
आमच्या भाजी बाजारात ओली लाल मिरची क्वचितच बघायला मिळते. त्यामुळे ती मिळाली की घरी आणून तिचा झणझणीत ठेचा करतेच करते. मग नाकातोंडातून पाणी आलं तरी बेहत्तर! मला हिरव्या मिरचीचा नुसती कच्ची मिरची आणि लसूण वाटून केलेला ठेचा, थोड्याशा तेलावर लसूण-मिरची-जिरं परतून केलेला खर्डा, मिरची-लसूण-कोथिंबीर परतून केलेला ठेचा असे सगळे प्रकार आवडतात. पण मला दाण्याचा कूट घालून सौम्य केलेला ठेचा मात्र अजिबात आवडत नाही. तिखट खायचं तर कसं मस्त ओरिजिनल! तर मला नुकत्याच ओल्या लवंगी लाल मिरच्या बाजारात मिळाल्या आणि मी त्यांचा झणझणीत ठेचा करून तो भाकरीबरोबर खाल्लाही. ही रेसिपी मी तुमच्यासाठी आज शेअर करते आहे.
लाल मिरचीचा ठेचा
साहित्य – पाव किलो ओल्या लाल मिरच्या, २ वाट्या लसूण, १ वाटी कच्चं तेल, मीठ चवीनुसार
कृती –
दिलेलं सगळं साहित्य कच्चंच मिक्सरमध्ये घाला आणि एकजीव पेस्ट होईपर्यंत वाटून घ्या.
लाल मिरचीचा ठेचा तयार आहे. हा ठेचा गरम आसट भाताबरोबर, गरम पोळीबरोबर किंवा शिळ्या अथवा गरम भाकरीबरोबर उत्तम लागतो. फख्त अत्यंत जहाल तिखट खाण्याची सवय असलेल्यांनीच हा ठेचा खा. ज्यांना तिखट खाण्याची सवय नाही त्यांना तो झेपणार नाही.
या ब्लॉगवरची पोस्ट सोशल नेटवर्किंगवर शेअर करताना या ब्लॉगचा जरूर उल्लेख करा.
सायली राजाध्यक्ष
