धपाटे

photo 2महाराष्ट्राच्या प्रत्येक भागात असे काही पदार्थ आहेत की जे ब-याच ठिकाणी सारख्याच पद्धतीनं केले जातात पण ज्यांची नावं मात्र वेगवेगळी आहेत. उदाहरणार्थ आम्ही ज्याला वरणफळं म्हणतो त्याला काही ठिकाणी डाळफळं, चकोल्या, डाळढोकळी अशा वेगवेगळ्या नावानं ओळखलं जातं. तर काही पदार्थ मात्र त्या-त्या प्रदेशाची खासियतच असतात. ते तिथेच केले जातात उदाहरणार्थ खानदेशी मिरचीची भाजी किंवा नागपुरी वडा-भात. तसंच मराठवाड्यात धपाटे केले जातात. धपाटे या नावातच त्या पदार्थाची कृती दडलेली आहे. धपाधप थापून केले जातात म्हणून ते धपाटे. धपाटे हा थालिपिठांशी साधर्म्य असणारा पदार्थ आहे. पण थालिपिठाला जरा नाजूकसाजूक पद्धत वापरली जाते. जरा लाड केले जातात. म्हणजे भाजणी हवी किंवा जास्त घटक पदार्थ हवेत. धपाट्यांचं तसं नाही. धपाटे बिचारे मराठवाडी माणसासारखे साधेसोपे, ओबडधोबड! नावच बघा ना. धपाट्यांना मसाला भाकरीही म्हणता येईल. कारण यात वापरला जाणारा मुख्य घटक पदार्थ आहे ज्वारीचं पीठ.
अंगत-पंगत नावाच्या एका महाराष्ट्रीय खाद्यपदार्थांच्या फेसबुक समुहाची मी सदस्य आहे. त्यातले एक सभासद नुकतेच औरंगाबादला जाऊन आले. औरंगाबादला माझ्या आईचं जे दुकान आहे तिथे ते गेले होते. तिथे रोज धपाटे असतातच. त्याचे फोटो त्यांनी शेअर केले होते. त्यावर चर्चा झाली. माझी एक मैत्रीण मेघना ढोके हिनं धपाट्यांची रेसिपी लिही म्हणून सांगितलं म्हणून आजची रेसिपी आहे धपाटे.

धपाटे

साहित्य – ३ वाट्या ज्वारीचं पीठ, १ वाटी कणीक, अर्धी वाटी डाळीचं पीठ किंवा बेसन, २-३ टीस्पून तिखट, हळद १ टीस्पून, हिंग-मीठ चवीनुसार (हिंग थोडा जास्त घाला), २ टीस्पून अख्खं जिरं, २ वाट्या आंबट दही, थोडं दूध, अर्धी वाटी बारीक चिरलेली कोथिंबीर, भाजण्यासाठी तेल
आवडत असल्यास – ३ कांदे किसून, पण हे ऐच्छिक आहे. माझी आई घालत नाही. कांदे घातले तर दह्याचं प्रमाण खूप कमी करावं लागेल कारण कांद्याला पाणी सुटतं. पण नुसतं दही दूध घालून जास्त चांगले लागतात.

कृती –
१) एका परातीत ज्वारीचं पीठ, कणीक आणि बेसन एकत्र करा.
२) त्यात तिखट, मीठ, हिंग, जिरं, हळद घाला. चांगलं एकत्र करा.
३) आता त्यात कोथिंबीर आणि दही घाला.
४) भाकरीला पीठ भिजवतो तसं सैलसर भिजवा. जर लागलं तर थोडं दूध घाला. दह्याचं प्रमाण अंदाजानं कमी-जास्त करा.
५) पोळपाटावर किंवा परातीत भाकरी थापतो तसं धपाटं थापून घ्या.
६) आधी तव्यावर एका बाजूनं कोरडं भाजा. नंतर तेल लावून खमंग लाल रंगावर दोन्ही बाजूंनी खरपूस भाजून घ्या.
कांदे घालायचे असतील तर कांदे किसून घ्या. त्यात सगळा मसाला आणि थोडं दही घाला. त्याला पाणी सुटलं की त्यात मावेल तसं पीठ घाला. बाकी कृती सारखीच आहे. धपाट्यांना दही मात्र आंबटच हवं.

धपाट्यांबरोबर दही, ताजं लोणी, लोणचं, दाण्याची चटणी, दही-चटणी, तिळाची चटणी, जवसाची किंवा का-हळाची चटणी आणि तेल असं काहीही मस्त लागतं. किंवा नुसतं खायलाही छान लागतात. इतक्या पिठात मध्यम आकाराचे ८ धपाटे होतात. रात्रीच्या जेवणात धपाटे, लोणी, चटणी आणि साधी मूगडाळीची खिचडी असा मेन्यू करू शकता. किंवा ब्रेकफास्टला खाऊ शकता. प्रवासात खायला न्यायला उत्तम.

मग करून बघा. कसे झाले होते ते कळवा. फोटो काढलेत तर तेही पाठवा. ही तसंच या पेजवरच्या इतर सर्व रेसिपीज तुम्हाला www.shecooksathome.com वर बघायला मिळतील.

सायली राजाध्यक्ष

3 thoughts on “धपाटे

  1. tumcha blog khupach chan ahe.Me koknatli ahe tyamule tumcha blogvarcha kahi recipes mazyasathi navin ahe.tya me kadhich khalya nahiyet tri mla banvun pahavyasha watat ahet.me banvlya k nkki sangen .

    Like

  2. नमस्कार सायली ताई,
    आजच वनिता मंडळ कार्यक्रमामध्ये तुमची मुलाखत ऐकली आणि मी तुमच्या आवाजाबरोबरच तुमच्या पाक कौशल्याच्या प्रेमात पडले
    मुलाखती मधून तुमची संभाषण कौशल्यातली सहजताही खूपच काही सांगून गेली
    मी लगेचच तुमच्या शोध घेतला आणि अक्षरशः भारावून गेले
    मलाही खाद्यपदार्थ बनवायला खूप आवडते
    आता मला अजून नवीन पदार्थाची माहिती मिळेल
    खूप खूप धन्यवाद आणि शुभेच्छा

    Liked by 1 person

Leave a Reply

Fill in your details below or click an icon to log in:

WordPress.com Logo

You are commenting using your WordPress.com account. Log Out /  Change )

Facebook photo

You are commenting using your Facebook account. Log Out /  Change )

Connecting to %s

%d bloggers like this: