प्रमाण वाढवा.

पुलाव – तांदूळ धुवून ठेवा. करताना त्याला थोडा एव्हरेस्टचा गरम मसाला चोळा. तुपावर थोडा अख्खा गरम मसाला (लवंगा, मिरी, दालचिनी, वेलची, तमालपत्रं, शहाजिरं) घाला. तो तडतडला की त्यात चिरलेल्या भाज्या (फरसबी, गाजर, फ्लॉवर, कांदा, मटार, कोबी) घाला. जरासं परतून धुवून ठेवलेले तांदूळ घाला. दुप्पट पाणी घाला. मीठ घाला. भात मोकळा शिजवा.

वांगी भात – एक वाटी तांदूळ असतील तर प्रत्येकी १ वाटी चिरलेला कांदा, टोमॅटो आणि वांग्याचे तुकडे घ्या. शक्यतो बिनबियांची जांभळी वांगी वापरा. तेलाची मोहरी-हिंग-हळद अशी फोडणी करा. त्यावर अगदी थोडा अख्खा गरम मसाला (लवंग, मिरी, दालचिनी, तमालपत्रं) घाला. तो तडतडला की त्यात कांदा घाला. कांदा जरासा मऊ झाला की टोमॅटो घालून जरासं परता आणि मग वांगी घाला. वांगी घातल्यावर मंद आचेवर झाकण ठेवून वांगी अर्धवट शिजवा. गॅसवर पातेल्यात दुप्पट पाणी गरम करायला ठेवा. तांदळाला काळा मसाला चोळा. एक वाटी तांदळाला दीड टीस्पून काळा मसाला आणि अर्धा टीस्पून लाल तिखट हे प्रमाण घ्या. वांगी अर्धवट शिजली की तांदूळ घालून परता आणि मिनिटभर झाकण ठेवून वाफ येऊ द्या. नंतर त्यात आधणाचं पाणी आणि मीठ तसंच लिंबाचा रस घाला. भात छान मऊ शिजू द्या. वरून खोबरं-कोथिंबीर घाला.

मटार भात – कृती वांगी भाताप्रमाणेच. फक्त वांग्याऐवजी मटार वापरा.
तोंडली भात – कृती वांगी भाताप्रमाणेच. फक्त तोंडली वापरा आणि फोडणीत तांदूळ परतताना आवडत असल्यास थोडे काजू घाला.

मसाले-भात – थोडं सुकं खोबरं, जिरं, लवंग, दालचिनी, वेलची असं कच्चंच कुटून घ्या. तेलाची फोडणी करा. त्यात तमालपत्रं घाला. परतून त्यात आवडीनुसार भाज्या (फ्लॉवर, तोंडली, गाजर, मटार, वांगी, कांदा, फरसबी) घाला. चांगल्या परतल्या की त्यात हा मसाला घालून परता. मसाला परतला की चमचाभर दही घालून परता. नंतर त्यात काळा मसाला चोळलेले तांदूळ आणि काजू तुकडा घाला. तांदूळ चांगले परतले की आधणाचं दुप्पट पाणी घाला. मीठ, लिंबाचा रस आणि आवडीनुसार थोडी साखर घाला. भात चांगला शिजू द्या. वरून खोबरं-कोथिंबीर घाला.

कोथिंबीर पुलाव – एक वाटी तांदूळ असतील तर एक मोठी जुडी कोथिंबीर आणि १५ लसूण पाकळ्या असं प्रमाण घ्या. तूपावर लवंग आणि मिरी घाला. तडतडलं की तुरीचे किंवा मटारचे दाणे घाला. ते परतेपर्यंत लसूण, एखादी हिरवी मिरची आणि कोथिंबीरीची पेस्ट करून घ्या. ती तांदळाला चोळा. दाणे परतले की त्यात तांदूळ घाला. चांगलं परता. लसणाचा खमंग वास आला पाहिजे. नंतर त्यात दुप्पट पाणी, अगदी थोडा लिंबाचा रस आणि मीठ घाला. या भाताला कुठलाही मसाला वापरायचा नाही. भात मऊ शिजवा.

हिरवा भात – या भाताला फक्त हिरव्या भाज्या घ्या. फरसबी, सिमला मिरची, मटार. थोडा पुदिना, कोथिंबीर, थोडंसं आलं-लसूण आणि हिरवी मिरची अशी पेस्ट करून ती तांदळाला चोळा. तूपावर किंवा तेलावर थोडा अख्खा गरम मसाला घाला. तडतडला की त्यावर भाज्या घालून परता. नंतर त्यावर तांदूळ घाला. खमंग वास येईपर्यंत परता. दुप्पट आधणाचं पाणी घाला. मीठ, लिंबाचा रस घाला. भात चांगला शिजू द्या.

कांदे-भात – अगदी लहान लहान कांदे घ्या. थोडे तीळ, सुकं खोबरं, थोडे धणे, सुकी लाल मिरची भाजून घ्या. ते वाटा. काळा मसाला, वाटलेला मसाला, चिंचेचा कोळ आणि थोडीशी साखर किंवा गूळ, मीठ एकत्र करून तो मसाला या कांद्यात भरा. तूपावर मिरी, लवंग, दालचिनी, तमालपत्रं परता. त्यावर तांदूळ घालून आधणाचं दुप्पट पाणी घालून भात शिजायला ठेवा. अर्धवट शिजल्यावर त्यावर भरलेले कांदे घालून झाकण ठेवा. भात पूर्ण शिजला की वरून थोडं साजूक तूप सोडा. भात उलथन्यानं, हलक्या हातानं मिसळून घ्या. वरून खोबरं-कोथिंबीर घाला.

व-हाडी मसालेभात – १ कांदा, थोडं आलं-लसूण, १ हिरवी मिरची, २ लवंगा, २ वेलच्या, १ लहान दालचिनी, १ लहान चमचा जिरं, भरपूर कोथिंबीर, धणे-जिरे पूड, काळा मसाला असं सगळं वाटून घ्या. तेलावर नेहमीसारखी फोडणी करून त्यावर वाटलेला मसाला घाला. चांगला परतला की थोडंसं दही घालून चांगलं परता. त्यात फ्लॉवर, मटार आणि बटाट्याचे तुकडे घाला. झाकण घालून एक वाफ काढा. नंतर तांदूळ घाला. आधणाचं दुप्पट पाणी आणि मीठ घाला. भात मऊ शिजवा. वरून साजूक तूप आणि खोबरं-कोथिंबीर घाला.

व-हाडी बटाटेभात – थोडी हिरवी मिरची, थोडं आलं, सुकं खोबरं, थोडे धणे, लवंग आणि दालचिनी असा मसाला वाटून घ्या. बटाट्याची सालं काढून मोठे तुकडे करा आणि तेलात तळून बाजूला ठेवा. जरा जास्त तेलाची फोडणी करून त्यात वाटलेला मसाला परता. त्यावर बटाटे आणि थोडं दही घालून परता. दुप्पट पाणी घालून मीठ घाला. भात चांगला शिजू द्या.

भाताच्या आणखी काही प्रकारांबद्दल पुढच्या पोस्टमध्ये लिहीन.

भाताचे हे प्रकार करून बघा. कसे झाले ते कळवा. फोटो काढा आणि तेही पाठवा.

सायली राजाध्यक्ष

2 thoughts on “भाताचे प्रकार -१

  1. Aaj mi banavala Matar bhat tiffin sathi… Ekdam patkan jhala..ani tasty pan.. Thanks. Tumchya recipes ekdam sadhya saral astat… Devi annapurna tumchyavar nehemich prasanna raho.

    Like

  2. I’m one of those people jyana bhat khallyashivay jevlyasarkha vatatach nahi! Kattar bhat premi! Sadhi khichadi pan mitkya marat khate! Hahahaa This is the first time I came across your blog! Chan mahiti dili ahe tandulabaddal! I love reading food stories! ani bhatachya prakaranche photos pahun tar pani sutale tondala! Keep on blogging! God bless you…..

    Like

Leave a Reply

Fill in your details below or click an icon to log in:

WordPress.com Logo

You are commenting using your WordPress.com account. Log Out /  Change )

Twitter picture

You are commenting using your Twitter account. Log Out /  Change )

Facebook photo

You are commenting using your Facebook account. Log Out /  Change )

Connecting to %s

%d bloggers like this: