भाजी बाजार…

IMG_8106

हिवाळा आला की मी बीडची, पर्यायानं माझ्या आजी-आजोबांची फार आठवण येते. मला माहीत आहे की माझ्या पोस्ट्समध्ये बीडचा वारंवार उल्लेख येतो, तो काहींना खटकतही असेल. पण असं होतं खरं. म्हणतात ना की आपण आपल्या जगण्यातला सगळ्यात सुंदर काळ जिथे घालवतो त्या आठवणीच आपल्या मनात कायम राहतात. तसं होत असावं कदाचित. बीड सोडून इतकी वर्षं झाली तरी मला अजूनही औरंगाबादपेक्षा बीडच जास्त आठवतं.
हिवाळ्यात सगळीकडेच भाजी बाजारात त-हेत-हेच्या भाज्यांची रेलचेल असते. बीडलाही तसंच होतं. आजीबरोबर मी मंडईत जायचे. तिथले भाज्यांचे ढीग अजूनही माझ्या डोळ्यांसमोर आहेत. पालक, मेथी, चुका, कांद्याची पात, तांदुळजा, चंदनबटवा, करडई, शेपू या नेहमीच्या पालेभाज्या तर मिळायच्याच पण त्याच बरोबर ओली हरभ-याची भाजी, चिवळ, घोळ या भाज्याही मिळायच्या. त्या मला मुंबईत फारच कमी बघायला मिळतात. मुंबईत चंदनबटवा मिळतो तो अगदी बारीक पानांचा बतुआ. बीड किंवा औरंगाबादला चंदनबटवा मिळतो तो मोठ्या हिरव्या पानांचा आणि जांभळ्या पाठीचा. या सगळ्या भाज्या ताज्या असतील तर मग नुसत्या परतून मीठ, मिरची आणि दाण्याचा कूट घालून परतून खाल्ल्या तरी फर्मास लागतात. लाल माठ मात्र बीडला फारसा दिसायचा नाही. तो मी औरंगाबादला फार कमीदा बघितला पण मुंबईत मात्र तो सगळीकडे दिसतो. मुंबईत सर्रास दिसणा-या पालेभाज्या म्हणजे पालक, मेथी, चवळी, लाल माठ आणि कांद्याची पात. बाकी पालेभाज्या कधीमधी डोकावत असतात. बीडला आणि औरंगाबादला बाजारातून कांद्याची पात आणली की ती लगेचच धुवून चिरायची, त्यात कच्चं तेल, तिखट, मीठ आणि दाण्याचं कूट घालून खायचं हा आमचा शिरस्ता होता. मेथी, करडई जर ताजी असेल तर धुवून आम्ही कच्चीच खात असू. जेवणाबरोबर तोंडीलावणं म्हणून. लहानपणापासून कुठल्याच भाज्या आवडत नाहीत असं म्हणायची प्राज्ञा नव्हती. त्यामुळेच कदाचित हिमोग्लोबीन कायम उत्तम असायचं!


मात्र मुंबई पुण्यात जसे मटारचे ढीग, कापाची विविध प्रकारची वांगी, उत्तम टोमॅटो बघायला मिळतात तसं मला कधी बीड किंवा औरंगाबादला बघितल्याचं आठवत नाही. बीडला तर मटार बघितल्याचंच आठवत नाही. कदाचित तेव्हा दिल्ली किंवा सिमला मटारांची इतक्या मोठ्या प्रमाणात मागणी नसावी त्यामुळे लागवडही होत नसावी. मुंबईचं वैशिष्ट्य म्हणजे सर्व ऋतुंमध्ये मुंबईला ब-यापैकी भाज्या मिळतात. कारण राज्याच्या विविध भागांमधून मुंबईत भाज्या येत असतात. त्यामुळे भाज्यांनी कमतरता नसते. पार्ला भाजी बाजार म्हणजे तर केवळ देखणाच. तिथे ज्या प्रकारांनी भाजी लावलेली असते ते केवळ बघण्यासारखंच. हिरव्या मिरच्यांचे वेगवेगळे प्रकार इतक्या सुबक रितीनं मांडलेले असतात की केवळ बघतच राहावं. या दिवसात तर पार्ल्याच्या बाजारात जाणं म्हणजे नयनसुखच. उंधियोचे दिवस असल्यानं उंधियोच्या सगळ्या भाज्या म्हणजे सुरती पापडी, वेगवेगळ्या प्रकारचे कंद, लहान बटाटे, वेगवेगळ्या प्रकारची लहान वांगी, लसणाची पात, मेथी, तुरीचे-मटाराचे-हरभ-याचे दाणे, ओली हळद आणि आंबेहळद, लिंबाचे ढीग असं सगळं इतकं उत्तम मिळतं की खरेदी करणं क्रमप्राप्तच असतं. शिवाय गाजर हलव्याची गुलाबी गाजरं, हिरवागार कोवळा मटार, केशरी संत्र्यांचे ढीग असं भरभरून बघायला मिळतं.
आमच्या बांद्रा पूर्वेतही रोज सकाळी बाजार भरतो. मी आठवड्यातून दोनदा भाजी आणायला जाते. माझे ठरलेले भाजीवाले आहेत त्यांच्याकडून भाजी घेते. हा बाजार जिथे आहे तिथे मुख्यत्वे निम्न मध्यमवर्गाची वस्ती आहे. त्यामुळे भाज्या घ्यायला येणारे लोक हे रोज लागेल इतकीच भाजी घेतात. आपल्यासारखी पिशव्या भरभरून भाजी घेत नाहीत. पण म्हणून ते रोज अगदी ताजी भाजी खातात. बायका मुलांना जवळच्या शाळांमध्ये सोडतात आणि फक्त त्या दिवशी दोन्ही वेळेला लागणारी भाजी घेऊन जातात. या सगळ्यांच्या रोजच्या खरेदीचा महत्वाचा भाग असतो तो म्हणजे मसाला. म्हणजे आलं-लसूण-मिरची-कोथिंबीर-कढीपत्ता, आणि मिरचीही गडद हिरव्या रंगाची जहाल तिखट लवंगी मिरची. शिवाय ते मसालेही असे थोडे थोडेच विकत घेतात. त्यामुळे या मसाल्यांच्या गाड्याही इथे असतात.


या दिवसातले माझ्या घरचे ठरलेले पदार्थ म्हणजे उंधियो, सोलाण्यांची आमटी, सोलाण्यांची उसळ, तुरीच्या दाण्यांची आमटी, तुरीच्या दाण्यांचा भात, मटार उसळ, मटारचे पॅटिस, मटार भात, मटार-पनीर, मिसळीची भाजी, सरसों का साग, मिश्र भाज्यांचं लोणचं, कोवळ्या मेथीची पचडी. आमच्याकडे कच्चे मटार इतके खाल्ले जातात की मी आठवड्यातून दोनदा निदान ३ किलो मटार आणते. त्यातले थोडे सोलून फ्रीजरला जातात. पण बरेचसे खाण्यातच जातात. माझी धाकटी मुलगी आता कॉलेजला आहे पण ती शाळेत असताना हिवाळ्यात शाळेतून आल्याबरोबर तिला डायनिंग टेबलावर मटार दिसले नाहीत तर ती रागावायची. एकदा मला आमच्या भाजीवाल्यानं विचारलंही, ताई ए विचारू? तुम्ही इतके मटार नेता त्याचं काय करता? म्हटलं बाबा, आम्ही खातो. तो बघतच राहिला. मला वासंती मुझुमदारांचा एक लेख आठवतो. त्यात त्यांनी लिहीलं होतं की लहानपणापासून त्यांना घरात बकरी म्हणायचे कारण त्यांना कच्च्या भाज्या खायला आवडायचं. तर हेही थोडंसं तसंच.
मला हिरव्या भाज्या पाहिल्या की किती घेऊ आणि किती नको असं होतं तर माझ्या मुलीला शर्वरीला हिरव्या भाज्या बघितल्या की कसंतरी होतं! मला भाज्यांचं इतकं प्रेम आहे की आम्ही जर गाडीनं प्रवास करत असू तर रस्त्यात जिथे कुठे गावांमध्ये बाजार असतील तिथे उतरून मी भाज्या घेते. माझा नवरा तेव्हा विचित्र नजरेनं माझ्याकडे बघतो. पण यावर काही इलाज नाही हे त्याला कळून चुकलेलं आहे. म्हणून बिचारा गप्प राहतो. मध्यंतरी अंकाच्या कामासाठी कल्याणला गेले होते. ज्यांच्याकडे काम होतं त्यांच्या बिल्डिंगमधून उतरल्यावर समोर भाजी दिसली, मग केलीच खरेदी. जित्याची खोड बहुधा मेल्याशिवाय जाणार नाहीये!
मध्ये औरंगाबादला गेले होते तेव्हा आईबरोबर भाजी आणायला गेले होते. औरंगाबादला गावरान भाज्या फार छान मिळतात. मी ब-याच दिवसांनी गेले होते. शाळेत असताना भाजीला जायचे तेव्हाचा एक पानवाला दिसला. इतकं बरं वाटलं. मी त्या दिवशी औरंगाबादच्या बाजाराचे बरेच फोटो काढले. परवा आमच्या बांद्र्यातल्या बाजाराचेही बरेच फोटो काढले. आज ते शेअर करते आहे.

सोशल नेटवर्किंगवर ही पोस्ट शेअर करताना या ब्लॉगचा जरूर उल्लेख करा.

सायली राजाध्यक्ष

One thought on “भाजी बाजार…

  1. It’s nice to read about Bandra east market, now a days u get fresh Palghar vegies near MIG club on Monday, Tue, thurs n sat from 8-9 am, I am also from Bandra east, Monarch, Gandhi nagar

    Like

Leave a Reply

Fill in your details below or click an icon to log in:

WordPress.com Logo

You are commenting using your WordPress.com account. Log Out /  Change )

Facebook photo

You are commenting using your Facebook account. Log Out /  Change )

Connecting to %s

%d bloggers like this: