चहा,चहा आणि चहा!

आज आंतरराष्ट्रीय चहा दिन आहे. चहा हा भारतीयांचा खास जिव्हाळ्याचा विषय. थंडी असो, पाऊस असो की कडक ऊन आपल्याकडे चहाला मरण नाही. कोप-याकोप-यावर असलेल्या चहाच्या टप-या हे आपल्या देशाचं खास वैशिष्ट्य. मला नाही वाटत जगात चहाला इतकं कुणी महत्त्व देत असेल. चाय पे चर्चा हा आपला अतिशय आवडता उद्योग.
चहाचं सगळ्यात पहिलं उत्पादन चीनमध्ये झालं असं मानलं जातं. चिनी लोकांनी चहाचा उपयोग औषधी पेय म्हणून केला आणि नंतर तो त्यांच्या जीवनाचा एक महत्त्वाचा भाग बनला. चीनमधून चहा हळूहळू पूर्वेकडच्या इतर देशांमध्ये गेला. जपानचा प्रसिद्ध टी सेरेमनी हा चिन्यांकडूनच त्यांनी आत्मसात केला.
ब्रिटिशांना चहाची सवय लागली आणि त्यांनी आपल्या साम्राज्यात त्याचा प्रसार केला. अर्थातच भारतात चहा पिकायला लागला. चहाच्या लागवडीसाठी ज्या प्रकारचं हवामान आणि जमीन लागते ती ईशान्य भारतात विशेषतः आसाममध्ये आणि दक्षिणेकडे तामिळनाडूत असल्यानं साहजिकच या भागांमध्ये चहाची लागवड मुबलक प्रमाणात केली जाते.
आज भारत हा जगातला आघाडीचा चहा उत्पादक देश आहे. पण या उत्पादनापैकी जवळपास 70 टक्के चहा भारतातच वापरला जातो. आसाम आणि दार्जिलिंग या दोन जगप्रसिद्ध चहाच्या जाती. हे दोन्ही चहा जगभरातल्या रेस्टॉरंटमध्ये मिळतात.
चहात दूध घालून पिण्याची प्रथा बहुतेक ब्रिटिशांनी सुरू केली असावी. ती भारतीयांनी चांगलीच आत्मसात केली आहे.
काॅफीला एकेकाळी जी लोकप्रियता होती त्याची काही अंशी जागा आता चहा घ्यायला लागला आहे. गेल्या काही वर्षांत भारतात काॅफी शाॅपसारखे टी लाऊंज सुरू झाले आहेत. वेगवेगळ्या असंख्य प्रकारचे चहा इथे मिळतात. मग त्यात नेहमीचा मसाला चहा, साधा चहा, ब्लॅक टी, लेमन टी, इंग्लिश ब्रेकफास्ट टी, अर्ल ग्रे टी, काश्मिरी काहवा असे प्रकार मिळतात. तर आईस्ड टीमध्ये पीच टी, लेमन टी, सॅफ्रन टी, लेमनग्रास कूलर असेही प्रकार मिळतात. मी मध्ये ताजमहल टी लाऊंजमध्ये ग्वावा म्हणजे पेरूच्या स्वादाचा आईस्ड टी प्यायले.
मुंबईत वाघ बकरी टी लाऊंज हे पहिलं खास चहा मिळणारं टी शाॅप. आता टी ट्रेल्स, ताजमहाल टी लाऊंज यासारखे टी लाऊंज सुरू झाले आहेत. चहा आणि बरोबर काहीतरी चटपटीत खाणं घेऊन तासनतास गप्पा मारण्यासाठी हे अड्डे मस्तच आहेत.
आपल्याकडे जो उत्तम दर्जाचा चहा तयार होतो तो लांब पत्तीचा असतो. तो बहुतेक सगळा निर्यात होतो. त्यामुळे आपण जो चहा पितो तो खाली उरलेल्या भुकटीचा म्हणजे डस्ट टी असतो. पण आपल्याला त्याचीच सवय झाली आहे. भारतात प्रचंड उकळून चहाचा अक्षरशः अर्क काढतात. ब्रिटिशांना अतिशय सौम्य चवीचा चहा आवडतो. लंडनमध्ये अनेक ठिकाणी हाय टी मिळतो. ज्याबरोबर स्कोन्स आणि सँडविचेस तसंच मफिन्स खाल्ले जातात.
मला स्वतःला सौम्य चवीचा साधा चहा आवडतो. पाणी उकळल्यावर त्यात साखर घालायची, थोडंसं आलं घालून फक्त एक उकळी काढायची. फार उकळून तो तिखट करायचा नाही. नंतर त्यात चहा पत्ती घालून गॅस लगेचच बंद करायचा आणि ताबडतोब चहा गाळायचा. त्यात वरुन अगदी थोडंसंच दूध घालायचं. असा चहा मला आवडतो. मला कधीकधी त्यात गवती चहा घातलेलाही आवडतो. हल्ली बरेच लोक बिन साखरेचा चहा घेतात. पण मला स्वतःला तो आवडत नाही.
आजच्या दिवसात मी आतापर्यंत तीन कप चहा घेतलेला आहे. संध्याकाळी अर्थातच पुन्हा घेणार आहे!

4 thoughts on “चहा,चहा आणि चहा!

  1. hello Sayli tai, thanks for such a nice blog. I try to read it daily. I have become your fan. You are not only great cook but good writer too. Hatsoff to you. Thanks a lot for such a nice blog. God bless you.

    Like

Leave a Reply

Fill in your details below or click an icon to log in:

WordPress.com Logo

You are commenting using your WordPress.com account. Log Out /  Change )

Facebook photo

You are commenting using your Facebook account. Log Out /  Change )

Connecting to %s

%d bloggers like this: