प्रसादाचे दहा पदार्थ

गणेश चतुर्थी अगदी जवळ आली आहे. विघ्नहर्ता आणि बुद्धीची देवता म्हणून कुठल्याही समारंभात आधी गणेशाचं पूजन करण्याची प्रथा आपल्याकडे आहे. गणपती बाप्पा हे सगळ्यांच्या सोयीनं आपला मुक्काम ठेवतात. कुणाकडे दीड दिवस, कुणाकडे पाच दिवस, कुणाकडे गौरी-गणपती, कुणाकडे दहा दिवस असा सगळ्यांच्या सोयीनं गणपती बाप्पा त्या-त्या घरी राहातो. या दिवसात घरोघरी सकाळ-संध्याकाळ आरतीचे आवाज ऐकू येतात. आरतीनंतर प्रसाद तर हवाच. आज आपण असेच काही प्रसादाचे पदार्थ पाहणार आहोत.

पंचखाद्य – पंचखाद्य हा खिरापतीचाच एक प्रकार. फक्त सुक्या खोब-याऐवजी यात ओलं खोबरं वापरतात. १ वाटी ओलं खोबरं असेल तर अर्धी वाटी गूळ, अर्धा टीस्पून जायफळ पूड, प्रत्येकी ४-५ बदाम, काजू तुकडे करून, १०-१२ बेदाणे, थोडी चारोळी, ३-४ केशराच्या काड्या. हे सगळं साहित्य एकत्र करून एका जाड बुडाच्या कढईत घ्या. त्यात १ टीस्पून तूप घाला. नीट हलवून घ्या आणि झाकण ठेवून १० मिनिटं मंद आचेवर ठेवा. मधूनमधून हलवत रहा. खोबरं शिजलं की पंचखाद्य तयार. यात काही लोक गुळाऐवजी साखर वापरतात. काहीजण थोडी खसखस आणि उडदाची डाळही घालतात. आपल्या आवडीप्रमाणे बदल करा.

तळलेले मोदक – २ वाट्या कणीक, १ टेबलस्पून रवा, २ टीस्पून कडकडीत तापवलेल्या तुपाचं मोहन, चिमूटभर मीठ, चिमूटभर साखर हे सगळं हातानं नीट मिसळून घ्या. लागेल तसं दूध घालून पु-यांना भिजवतो तशी घट्ट कणीक मळून घ्या. अर्धा तास बाजूला ठेवून द्या. सारणाची कृती वर पंचखाद्याची कृती दिली आहे तीच. नंतर पातळ पुरीसारखी पाती लाटा. हातावर घेऊन त्यात मधोमध सारण ठेवा. कडांना हाताच्या चिमटीनं दाबून कळ्या पाडा. त्या सगळ्या कळ्या एकत्रित करून मोदकाचा आकार द्या. असे सगळे मोदक तयार करून घ्या. कढईत तूप गरम करून त्यात लाल रंगावर मोदक तळून घ्या.

मणगणं – मणगणं म्हणजे हरभरा डाळ आणि थोडासा साबुदाणा यांची खीर. ही एक गोव्याकडची रेसिपी आहे. हा पदार्थ तिकडे प्रसादाला हमखास केला जातो. थोडीशी पुरणासारखी चव असल्यानं आणि गुळाचा वापर केल्यामुळे हा पदार्थ खमंग लागतो. यासाठी १ वाटी चणा डाळ ३-४ तास भिजवलेली, १ टेबलस्पून साबुदाणा भिजवलेला, पाऊण वाटी किसलेला गूळ, १५-१६ काजू तुकडे करून, जायफळ-वेलची पूड, २ वाट्या नारळाचं दूध. चणा डाळ आणि साबुदाणा एकत्र करून, चणा डाळ अगदी मऊ शिजेपर्यंत शिजवून घ्या. शिजवताना वर जो फेस येतो तो वेळोवेळी काढून टाका. डाळ शिजली की गॅस बंद करून ती गरम असतानाच त्यात गूळ घालून विरघळून घ्या. वेलची-जायफळ पूड घाला. थंड होऊ द्या. १ वाटी ओल्या नारळाचा चव दोन वाट्या पाणी घालून मिक्सरला खूप वेळ फिरवा. चांगलं दूध निघायला हवं. नंतर हे दूध गाळणीतून गाळून घ्या. थंड झालेल्या चणाडाळीत हे दूध घाला. त्यात काजूचे तुकडे घाला. गारच खा. किंवा मंद आचेवर जरासं गरम करा. जर नारळाचं दूध फुटू नये असं वाटत असेल तर गरम करताना आधी अर्धा कप साधं दूध घाला. मग नारळाचं दूध घाला. काही लोक यात साधं दूधही वापरतात. आणि चवीला थोडं नारळाचं दूध घालतात. तसंही करता येईल.

कणकेचा शिरा – रव्याच्या शि-यापेक्षा कणकेचा शिरा अत्यंत खमंग लागतो. १ वाटी कणीक, पाव वाटी तूप, दीड वाटी दूध, पाऊण वाटी गूळ, सुका मेवा ऐच्छिक. आधी जाड बुडाच्या कढईत कणीक चांगली भाजून घ्या. कणकेचा रंग गुलाबी व्हायला लागला आणि खमंग वास यायला लागला की मग तूप घाला आणि मध्यम आचेवर सतत हलवत कणीक छान लाल होईपर्यंत भाजा. हे फार काळजीपूर्वक करावं लागतं कारण कणीक लगेचच जळू शकते. आता त्यात दूध घाला. चांगलं हलवून घ्या आणि झाकण ठेवून २-३ मिनिटं वाफ येऊ द्या. त्यात गूळ घाला, हवा असल्यास सुका मेवा घाला. चांगलं हलवा. गूळ वितळला की मग परत झाकण ठेवा. २-३ मिनिटं शिजवा. वरून १ टीस्पून तूप घाला. हलवून घ्या आणि गॅस बंद करा.

पुरणाचे कडबू – आमच्याकडे म्हणजे माझ्या माहेरी महालक्ष्म्या असतात. त्या देवात असतात. पहिली ज्येष्ठा श्रावणातल्या पहिल्या शुक्रवारी बसते. पितळेच्या गडूवर (छोटा तांब्या) पितळेचा पेला ठेवून ही लक्ष्मी आमच्याकडे देवातच असते. चुना, हळद, कुंकू आणि काजळ वापरून या महालक्ष्मीचे नाक-डोळे-केस काढले जातात. त्याला आमच्याकडे महालक्ष्मी लिहिणं म्हणतात. तर महालक्ष्मीला पुरणाच्या कडबूंचा नैवेद्य असतो. १ वाटी चणाडाळ चिमूटभर मीठ घालून शिजवून घ्या. शिजली की पाणी वेगळं काढून त्यात वाटीभर गूळ किंवा साखर घालून त्याला गॅसवर शिजवून घ्या. ज्याला पुरणाला चटका देणं म्हणतात. पुरण शिजत आलं की त्यात उलथनं उभं ठेवून बघा. ते जर न पडता स्थिर राहीलं तर पुरण तयार आहे असं समजा. गॅस बंद करा. जरा गरम असतानाच पुरणयंत्रातून काढा. नेहमी पोळ्यांना भिजवतो तशी कणीक भिजवा. त्याची लहान गोल लाटी लाटून घ्या. जराशी जाड लाटा. त्यात आपण करंजीचं सारण भरतो तसं पुरण भरा. करंजीसारखी दुमडून कडांना हातानं दुमड घाला. असे सगळे कडबू तयार करून घ्या. एका नॉनस्टिक तव्यावर किंवा पॅनवर थोडं तूप घाला. कडबू त्यावर लावा. दोन्ही बाजूंनी लागेल तसं तूप घालून खरपूस भाजून घ्या. गरम तूपाबरोबर उत्तम लागतात.

रताळ्याचा हलवा किंवा शिरा – आषाढी एकादशीला आपण बरेचदा रताळ्याचा गोड शिरा करतो. गणपतीच्या दिवसांमध्येही रताळी मुबलक प्रमाणात मिळतात. कारण या दिवसांतच ऋषीची भाजी केली जाते. या भाजीला रताळी लागतात. रताळ्याचा हलवा करणं अगदी सोपं आहे. यासाठी अर्धा किलो रताळी घ्या. त्यांची सालं काढून त्याच्या पातळ चकत्या करा. कढईत साजूक तूप घाला. साधारण २ टेबलस्पून पुरे होईल. ते तापलं की त्यावर रताळ्याच्या चकत्या घाला. चांगलं हलवून झाकण ठेवा. जरा वाफ आली की थोडासा दुधाचा हबका मारा. परत झाकण ठेवा. रताळी शिजत आली की त्यात आपल्या आवडीनुसार साखर किंवा गूळ घाला. ते विरघळलं की थोडं ओलं खोबरं आणि जायफळाची पूड घाला. चांगलं मऊ शिजू द्या. किंवा रताळी कुकरला उकडून घ्या. ती सालं काढून मॅश करा. त्यात आपल्या आवडीनुसार थोडं दूध घालून शिजत ठेवा. जरा घट्ट झालं की साखर किंवा गूळ घाला आणि ओलं नारळ आणि जायफळ पूड घाला. गुळानं हलवा जास्त खमंग होतो.

खिरापत – खिरापत घरोघरी केली जाते. पण नवीन लग्न झालेल्यांना कदाचित माहीत नसेल म्हणून ही रेसिपी शेअर करते आहे. सुकं खोबरं मंद आचेवर खरपूस भाजा पण फार रंग बदलू देऊ नका. थोडी खसखस भाजून घ्या. सुकं खोबरं, खसखस, पिठी साखर, वेलची पूड, खडीसाखर, खारकेचे बारीक तुकडे, हव्या असलेल्या सुक्या मेव्याचे तुकडे असं सगळं एकत्र करा. ही खिरापत ७-८ दिवस चांगली राहते.

दुधीचा हलवा – दुधी भोपळा सालं काढून किसून घ्या. एका जाड बुडाच्या कढईत तूप तापवा. तूप तापलं की त्यावर कीस घाला. चांगलं हलवून झाकण ठेवा. मध्येमध्ये हलवत दुधी चांगला शिजू द्या. अर्धवट शिजत आला की दूध घाला. दूध आटत आलं की त्यात थोडी मिल्क पावडर, साखर, वेलची पूड आणि बदाम, काजूचे काप घाला. झाकण ठेवून मऊ शिजू द्या. वरून थोडं साजूक तूप घाला. मिल्क पावडर वापरायची नसेल तर मग ४-५ पेढे कुस्करून घाला. तसं केलंत तर साखरेचं प्रमाण कमी करा.

अननस शिरा – १ वाटी रवा असेल तर एक वाटी टीनमधल्या अननसाचे बारीक तुकडे, हे तुकडे पाकवलेले असतात म्हणून अर्धी वाटी साखर वापरा. तूप गरम करून रवा चांगला खमंग भाजा. नंतर त्यात अडीचपट पाणी घाला. झाकण ठेवून तो चांगला फुलू द्या. मग साखर घाला. साखर विरघळली आणि शिरा चांगला मऊ झाला की त्यात बारीक चिरलेले अननसाचे तुकडे आणि केशर घाला. वरून परत थोडं साजूक तूप घाला. ताजा अननस वापरू नका. कडवट होईल.

दलियाची खीर – तयार दलिया किराणा दुकानात मिळतो. तो घ्या. १ वाटी दलिया असेल तर १ लिटर दूध लागेल. दलिया ३-४ तास भिजवून ठेवा. नंतर त्यात १ ते दीड वाटी गूळ आणि वाटीभर ओलं खोबरं घालून कुकरला चांगलं मऊ शिजवून घ्या. शिजवताना पुरेसं पाणी घाला नाहीतर मिश्रण फार घट्ट होतं. हे मिश्रण जरासं कोमट असताना त्यात जायफळ पूड घालून मग हँड मिक्सरनं चांगलं एकजीव करा. किंवा मिक्सरमध्ये फिरवून घ्या. थंड झाल्यावर त्यात दूध घाला. दूध घालून उकळू नका. कारण त्यात गूळ वापरलेला आहे. त्यात काजूचे भरपूर तुकडे घाला. फ्रीजमध्ये अगदी मस्त थंड करा.

गणपतीसाठी दहा दिवसांचे दहा प्रसादाचे पदार्थ आज मी या पोस्टमध्ये लिहिले आहेत. करून बघा आणि कसे झाले होते ते नक्की कळवा.

सोशल नेटवर्किंगवर ही पोस्ट शेअर करताना या ब्लॉगचा जरूर उल्लेख करा.

सायली राजाध्यक्ष

One thought on “प्रसादाचे दहा पदार्थ

  1. Tumchya recipes khupach awadlya. Pustak wachawa tasha recipes wachat hote. Kahi kahi recipes, dodkyachya shiranchi chutney, bhajyancha loncha mala ekdam lahan panichi athwan zali. Esp. Kawathachya chutney chya recipe ne. Mast blog!!! I am definitely going to try and share your recipes. Amruta

    Like

Leave a Reply

Fill in your details below or click an icon to log in:

WordPress.com Logo

You are commenting using your WordPress.com account. Log Out /  Change )

Facebook photo

You are commenting using your Facebook account. Log Out /  Change )

Connecting to %s

%d bloggers like this: